Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· भारत आणि फ्रान्समधला मुक्त व्यापारी
करार दोन्ही देशांच्या सामायिक विकासाचा भविष्यकालीन आराखडा असल्याचं पंतप्रधानांचं
प्रतिपादन
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते मुंबई हवामान परिषदेचं उद्घाटन
· शिवकालीन आरमार युद्धनौका प्रदर्शनाचं
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजन
आणि
· स्मार्ट वीजमीटर बसवणाऱ्या घरगुती
ग्राहकांना वीजदरात सवलत जाहीर
****
भारत आणि फ्रान्समधला मुक्त व्यापारी करार दोन्ही देशांच्या
सामायिक विकासाचा भविष्यकालीन आराखडा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. ते आज मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्यासोबत पत्रकार
परिषदेत बोलत होते. या करारासंदर्भात बोलतांना पंतप्रधान म्हणाले -
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
इमॅन्युअल मॅक्राँ यांची आज मुंबईत लोकभवन इथं भेट झाली. मॅक्राँ यांचं स्वागत करताना
आपल्याला आनंद होत असून दोन्ही देशाच्या धोरणात्मक भागीदारीला गती देण्यास भारत उत्सुक
असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मॅक्राँ यांनी २००८ च्या दहशतवादी
हल्ल्यातल्या हुतात्म्यांना हॉटेल ताज इथं आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्या पत्नी
ब्रिजिट मॅक्रॉन उपस्थित होत्या.
****
भारत जागतिक भागीदारांसोबत अधिक मजबुतीनं जोडला जात असून नुकतेच
झालेले व्यापार करार म्हणजे देशाच्या वाढत्या आर्थिक आत्मविश्वासाचे पुरावे आहेत, असं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केलं आहे. आज मुंबईत ‘ग्लोबल इकॉनॉमिक
को-ऑपरेशन 2026’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
****
हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या
प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई हवामान परिषद हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे आणि
अशा कृती कार्यक्रमांचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई हवामान परिषदेच्या उद्घाटन
प्रसंगी ते आज मुंबईत बोलत होते. हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी आवश्यक गुंतवणुकीकरता
आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि आर्थिक तरतुदीची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे उपस्थित
होते.
पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्रानं केलेल्या प्रभावी कामगिरीची
दखल घेत, महाराष्ट्रासाठी आणखी एक लाख पंप मंजूर करण्याची घोषणा केंद्रीय
मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केली. हवामान कृतीसाठी शासन, शहर संस्था आणि नागरिक यांची भागीदारी आवश्यक असून युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा
असल्याचं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.
यावेळी, मुंबई हवामान अनुकूल आराखडे तयार करण्यासंदर्भात
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम यांच्यात
सामंजस्य करार करण्यात आला.
****
कृत्रिम बुद्धिमत्ता ही पाचवी औद्योगिक क्रांती असल्याचं केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. इंडिया एआय इंपॅक्ट शिखर
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी
बोलत होते.
दरम्यान, या परिषदेत आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
आरोग्यक्षेत्रातल्या वापरासंदर्भात, सही आणि बोध या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय
उपक्रमांचा प्रारंभ झाला. स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थकेअर फॉर
इंडिया म्हणजे ‘सही’ आणि बेंचमार्किंग ओपन डेटा प्लॅटफॉर्म फॉर हेल्थ एआय म्हणजेच
‘बोध’ असे हे दोन उपक्रम आहेत. भारताच्या आरोग्यसेवा प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा
सुरक्षित, नैतिक, प्रमाणाधारित आणि सर्वसमावेशक वापर
करण्यासाठीची मार्गदर्शक चौकट म्हणून ‘सही’ उपक्रम काम करणार आहे. तर, ‘बोध’ हे गोपनीयतेचं संरक्षण करणारं व्यासपीठ आहे. जागतिक स्तरावर एक जबाबदार आणि
स्पर्धात्मक आरोग्य एआय परिसंस्था तयार करण्याच्या दिशेनं देशानं टाकलेलं हे एक महत्त्वपूर्ण
पाऊल आहे.
****
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी
आज जयपूर इथं देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी ‘भारत-विस्तार’ या एआय आधारित डिजिटल सहकारी
प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला. या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव, कीटक-रोग, माती, पीक सल्ला आणि सरकारी
योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. याअंतर्गत फोन कॉल, चॅटबॉट्स आणि नंतर अॅप
विकसित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हिंदी आणि इंग्रजी भाषेतून शेतकऱ्यांना
सेवा मिळणार असून, टप्प्याटप्प्याने प्रादेशिक भाषांचा
यात समावेश करण्यात येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आज स्मृतिदिन आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. अनेक क्रांतिवीरांना
घडवणारे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचाही आज स्मृतिदिन असून, उपमुख्यमंत्र्यांनी लहुजी साळवे यांना आदरांजली वाहिली आहे.
****
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय
चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल
पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ
पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली. ही मागणी विचारात घेऊन उद्याच
केंद्र सरकार आणि गृहमंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी
दिलं आहे.
****
राज्यातल्या सनदी अधिकाऱ्यांची बदली आणि पदनिश्चितीसाठी राज्यसरकारनं
नागरी सेवामंडळाची स्थापना केली आहे. मुख्य सचिव या मंडळाचे अध्यक्ष असतील तर सामान्य
प्रशासन विभागाचे सचिव या मंडळाचे सदस्य सचिव असतील.
****
दर्यापती शिवराय या शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृतींचे भव्य
मराठा आरमार युद्धनौका प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन भारतीय नौदलातील सर्जन
कॅप्टन मोहन रोटे आणि लिडिंग मरीन इंजिनिअर हसन हुसेन खान यांच्या हस्ते आज करण्यात
आलं. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन
केले आहे.
****
स्मार्ट वीजमीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीजदरात दिवसा
ऐंशी पैसे ते एक रुपया प्रतियुनिट सवलत देण्यात येत असून, नागरिकांनी याचा लाभ घेत
स्मार्ट मीटर बसवावेत, असं आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता
पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. महावितरणतर्फे राज्यभरात येत्या २३ तारखेपर्यंत सुरू
असलेल्या स्मार्ट मीटर पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं आहे. हे
मीटर प्री-पेड नसून, पोस्टपेडच असल्याचंही त्यांनी स्पष्ट
केलं आहे.
****
राज्यभरातल्या एसटी बसेसच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग
परिवहन महामंडळानं अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन सीसीटीव्ही प्रकल्प हाती घेतला
आहे. यामध्ये एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या
ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री आणि एसटी
महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एकूण सहाशे तेहतीस ठिकाणी सात हजार
पस्तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी शासनानं एकशे अकरा
कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचंही नाईक यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रात विविध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांची वाढती
उपस्थिती लक्षात घेत २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा
ऑटो क्लस्टर इथं एमएसएमई ईव्ही लीडरशिप बूट कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. हा दोन दिवसीय
बूटकॅम्प डब्लूआरआय इंडिया यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईच्या दहावी तसंच बारावी
परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर
कडक तपासणी आणि शिस्तबद्ध नियोजनात परीक्षा सुरळीतपणे सुरु झाली. गैरप्रकार टाळण्यासाठी
केंद्रावर कॅमेराची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment