Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी
निवडणूक कार्यक्रम जाहीर-महाराष्ट्रातल्या सात जागांचा समावेश
· राज्यात मुस्लिम समाजासाठी पाच टक्के
आरक्षण लागू करणाऱ्या अध्यादेशाची मुदत समाप्त
· आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आपत्ती
व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार
· छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त
राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
· टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
आज भारत नामिबिया संघात लढत
****
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक
आयोगानं द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये
महाराष्ट्रातल्या सात जागांचा समावेश असून, शरद पवार, डॉ. भागवत कराड, डॉ. फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिल रोजी पूर्ण
होत आहे. या निवडणुकीची २६ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून येत्या १६
मार्च ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख पाच
मार्च असेल, अर्जांची छाननी सहा मार्च रोजी होईल आणि नऊ मार्च पर्यंत उमेदवारी
अर्ज मागे घेता येतील.
महाराष्ट्राबरोबरच ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगढ, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या दहा
राज्यातल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
****
जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचं निराकरण कृत्रिम बुद्धीमत्तेच्या
माध्यमातून करण्यावर भारत लक्ष केंद्रीत करत असल्याचं, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स
आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सुरू
असलेल्या इंडिया एआय समिटमध्ये संशोधन परिसंवादाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते आज
बोलत होते. देशातल्या उद्योगांमधील उत्पादकता वाढावी तसंच आरोग्य, कृषी आणि हवामान बदल या क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाला
प्रधान्य दिलं जात असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
****
राज्यात मुस्लिम समाजासाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये पाच टक्के
आरक्षण लागू करणाऱ्या अध्यादेशाची मुदत संपली आहे. तत्कालीन काँग्रेस - राष्ट्रवादी
काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजासाठी १६ टक्के आणि मुस्लिम समाजासाठी ५ टक्के आरक्षणाची
तरतूद करणारा अध्यादेश काढला होता. त्याचा कालावधी समाप्त झाला असून आरक्षणाचा प्रश्न
न्यायप्रविष्ट असल्यानं हे आरक्षण रद्द करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
राज्यातलं महायुती सरकार अल्पसंख्याक विरोधी असल्याची टीका काँग्रेसच्या
राज्य कार्यकारिणीचे सदस्य नसीम खान यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुस्लिमांसाठीचं ५ टक्के
आरक्षण या सरकारने पुढं चालू ठेवलेलं नाही तसंच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या
अनेक कल्याणकारी योजना थांबवल्याचा आरोपही नसीम खान यांनी केला.
****
प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांनी आज राज्य
लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. लोकभवन इथं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी
भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भीमनवार यांची सहा वर्षांसाठी या पदावर
नियुक्ती करण्यात आली आहे.
****
अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांना पदावरुन
काढून टाकण्यात आलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ७५ शैक्षणिक
संस्थांना घाईघाईत अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या प्रकरणावरून ही कारवाई करण्यात आली.
शेणॉय यांना सध्या इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
****
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या दोन लाख विद्यार्थ्यांना आता
टप्याटप्यानं आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण मिळणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात
लोढा यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’
आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात आज मुंबई इथं सामंजस्य करार करण्यात
आला. राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह
आपत्ती व्यवस्थापनाचं विना शुल्क प्रशिक्षण देणार असल्याचं अकादमीचे मुख्य कार्यकारी
अधिकारी सुनील मंत्री यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला परवा शुक्रवारपासून
सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी बोर्डाची तयारी पुर्ण झाली आहे. शंभर टक्के कॉपीमुक्त
अभियान राबविण्यासाठी परीक्षेची तयारी करण्यात आली आहे. २० फेब्रुवारी ते १८ मार्च
दरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू
असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेची
पारदर्शकता अबाधित राहावी यासाठी १६० दक्षता पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथकं जिल्ह्यातील
१६० परीक्षा केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.
जिल्हाभर दररोज सरासरी सहा ते सात परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष
भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची
टोकन पद्धतीने तपासणी, प्रवेशद्वारावर शारीरिक तपासणी, हॉलतिकिट तसंच ओळखपत्रांची पडताळणी, परीक्षा कक्षातील आसनव्यवस्था तसेच
सीसीटीव्ही यंत्रणांची पाहणी यांचे बारकाईने चित्रीकरण केलं जात आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या साजरी होत आहे. त्यानिमित्ताने
राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात मिरवणुका, मशाल रॅली यासह व्याख्यानं
आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आज संध्याकाळपासून शहरातले अनेक मार्ग वाहनांसाठी
बंद राहणार आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसाडी इथल्या जिल्हा
परिषद शाळेत जवळपास चारशे विद्यार्थ्यांच्या सहभागातून कार्ड बोर्ड वापर करून छत्रपती
शिवरायांची भव्य कलाकृती साकारण्यात आली. श्री सारंग स्वामी विद्यालय आणि शिवमुद्रा
प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आज विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून
शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारत मानवंदना अर्पण केली.
****
बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनंही शिवजयंतीनिमित्त आज आणि उद्या
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या शाहिरी लोकधारा हा सांस्कृतिक
कार्यक्रम होणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं
लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग उद्या
बंद राहणार आहे. मात्र आपत्कालीन सेवा २४ तास सुरु राहणार असल्याचं रुग्णालयाच्या अधीक्षकांनी
कळवलं आहे.
****
सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठअंतर्गत
स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ५० लाख रुपयांच्या
निधीला मंजुरी दिली आहे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार
यांनी ही माहिती दिली. हे अध्यासन मालवण इथं स्थापन होणार आहे.
****
क्रिकेट
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात भारताचा सामना
नेदरलँडसबरोबर होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर संध्याकाळी ७ वाजता
हा सामना सुरु होईल.
दिल्लीत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं संयुक्त अरब अमिरातीवर
६ गडी आणि ४० चेंडू राखून विजय मिळवला.
सध्या श्रीलंकेत कोलंबो इथं पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात
सामना सुरू आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष
२०२६-२७ साठी महाविद्यालयांच्या संलग्नता अर्ज प्रक्रियेसाठी ई-समर्थ पोर्टल कार्यान्वित
केलं आहे. ज्या महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता अद्याप
स्थगित आहे, त्यांनी २ मार्चपर्यंत प्रस्ताव शैक्षणिक विभागाकडे सादर करावेत.
त्यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असं विद्यापीठाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
राज्यातल्या वाहनधारक आणि चालकांनी बनावट वेबसाईट्स, ॲप्स आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचं आवाहन परिवहन विभागाने केलं आहे.
वाहन चालक परवाना, नोंदणी, ई-चलन यांसारख्या सेवांच्या
नावांखाली सायबर चोर अशा मार्गांनी नागरिकांची वैयक्तिक माहिती काढून फसवणूक करत असल्याच्या
पार्श्वभूमीवर विभागाने हे आवाहन केलं. वाहन नोंदणी अथवा वाहन, चालक परवाना काढायचा असेल तर सारथी आणि ई-चलनासाठी परिवहनाच्या अधिकृत संकेतस्थळाचा
वापर करावा, असं विभागाने म्हटलं आहे.
****
पुण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ११ बांगलादेशी महिलांना पुणे
पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. या महिलांकडे बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रं आढळून
आली, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
****
माझी वसुंधरा अभियान ५ मध्ये नाशिक विभागात सर्वोत्तम कामगिरी
केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रथम क्रमांकाचा
पुरस्कार जाहीर झाला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना एक कोटी
पन्नास लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत.
****
No comments:
Post a Comment