Monday, 16 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध क्षेत्रात होणारा वाढता वापर आणि उपयोग लक्षात घेऊन आजपासून नवी दिल्लीत भारत एआय इम्पॅक्ट शिखर संमेलन सुरु होत आहे. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर व्यापक चर्चा घडवून आणणारं आणि विकसनशील देशात होणारं, हे जगातलं पहिलंच संमेलन आहे. २० देशांचे प्रमुख नेते यात सहभागी होणार आहेत. यामध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉ, ब्राझीलचे राष्ट्रपती लुईज इनासियो लूला दा सिल्वा, स्पेनचे राष्ट्रपती पेड्रो सांचेज पेरेज कास्टेजोन, संयुक्त अरब अमिरातीचे राजे शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाह्यान, मोरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम, भूतानचे पंतप्रधान श्तेरिंग तोबगे आदींचा समावेश आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रांचे महासचिव, अनेक जागतिक संघटनांचे पदाधिकारी आणि ४५ देशांच्या मंत्र्यांचं प्रतिनिधी मंडळ या संमेलनात सहभागी होणार आहे.

दरम्यान, या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ए आय एक्सपो २०२६ चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभाव आणि नागरिकांना त्यातून होणारा फायदा विषद करणारी ५०० पेक्षा जास्त विशेष सत्र, थेट प्रत्यक्षिकं यांचा यात समावेश असेल. जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे ६०० पेक्षा जास्त स्टार्ट अप यात सहभागी होतील.

या परिषदेच्या माध्यमातून एआयवर चर्चा करण्यासाठी जगाला एकत्र आणत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. यानिमित्त आपण जगभरातले नेते, उद्योग क्षेत्रातले दिग्गज, नवोन्मेषक, धोरणकर्ते, संशोधक आणि तंत्रज्ञानप्रेमींचं भारतात स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

****

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नैतिक, सर्वसमावेशक आणि जबाबदारीनं व्हावा यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इंटेल इंडियासोबत मिळून आजपासून देशभरात मोहिम राबवणार आहे. विश्वासार्ह आणि मानव केंद्रित एआय परिसंस्था तयार करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. यावेळी लोकांना एआयचा जबाबदार वापर करण्याबद्दल प्रतिज्ञा दिली जाईल, त्याआधी त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली जाईल.

****

जर्मनीची राजधानी बर्लिन इथं झालेल्या युरोपियन फिल्म मार्केटमध्ये जागतिक सिनेमा विश्लेषक, तंत्रज्ञान नवोन्मेषक आणि धोरणकर्त्यांचं संमेलन पार पडलं. प्रादेशिक चित्रपट पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्लीने धोरणात्मक विषयपत्रिका सादर केल्या. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी फिल्मसिटी उपक्रम, उत्पादन सहाय्य आणि आर्थिक सवलतींचं सविस्तर सादरीकरण केलं. महाराष्ट्र फिल्म स्टेज आणि सांस्कृतिक विकास महामंडळ लिमिटेड यांनी राज्याच्या चैतन्यशील चित्रपट उद्योगाची माहिती दिली. महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परदेशी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

****

नाशिक जिल्ह्यात मालेगाव-मनमाड रस्त्यावर कौळाणे फाट्याजवळ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मालेगाव वनपथकाने संयुक्तरीत्या कारवाई करत एका ट्रकमधून खैराच्या लाकडांच्या आंतरराज्यीय तस्करीचा मोठा डाव उधळला. सुमारे चाळीस लाख रुपये किमतीचा वीस टन लाकडाचा साठा आणि अवजड ट्रक, असा एकूण ८० लाखांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला. ट्रकच्या चालकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. 

****

अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या फक्राबाद इथं दूध संकलन केंद्रात दुधात भेसळ होत असल्याचं निदर्शनास आलं. अन्न आणि ओषध प्रशासन तसंच स्थानिक गुन्हे शाखेनं टाकलेल्या धाडीत केमीकल पासून दूध तयार करुन ते संकलन झालेल्या दुधामध्ये मिसळत असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी या ठिकाणाहून तिघांना ताब्यात घेतलं असून, भेसळीचं इतर साहित्यही जप्त केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्यूकेशनल अकॅडमीच्या वतीने आयोजित ११वा पक्षी महोत्सव येत्या २२ फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान होणार आहे. याअंतर्गत जायकवाडीत पक्षी निरिक्षण, एमआयटी महाविद्यालयात पर्यावरणावरील चित्रपट प्रदर्शन, नेचर वॉक आदी कार्यक्रमांसह पक्षी तज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन टी – ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार नऊ खेळाडु राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया संघाच्या १३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना भारतानं पाच षटक आणि एका चेंडूनंतर एक बाद ५० धावा केल्या होत्या, त्यावेळी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसात भारताला विजयी घोषित करण्यात आलं.

****

हिंगोली इथं आयोजित अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचं विजेतेपद मुबंई पोलिसांनी पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात मुबंई पोलिसांनी इटारसी संघाचा ३-१ असा पराभव केला. छत्रपती संभाजीनगर संघानं या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला. हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आलं.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...