Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त
परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्य- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात
राज्यपालांचं प्रतिपादन
· उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह
दिवंगत सदस्यांना विधीमंडळात श्रद्धांजली
· “शेतकरी” व्याख्येत महिलांचा समावेश करावा-कृषी एआय परिषदेची शिफारस
आणि
· जालना इथं पाच बालकामगारांची सुटका-एका
आस्थापना मालकावर गुन्हा दाखल
****
स्थूल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचं योगदान साडेतेरा टक्के
असून देशात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्यही महाराष्ट्रच असल्याचं
प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यावेळी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर केलेल्या
अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. २०२५-२६ च्या पहिल्या
तिमाहीत ९१ हजार ३२७ कोटींची गुंतवणूक राज्यात आली, त्यामुळे महाराष्ट्र हे
उद्योगधंद्यात अग्रगण्य राज्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या महिन्यात दावोस इथं
झालेल्या जागतिक परिषदेत राज्य सरकारनं विविध देशांमधल्या १८ कंपन्यांसोबत तीस लाख
कोटी रुपयांचे करार केले, यामुळे ४० लाख रोजगार निर्माण होणार
आहेत, असं राज्यपालांनी सांगितलं. उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी
सरकारनं आखलेल्या विविध धोरणांची माहिती राज्यपालांनी दिली. ते म्हणाले -
बाईट - राज्यपाल आचार्य देवव्रत
राज्यातल्या कृषी क्षेत्राच्या विकासालाही सरकारनं प्राधान्य
दिलं आहे, त्यासाठी मागेल त्याला सौरपंप, मोफत वीज आदी योजना राबवल्या
जात आहेत, असं राज्यपाल म्हणाले. महिला, आदिवासी, मागास समूहाच्या प्रगतीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत, या सर्व घटकांसाठी सरकार राबवत असलेल्या धोरणांची माहिती राज्यपालांनी दिली.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध
असल्याची ग्वाही देत, राज्याच्या सीमावर्ती भागातल्या नागरिकांच्या
हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती
दिली. ते म्हणाले
-
बाईट - राज्यपाल आचार्य देवव्रत
त्यानंतर विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांची सभागृहाला
ओळख करून दिली. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. अजित पवार यांच्यासारख्या सहकाऱ्याचं निधन होणं
ही बाब केवळ राजकीयच नव्हे तर व्यक्तिशः प्रचंड वेदनादायक असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केली. अजित पवार यांच्या अनेक आठवणींना मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला. अजित पवार
हे महाराष्ट्राला न लाभलेले सक्षम मुख्यमंत्री होते, असं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. ते म्हणाले -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत अजित पवार यांच्या
निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला. यावेळी शिंदे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गुणगौरव
केला. दादांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं सांगत शिंदे यांनी, ‘विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ही दादांची घोषणा सत्यात उतरवू, असा निर्धार व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे यांनी विधान परिषदेत तर
मंत्री छगन भुजबळ, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनीही विधानसभेत अजित पवार यांच्या आठवणी जागवल्या.
विधीमंडळाच्या इतर दिवंगत सदस्यांनाही आज श्रद्धांजली अर्पण
करण्यात आली.
****
संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन केलं
जात आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोकभवन इथं संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या
निवासस्थानी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
मुंबईत महाराष्ट्र सदन इथं सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी संत गाडगेबाबा महाराज
यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत महापौर समीर राजुरकर यांनी
गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु
डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते गाडगे बाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
करण्यात आलं.
अनेक ठिकाणी रस्त्यांसह सार्वजनिक उद्यानांची स्वच्छता करून, गाडगेबाबांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
“शेतकरी” या व्याख्येत
महिलांचा समावेश करून, समान वेतन, अनुकूल कर्ज आणि विस्तार सेवा उपलब्ध करून द्यावी अशी शिफारस कृषी तज्ज्ञांनी केली
आहे. मुंबई इथं सुरू असलेल्या जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार
शिखर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘समतेसाठी कोडिंग: लिंग-संवेदनशील
कृषी-एआय परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय’ या विषयावर समांतर सत्र पार पडले.
महिला स्वयंसाहाय्य गट आणि स्थानिक संस्थांचा उपयोग करून महिलांना डिजिटल प्रशिक्षण
आणि साधने देण्याची शिफारस यावेळी करण्यात आली.
****
राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजना
ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात येत आहे. त्यानुसार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
फुलंब्री तालुक्यात रिधोरा देवी या गावातील पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेचं ग्रामपंचायतीकडे
हस्तांतरण करण्यात आलं. यानिमित्त गावात जल अर्पण दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांच्यासह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित
होते. यावेळी गावातील महिलांनी जलपूजन करून डोक्यावर जलकलश घेऊन शालेय विद्यार्थ्यांसोबत
फेरी काढली. प्रभातफेरी, ग्रामसभा, जलप्रतिज्ञा आणि पाणी
शुद्धीकरण प्रात्यक्षिक यासारखे उपक्रम यावेळी घेण्यात आले.
****
जालना इथं आज पाच बालकामगारांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी
एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या
आदेशानुसार, जिल्हा बालकामगार अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाद्वारे
शहरातल्या विविध दुकाने, हॉटेल्स आणि छोट्या उद्योगांवर अचानक
छापे टाकण्यात आले. या पथकात चाईल्ड हेल्पलाईन, पोलीस प्रशासन तसेच आरोग्य
आणि शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. जिल्ह्यात बालकामगार आढळल्यास नागरिकांनी
तत्काळ १०९८ या चाईल्डलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
यांनी केलं आहे.
****
मुंबई इथल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे
आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान २०२६ वितरण सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार
सोहळ्यात छत्रपती संभाजीनगर इथल्या जयविश्वकर्मा सर्योदय संस्थेला राष्ट्रीय कुष्ठरोग
निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्यानिमित्त सन्मानित करण्यात आलं. पन्नास
हजार रूपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, अशा स्वरूपाचा हा पुरस्कार
संस्थेच्या अध्यक्ष मंदाकिनी चौकडे आणि सचिव विलास चंदने यांना देऊन गौरवण्यात आलं.
****
अंबाजोगाई तालुक्यात मुडेगाव इथं आज वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचं मोठ्या
प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानाचा तहसील कार्यालयाकडून पंचनामा करण्यात यावा अशी मागणी
गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
लातूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पाऊस झाला. अहमदपूर, निलंगा, औसा आणि उदगीर तालुक्यातल्या अनेक भागात पाऊस पडला असून, यामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने
आगामी काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी
घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
सोलापूर, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांसह विदर्भातल्या काही जिल्ह्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली.
मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या दोन
दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान
विभागानं व्यक्त केली आहे.
****
टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर आठ मध्ये आज वेस्ट
इंडीज आणि झिम्बॉब्वे यांच्यात सामना होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी
सात वाजता या सामन्याला सुरूवात होईल.
****
No comments:
Post a Comment