Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 February
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता
क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होत असलेला आंतरराष्ट्रीय करार, पॅक्स सिलिकाचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलं आहे. नवी दिल्लीत, एआय इम्पॅक्ट परिषदेत या करारावर
स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अमेरिकेचे
भारतातले राजदूत सर्जियो गोर यावेळी उपस्थित होते. आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक
सहकार्य आणि पुरवठा साखळीला आधार यादृष्टीनं हा करार महत्त्वाचा आहे. या करारामुळे
संगणकीय चिप्स सेमीकंडक्टर्स उद्योगात भारताला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास, अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.
****
एआयच्या मदतीनं तयार होणाऱ्या डिजिटल सामग्रीबाबत केंद्र
सरकारने कडक मार्गदर्शक तत्त्वं लागू केली आहेत. गेल्या १० फेब्रुवारीला अधिसूचना
जारी झाल्यानंतर हे नियम कालपासून अमलात आले. आता एखादं छायाचित्र, दृश्यफीत किंवा ध्वनिफित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं तयार केलेली असेल, तर त्यावर स्पष्टपणे तशी सूचना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रत्येक
एआय-निर्मित सामग्रीच्या कोपऱ्यात 'एआय जनरेटेड' किंवा तत्सम सूचना स्पष्टपणे दाखवणं अनिवार्य असणार आहे. तसंच कोणत्याही
आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर सामग्रीबाबत तक्रार आल्यास समाज माध्यमांवरून ती
सामग्री तीन तासांच्या आत काढून टाकावी लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ३६
तासांची होती.
****
नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विकसित 'कुंभदूत'
या एआय-आधारित ॲपचं काल दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. ही प्रणाली सिंहस्थ काळात १ कोटीपर्यंत
भाविकांना आणि लाखो डिजिटल एजंट्सना हाताळण्यास सक्षम असेल. सिंहस्थ २०२७ पूर्वी
नाशिक शहरातल्या महाविद्यालयांमध्ये १० हजार सहभागींसह पथदर्शी प्रकल्प राबवण्यात
येणार असल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम
शृंखलेचा १३१ वा भाग असेल. सकाळी ११ वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप
वरुन ऐकता येईल.
****
आज पासून येत्या २७ फेब्रुवारी दरम्यान 'राष्ट्रीय बांबू
महोत्सवाचं'
आयोजन करण्यात येणार आहे. आज सायंकाळी नागपूर इथे केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. महोत्सवातल्या “बॅम्बू बीट्स अँड बिर्याणी” या उद्घाटन सोहळ्यात बांबू
ऑर्केस्ट्रा आणि बांबू फूड शो सादर केला जाणार आहे. महोत्सवात बांबू बांधकाम, उत्पादन डिझाईन, दागिने निर्मिती अशा विविध
कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच
शाश्वत बांबू शेती, कार्बन ऑफसेट आणि पाच दिवसांचा
प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमही होणार आहे. या महोत्सवात २५ तारखेला शेतभेट
कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून बांबू शेतीचं प्रात्यक्षिक दाखवलं जाईल.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन परवा सोमवारी २३
तारखेपासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात
होणार असून,
त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा
शोकप्रस्ताव सादर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा
अर्थसंकल्प सादर करणार आहेत
****
महाराष्ट्रामध्ये एस आय आर म्हणजेच निवडणूक याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण एप्रिलमध्ये
लागू होणार असून या माध्यमातून अचूक आणि पारदर्शक मतदार याद्या निर्माण होतील.
यासाठी आवश्यक तो सर्व निधी राज्य सरकार देईल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपूरमध्ये महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक
स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
****
अमेरिकेतील प्रसिद्ध 'साऊल
आर्टिस्ट जर्नल या आंतरराष्ट्रीय मासिकाने आपल्या ताज्या अंकात अहिल्यानगरच्या
प्रख्यात चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या अजोड कलाकृतींना विशेष स्थान दिलं आहे.
आदिवासी जीवनातील 'रस' आणि
त्यांचा अदम्य उत्साह ठाकूर यांच्या १८ चित्रांच्या माध्यमातून या मासिकाच्या
तब्बल २५ पानांवर दिमाखात झळकला आहे.
****
लातूर शहरात वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी लातूर
पोलिसांनी व्यापक मोहीम राबवत मोठा आवाज करणाऱ्या ६१ दुचाकींवर कारवाई केली.
यामध्ये अंदाजे दीड लाख रुपये किमतीचे सायलेन्सर नष्ट करण्यात आले. भविष्यातही
ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनांवर सातत्याने कठोर कारवाई केली जाईल असा इशारा लातूर
पोलीसांनी दिला आहे.
****
शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या
वतीने देण्यात येणारे प्राचार्य रां रं बोराडे शेतकरी साहित्य पुरस्कार तसंच संदीप
दळवी बालसाहित्य पुरस्कार आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान केले जाणार आहेत.
****
No comments:
Post a Comment