Saturday, 7 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 07 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज सकाळी साडे सात वाजेपासून मतदान सुरू आहे. मतदानासाठी शांततेत रांगा लागल्या असून, नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नागरिकांना मतदान करण्याचं  आवाहन केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळपासून शांततेत मतदान सुरू असून सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत २२ टक्के तर सांगलीत २० पुर्णांक ३० शतांश टक्के मतदान झालं. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबाद वाडी आणि गणोरी इथल्या मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याच दरम्यान त्यांनी सावंगी-हर्सूल इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील केंद्रालाही भेट दिली. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद इथं मतदान केलं. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजनी इथं, औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी कासार शिरशी इथं तर उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी मलकापूर इथं सपत्नीक मतदान केलं, तसंच बाभुळगाव इथं माजी आमदार धीरज देशमुख यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

****

मुंबई महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय मलेशिया दौऱ्यासाठी आज रवाना झाले. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी होणाऱ्या चर्चेत दोन्ही देशांचे सुरक्षा आणि संरक्षणातील सहकार्य, आर्थिक आणि नाविन्यपूर्ण संबंध वाढवणं, तसंच परस्पर हिताची उद्योन्मुख क्षेत्र आदी बाबींवर भर दिला जाणार असल्याचं पंतप्रधानांनी रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

****

रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षात वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन- जीडीपी वाढ ७ पुर्णांक ४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. डिसेंबरमधील ७ पुर्णांक ३ टक्क्यांवरून हा अंदाज कमी झाला आहे. जागतिक व्यापार अनिश्चितता आणि वित्तीय बाजारातील अस्थिरता असूनही देशांतर्गत मागणी सुरू असल्याचे या अंदाजातून दिसून येते. पुढील आर्थिक वर्षात, म्हणजेच २०२६-२७ मध्ये, पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ ६ पुर्णांक ९ टक्के आणि दुसऱ्या तिमाहीत ७ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार हा भारताच्या आर्थिक प्रवासातील एक महत्त्वाचा धोरणात्मक टप्पा असल्याचे म्हटलं आहे. या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, कामगार-केंद्रित क्षेत्रे मजबूत होतील, उच्च दर्जाची गुंतवणूक आकर्षित होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. हा करार देशातील शेतकरी आणि शेतीला सुरक्षा प्रदान करणारा असल्याचं सांगत रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक संधी निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.

****

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत, सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांत ३ कोटी ८७ लाखांहून अधिक घरांना मंजुरी दिली आहे. ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्र शेखर पेम्मासानी यांनी काल राज्यसभेत यासंदर्भा माहिती दिली. या वर्षी २ फेब्रुवारीपर्यंत २ कोटी ९५ लाखांहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण झालं असून गेल्या पाच वर्षांत २ कोटी १० लाख ६६ हजारांहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आल्याचं ते म्हणाले.

****

'बेटी बचाओ बेटी पढाओ' ही मोहीम आता केवळ एक धोरणात्मक उपक्रम न राहता त्याचं राष्ट्रीय आंदोलनात रूपांतर झालं असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल लोकसभेत म्हटलं आहे. २०१४-१५ मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९१८ इतकं होतं, ते २०२४-२५ या वर्षात वाढून ९२९ वर पोहचलं तसंच, माध्यमिक स्तरावरील मुलींच्या शाळा प्रवेशाचे प्रमाण ७५ पुर्णांक ५१ टक्क्यांवरून ८० पुर्णांक २ टक्क्यांपर्यंत पोहोचलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

आईसीसी टी-ट्वेंटी  विश्वकप स्पर्धा सुरु आजपासून झाली आहे. आज पहिल्या दिवशी तीन सामने होत आहेत. पहिला सामना नेदरलँड पाकिस्तान यांच्यात सकाळी ११ वाजता सुरु झाला, दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलँड संघात दुपारी तीन वाजता तर भारताचा या स्पर्धेतला पहिला सामना आज अमेरिकेसोबत संध्याकाळी सात वाजता होणार आहे.

****

१९ वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघाला, तांत्रिक कर्मचाऱ्यांना आणि निवड समितीला बीसीसीआयने ७ कोटी ५० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. काल झिम्बाब्वेच्या हरारे इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला १०० धावांनी पराभूत करून विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.

****

राष्ट्रीय नाट्य विद्यालय, भारत सरकार आणि राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमानं “भारत रंग महोत्सव २०२६” हा  भव्य नाट्य महोत्सव येत्या ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होणार आहे. या नाट्य महोत्सवात देश-विदेशातील नामांकित नाट्यसंस्थांची पाच नाटकं सादर करण्यात येणार आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...