Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 18 February 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
भारत आणि फ्रान्समधला मुक्त व्यापारी करार दोन्ही देशांच्या
सामायिक विकासाचा भविष्यकालीन आराखडा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत हवामान
परिषदेचं उद्घाटन
·
अजित पवार विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची राष्ट्रवादी
काँग्रेसची मागणी
·
राज्यशासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ
साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना तर श्री.पु.भागवत प्रकाशन संस्था पुरस्कार नांदेडच्या
निर्मल प्रकाशनला जाहीर
आणि
·
शिवकालीन आरमार युद्धनौका प्रदर्शनाचं छत्रपती संभाजीनगर
इथं आयोजन
****
भारत आणि
फ्रान्समधला मुक्त व्यापारी करार दोन्ही देशांच्या सामायिक विकासाचा भविष्यकालीन आराखडा
असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल मुंबईत फ्रान्सचे
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्यासोबत पत्रकार परिषदेत बोलत होते. या करारासंदर्भात
बोलतांना पंतप्रधान म्हणाले…
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्यापूर्वी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांची काल मुंबईत लोकभवन
इथं भेट झाली. मॅक्राँ यांचं स्वागत करताना आपल्याला आनंद होत असून, दोन्ही देशाच्या
धोरणात्मक भागीदारीला गती देण्यास भारत उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मॅक्राँ यांनी
२००८ च्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना हॉटेल ताज इथं काल आदरांजली वाहिली.
यावेळी त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन उपस्थित होत्या.
****
भारत जागतिक
भागीदारांसोबत अधिक मजबुतीनं जोडला जात असून, नुकतेच झालेले व्यापार करार म्हणजे देशाच्या
वाढत्या आर्थिक आत्मविश्वासाचे पुरावे आहेत, असं प्रतिपादन परराष्ट्र
मंत्री एस. जयशंकर यांनी केलं आहे. काल मुंबईत ‘ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन २०२६’ या
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित
होते.
****
हवामान
बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून, मुंबई हवामान
परिषद हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे आणि अशा कृती कार्यक्रमांचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र
तयार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबई हवामान परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी
आवश्यक गुंतवणुकीकरता आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि आर्थिक तरतुदीची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. ते म्हणाले…
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याच्या
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
पीएम कुसुम
योजनेत महाराष्ट्रानं केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल घेत, महाराष्ट्रासाठी
आणखी एक लाख पंप मंजूर करण्याची घोषणा प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केली. हवामान कृती
कार्यक्रमात युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पक्षाचे राष्ट्रीय
कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची
भेट घेऊन ही मागणी केली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्याचं
आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
राज्यातल्या
सनदी अधिकाऱ्यांची बदली आणि पदनिश्चितीसाठी राज्यसरकारनं नागरी सेवामंडळाची स्थापना
केली आहे. मुख्य सचिव या मंडळाचे अध्यक्ष असतील तर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव या
मंडळाचे सदस्य सचिव असतील.
****
राज्यशासनाचा
यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना
जाहीर झाला आहे. २०२५ चा साहित्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यक भालचंद्र नेमाडे यांना
देण्यात येणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. दहा लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या दोन्ही पुरस्काराचं
स्वरूप आहे. प्रकाशन संस्थांसाठीचा श्री.पु.भागवत पुरस्कार, नांदेडच्या
निर्मल प्रकाशनला जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि
मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर कलारत्न पुरस्कारासाठी संगीतकार अजय आणि
अतुल गोगावले यांची निवड झाली आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि
पाच लाख रुपये असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. इतरही विविध ३५ पुरस्कारांची घोषणा
सामंत यांनी केली. नाशिक इथं आयोजित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात येत्या २७
फेब्रुवारी रोजी, मराठी भाषा गौरव दिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहेत.
****
दर्यापती
शिवराय या शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृतींचं भव्य मराठा आरमार युद्धनौका प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन
भारतीय नौदलातील सर्जन कॅप्टन मोहन रोटे आणि लिडिंग मरीन इंजिनिअर हसन हुसेन खान यांच्या
हस्ते काल करण्यात आलं. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या दोन दिवसीय
प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती
शिवाजी महाराज हे इतिहासातलं सोनेरी पान आहेत. शिवराय हा तरुणांच्या आचरणाचा विषय झाला
पाहिजे, असं आवाहन प्रसिद्ध वक्ते डॉ. विश्वाधार
देशमुख यांनी केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण आणि
विस्तार विभाग' तसंच विद्यार्थी विकास विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत ते काल बोलत
होते. छत्रपती शिवाजी महाराज : वसा आणि वारसा या विषयावर बोलतांना डॉ देशमुख म्हणाले…
बाईट - डॉ. विश्वाधार देशमुख
या व्याख्यानाचा
संपादित अंश आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल.
****
स्मार्ट
वीजमीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीजदरात दिवसा ऐंशी पैसे ते एक रुपया प्रतियुनिट
सवलत देण्यात येत असून, नागरिकांनी याचा लाभ घेत स्मार्ट मीटर बसवावेत, असं आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. महावितरणतर्फे
राज्यभरात येत्या २३ तारखेपर्यंत सुरू असलेल्या स्मार्ट मीटर पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर
ते बोलत होते. हे मीटर प्री-पेड नसून, पोस्टपेडच असल्याचंही त्यांनी
स्पष्ट केलं.
****
राज्यभरातल्या
एसटी बसेसच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं नवीन सीसीटीव्ही
प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत
सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. परिवहनमंत्री
आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. एकूण सहाशे तेहतीस
ठिकाणी सात हजार पस्तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, यासाठी शासनानं
एकशे अकरा कोटी रुपये निधी दिला आहे.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईच्या दहावी तसंच बारावी परीक्षेला कालपासून सुरुवात झाली.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विविध परीक्षा केंद्रांवर कडक तपासणी आणि शिस्तबद्ध नियोजनात
सुरळीतपणे परीक्षेला सुरुवात झाली. गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रावर कॅमेराची व्यवस्था
करण्यात आली आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात वसमत इथल्या केंब्रिज कॉलेजमध्ये हिंदी विषयाच्या परीक्षेत एका शिक्षकानं
सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून विद्यार्थ्यांना उत्तरं पुरवल्याचं उघडकीसं आलं. याप्रकरणी
वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
बारावी
परीक्षांच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल धर्माबाद
इथं लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा
घेतला. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी केंद्रावर करण्यात
आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
सर्वसामान्य
ग्रामस्थांना शासनाच्या सेवा वेळेत आणि घरपोच पद्धतीनं उपलब्ध करून देणं हा लोकसेवा
हक्क आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचं, आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी म्हटलं
आहे. ते काल धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिल्यानंतर बोलत होते. धाराशिव
जिल्हा प्रशासनानं विकसित केलेल्या व्हॉट्सॲप चॅटबोट आणि ‘तुळजाई’ तक्रार नोंदणी ॲपच्या
माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्तांनी प्रशंसा केली.
****
बीड इथं
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जनजागृती वाहनाचं काल फित कापून उद्घाटन
करण्यात आलं. हे वाहन संपूर्ण जिल्हाभरात अभियानाची जनजागृती करणार आहे.
****
प्रस्तावित
शक्तीपीठ महामार्ग मोजणीला काल लातूर जिल्ह्यातल्या भोकरंबा इथं शेतकऱ्यांनी तीव्र
विरोध दर्शवला. यावेळी एका शेतकऱ्यांनं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment