Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रीय गीत वंदे मातरम् संदर्भात केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी
· संसदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला
पुन्हा प्रारंभ-अनेक सदस्यांचा चर्चेत सहभाग
· मुंबईत संगीतमय रस्त्याचं मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते लोकार्पण
· भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या
महापौरपदी बिनविरोध निवड
आणि
· बीड जिल्ह्यात चौसाळा कॉपी प्रकरणात
संबंधितांविरोधात कारवाईचे निर्देश
****
केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भात नव्या मार्गदर्शक
सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सरकारी कार्यक्रम, शैक्षणिक संस्था तसंच
इतर महत्त्वाच्या कार्याक्रमांमधे जन गण मन या राष्ट्रगीतानंतर लगेच वंदे मातरम् गीत
वाजवणं अनिवार्य असेल, यापूर्वी वंदे मातरम् गीताची दोनच
कडवी प्रचलित होती, आता मात्र या गीताची सर्व कडवी वाजवावीत, असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या आगमन-प्रस्थानाच्या
वेळी, त्यांच्या भाषणापूर्वी आणि नंतर तसंच राष्ट्रध्वजारोहणाच्या
वेळी हा नियम लागू राहील, असंही या सूचनांमध्ये म्हटलं आहे.
****
लोकसभेत अर्थसंकल्प २०२६-२७ वर चर्चा पुढे सुरू झाली. लोकजन
शक्ती पार्टी रामविलासचे अरुण भारती यांनी चर्चेत सहभागी घेत, हा देशाच्या विकासाचा संकल्प असून, २०४७ पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य
पूर्ण करण्यासाठी हा अर्थसंकल्प आधारभूत ठरेल असं म्हटलं आहे.
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे इंद्र हांग सुब्बा यांनी यावर
बोलतांना, अर्थसंकल्पात समाजातला प्रत्येक घटक केंद्रीत असून यात उद्योग
क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतूदी स्वागतार्ह असल्याचं मत व्यक्त केलं.
शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी, हा अर्थसंकल्प शेतीला
पाणी, युवकांना रोजगार, महिलांना सन्मान, आणि गरीबांना राशन देणारा असल्याचं नमूद केलं.
भाजपाचे सुधीर गुप्ता यांनी हा अर्थसंकल्प प्रशंसनीय असून २०४७
पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं मत व्यक्त केलं तर
केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या जनतेसाठी काहीही ठोस तरतुदी नसल्याचं मत आम आदमी पार्टीचे
डॉक्टर राजकुमार छब्बेलाल यांनी व्यक्त केलं.
राज्यसभेतही अर्थसंकल्पावर चर्चा झाली, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी, हा अर्थसंकल्प फक्त आकड्यांसाठी
नाही, तर अर्थव्यवस्था सशक्तीकरणासाठी घेतलेल्या निर्णयांकरता स्मरणात
राहिल, असं नमूद केलं. तर भाजपचे अशोक चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प युवक
केंद्रीत असून, उद्योजक, शेतकरी, महिला, तसंच वंचित घटकांना सशक्त करणारा असल्याचं म्हटलं.
काँग्रेसचे राजीव शुक्ला यांनी, अमेरिकेसोबतचा करार झाल्यानंतर
अर्थसंकल्प सादर झाल्याची टीका करत, सुधारित अर्थसंकल्प किंवा पूरक अर्थसंकल्प
सादर करण्याची मागणी केली.
****
इंडिगो विमान कंपनीला नागरी विमानवाहतूक संचालनालयानं नियमात
दिलेली सवलतीची मुदत काल संपली. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे गेल्या डिसेंबर महिन्यात
इंडिगोच्या वाहतुकीत गोंधळ होऊन प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्यामुळे कंपनीला नियमातून
तात्पुरती सूट देण्यात आली होती, ती मुदत काल संपल्याचं, नागरी वाहतूक विमान संचालनालयानं म्हटलं आहे.
****
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताची
संबंधित यंत्रणांकडून संपूर्ण तपास आणि चौकशी सुरू आहे, तरी याचा राजकीय हेतूने
वापर होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी आज ते बोलत होते. राष्ट्रवादी
काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यांनी यासंदर्भात घेतलेल्या
पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने ते बोलत होते.
****
देशातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होते
आणि आता ही गुंतवणूक देशातच नव्हे तर जगभरातले विक्रम मोडणारी ठरत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज एका कार्यक्रमात ते बोलत होते. आर्थिक
व्यवस्थेला उत्सवाचं स्वरूप दिल्यामुळेच राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार झालं असल्याचं
ते म्हणाले.
****
मुंबईत आज एका संगीतमय रस्त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
करण्यात आलं. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती दिली -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
‘जागतिक कृषी क्षेत्रातील
कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’ ही परिषद मुंबईत २२ आणि २३
फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुंबईत
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणाऱ्या या संमेलनात
कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था, सहभागी होणार आहेत.
****
मुंबईत येत्या १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हवामान परिषदेचं
प्रथमच आयोजन करण्यात येणार आहे. देश परदेशातले प्रमुख नेते, उद्योग जगतातले आघाडीचे प्रतिनिधी, हवामान क्षेत्रातले नवोन्मेषक, आणि प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.
****
भाजपच्या रितू तावडे यांची आज मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध
निवड झाली, तावडे यांनी महापौर पदाचा तर शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौर
पदाचा कार्यभार आज स्वीकारला. यावेळी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे नवनिर्वाचित महापौर समीर राजुरकर
यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस
यांनी महापौर राजुरकर यांचं अभिनंदन करत छत्रपती संभाजीनगर शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी
शुभेच्छा दिल्या.
****
बीड जिल्ह्यातील चौसाळा या गावात, परीक्षा केंद्रामध्ये
पालकांकडूनच बारावीच्या विद्यार्थ्याला कॉपी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी
बीड जिल्हा प्रशासनाच्या पथकाने संबंधित केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेतले
असून महसूल विभागाच्या पथकाच्या अहवालानुसार संबंधित केंद्र प्रमुख आणि संबंधित शिक्षक
यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा पोलीस
प्रशासनाला दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात जैतापूर इथं
सामुहिक कॉपीचा प्रकार काल उघड झाला, या प्रकरणी संबंधितांवर निलंबनाची
कारवाई केली जात आहे.
****
एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू
करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक
यांनी आज ही माहिती दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट
कार्ड अनिवार्य असणार आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती
आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी या कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत
****
हिंगोली जिल्हा पोलीस दलातल्या ६४ पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला
आजपासून सुरुवात झाली. आजच्या पहिल्याच दिवशी सुमारे ९०० उमेदवार चाचणीसाठी बोलावण्यात
आले. संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे
राबवण्यात येत असून कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी केलं
आहे.
****
बीड इथेही पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला, या चाचणीदरम्यान १६०० मीटर धावण्याच्या चाचणीनंतर एका उमेदवाराची प्रकृती बिघडली.
दीपक भास्कर वाव्हळे या २६ वर्षीय उमेदवाराचं नाव आहे. त्याचा उपचारासाठी शासकीय रुग्णालयात
पाठवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सर्व उमेदवारांनी पुरेसा आहार आणि पुरेसं पाणी प्यावं, आणि आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत
यांनी दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या १५ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीपर्यंत
घेण्यात आलेल्या सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानामध्ये आत्तापर्यंत १ लाख ६३ हजार २८५
चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यात एकूण ५ जणांना या आजाराची लागण झाल्याचं
स्पष्ट झालं असून काही संशयित चाचण्यांचे अहवाल बाकी आहेत. हे अभियान पूर्ववत सुरू
ठेवण्याची सूचना आरोग्य विभागाच्या संचालकांनी केली आहे.
****
आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. सामन्यात बरोबरी झाल्यानं सुपर ओव्हर खेळवण्यात
आली, ती देखील अनिर्णित राहिल्यानं दुसरी सुपर ओव्हर घेण्यात आली, त्यात दक्षिण आफ्रिका संघ विजयी झाला.
या स्पर्धेत श्रीलंकेत कोलंबो इथं ऑस्ट्रेलियाचा सामना आयर्लंडबरोबर
सुरू असून, मुंबईच्या वानखेडे मैदानावर इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज हा
सामना संध्याकाळी सात वाजता होणार आहे.
****
राज्यात आज झालेल्या
दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. मंगळवेढा-पंढरपूर
पालखी मार्गावर एसटी बस आणि पिकअप टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा
जागीच मृत्यू झाला तर बसमधल्या सहा शाळकरी
विद्यार्थ्यांसह बसचा चालक किरकोळ जखमी झाला.
वाशीम जिल्ह्यातल्या रिसोड मेहकर मार्गावर सरपखेडा फाट्याजवळ टँकर आणि दुचाकीच्या अपघातामध्ये एका कृषी मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.
****
No comments:
Post a Comment