Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 February
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
आयुष प्रणालीला जागतिक
मान्यता-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन, शेगाव इथं आरोग्य
मेळ्याचं उद्घाटन
·
राज्य शासकीय
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून तीन टक्के वाढ
·
राज्यातल्या
कायदा-सुव्यवस्था आणि अंमली पदार्थाच्या मुद्यावर विधिमंडळात चर्चा
·
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात शिक्षकांच्या ७३ जागांसाठी नव्याने भरती प्रक्रिया होणार
आणि
·
टी – ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत आज भारत- झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका लढत
****
आयुष प्रणालींचं योगदान मोठं असून, आज
जगभर या उपचार पद्धतींना मान्यता मिळत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
म्हटलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन
केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. आयुष उपचार पद्धतींना प्रोत्साहन दिल्यामुळे
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तसंच पर्यावरण रक्षणालाही हातभार लागतो, असं
त्यांनी सांगितलं. आयुष उपचार पद्धतींचे फायदे आणि त्यांच्या प्रचार प्रसारासाठी
सरकारकडून होत असलेल्या विविध प्रयत्नांची राष्ट्रपतींनी माहिती दिली. त्या
म्हणाल्या,
बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, आयुष
राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
तसंच आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा उपस्थित होते. आयुर्वेद सेवाव्रतींचा
गौरव यावेळी करण्यात आला.
नागपूर इथं “एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग”
या, ब्रह्माकुमारीज संस्थेच्या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ काल राष्ट्रपतींच्या
हस्ते झाला. या अभियानाअंतर्गत व्यसनमुक्त समाजनिर्मिती, संतुलित
जीवनशैली, स्वच्छता,
मूल्याधिष्ठित शिक्षण, योग, पर्यावरण
संरक्षण आणि सामाजिक सलोखा यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. या
कार्यक्रमातून नागरिकांना आंतरिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि
मूल्याधिष्ठित विकासाची प्रेरणा मिळेल, असं राष्ट्रपती यावेळी
म्हणाल्या.
****
राज्यातल्या शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई
भत्त्यात जुलै २०२५ पासून तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी काल विधानपरिषदेत ही घोषणा केली. हा महागाई भत्ता
आता ५५ वरून ५८ टक्के होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याचा फायदा पाच लाख १६
हजार कार्यरत कर्मचाऱ्यांना, तर आठ लाख ७२ हजार निवृत्त
कर्मचाऱ्यांना होईल,
अशी माहिती जैस्वाल यांनी दिली.
**
विधानसभेत काल राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद
प्रस्तावावर चर्चा झाली. यावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, राज्यातल्या
कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, शाळा बंद पडत आहेत, पण
यातला एकही मुद्दा राज्यपालांच्या अभिभाषणात आला नाही अशी टीका केली. आश्वासन
देऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, सरकार केवळ घोषणाबाजी करत
आहे असं वडेट्टीवार म्हणाले.
राज्यात बेरोजगारीत वाढ होत असून, देशाच्या
अर्थव्यवस्थेत राज्याचा वाटा कमी होत असल्याचं राज्यपालांनी कबूल केल्याचं, राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यावेळी म्हणाले.
शिवसेना आमदार निलेश राणे आणि कॉंग्रेस नेते अमिन पटेल
यांनी राज्यात अंमली पदार्थांचा प्रश्न गंभीर बनल्याचं सांगितलं. शेखर निकम, विनय
कोरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
****
ऑनलाईन गेमिंगबाबत सरकार गंभीर असून, त्यासाठी
एक कृती दल स्थापन केल्याची माहिती, माहिती आणि तंत्रज्ञान
मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत दिली. ऑनलाईन गेम्स आणि मोबाईलच्या
व्यसनामुळे बालकांचं मानसिक, शैक्षणिक, सामाजिक आरोग्य
धोक्यात आल्यासंदर्भात आमदार निरंजन डावखरे आणि संजय केणेकर यांनी लक्षवेधी सूचना
मांडल्या. पालकांना digital
literacy आणि बालकांना digital diet गरजेचं
असल्याचं शेलार यांनी नमूद केलं.
**
रोजगार हमी योजनेतल्या कोणत्याही रोजगार सेवकाला कामावरून
कमी केलं जाणार नाही,
असं मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत स्पष्ट केलं.
मागणीनुसार काम देण्याचं धोरण कायम राहील आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला
जाणार नाही,
असं ते म्हणाले.
****
महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरची
एचपीव्ही लस आता मोफत करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं देशभरातल्या १४ वर्षांखालील
मुलींना मोफत लसीकरण कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. सरकारी रुग्णालयं, जिल्हा
रुग्णालयं,
समुदाय आरोग्य केंद्रं आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांत ही लस
उपलब्ध होणार आहे. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी लोकसभेत खाजगी
विधेयक सादर करुन राष्ट्रीय स्तरावर ही लस मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली
होती.
****
राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी युतीकडून आपण पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचं
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. ते काल परभणीत पत्रकार परिषदेत
बोलत होते.पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असून, भारत
येत्या काही दिवसात तिसऱ्या क्रमांकावर पोहचेल, असं आठवले म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात शिक्षक प्रवर्गाच्या ७३ जागांसाठी राज्य शासनाच्या नवीन नियमावली, कार्यपद्धतीप्रमाणे
भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्यांना नव्याने ‘एटीआर’
भरावा लागणार असून,
नवीन उमेदवारांना देखील अर्ज दाखल करता येईल, अशी
माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली. यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातल्या
आठ, सहयोगी प्राध्यापक पदाच्या १२, तर सहाय्यक
प्राध्यापकांच्या ५३ जागांचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलच्या
माध्यमातून आजपासून ते १२ मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
****
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ
महामार्गाविरोधात सुरू असलेलं शेतकऱ्याचं उपोषण मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज
जरांगे पाटील यांनी सोडवलं. यावेळी त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांच्याशी फोनवरून सवांद साधला. शक्तीपीठ महामार्गातील अडचणींवर तोडगा काढण्यासाठी
येत्या पाच तारखेला मुंबईत बैठक होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण
जीवनोन्नती अभियानाअंतर्गत विभागीय, जिल्हास्तरीय आणि मिनी सरस
प्रदर्शनाचं काल पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या
प्रदर्शनात एकूण १५० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था –
बार्टी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जालना
जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती प्रवर्गातल्या युवक – युवतींसाठी तांत्रिक उद्योजकता
विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये वेब डिझायनिंग, सायबर
सिक्युरिटी ॲण्ड डेटाबेस रिकव्हरी, ॲनिमेशन आणि ग्राफिक्स या
विषयांचा समावेश आहे. इच्छुकांनी जालना इथल्या महाराष्ट्र उद्योकजता विकास
केंद्राच्या कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज 'राज्यघटनेतील
सेक्युलरिझमचा अर्थ'
या विषयावर ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांचं विशेष
व्याख्यान होणार आहे. विद्यापीठातल्या सामाजिकशास्त्र संकुलात हा कार्यक्रम होईल.
****
धाराशिव इथं बालरोगतज्ञ संघटना, जिल्हा
परिषद दिव्यांग विभाग आणि टाटा पॉवर कम्यूनिटी डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने
स्वमग्न मुलांच्या पालकत्वाबाबत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशा प्रकारची
जिल्ह्यातली ही पहिलीच कार्यशाळा असून उद्या
२७ तारखेला धाराशिव जिल्हा रुग्णालयात होणार आहे.
****
हिंगोलीत २८ फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी ग्रंथोत्सवाचं
आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते
ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार असून, साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या
हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
****
टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतल्या सुपर आठ फेरीत
आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईत संध्याकाळी सात वाजता
या सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान
अहमदाबाद इथं होणार आहे.
****
No comments:
Post a Comment