Thursday, 26 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      दहशतवादाविरोधात इस्रायलच्या लढ्यात भारत खंबीरपणे सोबत-पंतप्रधानांची ग्वाही; इस्रायलचा 'स्पीकर ऑफ द नेसेट मेडल' सन्मान मोदींना प्रदान

·      महाराष्ट्र ही २०३२ पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल-मुख्यमंत्र्यांना विश्वास

·      छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

·      हिंगोली जिल्ह्यात बनावट नोटा प्रकरणी दोघा जणांना पोलिसांकडून अटक

आणि

·      टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत-झिम्बॉब्वे लढत

****

दहशतवादाविरोधात इस्रायलनं पुकारलेल्या लढ्यात भारत खंबीरपणे सोबत असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज इस्रायलच्या संसदेत बोलत होते. भारत-इस्रायल धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांना इस्रायली संसदेनं 'स्पीकर ऑफ द नेसेट मेडल' हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवलं. मोदी यांनी या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल इस्रायलच्या संसदेचे आभार मानले. भारत आणि इस्रायल यांच्यातील आर्थिक तसंच सामरिक संबंधांबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले - 

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

महाराष्ट्र ही देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून २०३२ पर्यंत ती एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.‌ विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेत गेल्या अकरा वर्षांत तिप्पट वाढ झाली असून ती १३ लाख कोटींवरून ५१ लाख कोटींवर पोहोचली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. दावोस मध्ये झालेल्या करारांपैकी ७५ टक्के करारांची आणि २०२५ मध्ये झालेल्या करारांपैकी ८२ टक्के करारांची अंमलबजावणी होत असल्याचं सांगत, यात ८३ टक्के परकीय गुंतवणुकीचा समावेश असून देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ३९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टिपु सुलतान प्रकरणात ही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. टिपु सुलतान कोण होता, याच्याशी आपला संबंध नाही, त्याची छत्रपतींशी तुलना करण्यावर आपला आक्षेप असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. मुंबईत आशियातील सर्वात मोठे 'जागतिक क्षमता केंद्र' उभारलं जाणार असून त्यातून ४५ हजार रोजगार निर्माण होतील. छत्रपती संभाजीनगर हे देशातील पहिले स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी असून ते भविष्यातील ईव्ही उत्पादनाचे मोठे केंद्र असेल असं शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

राज्य विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. यंदा पुरवणी मागण्यांमध्ये अकरा हजार कोटी रूपये इतकी वाढ झाली आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यासाठी विविध योजनांसाठीचा निधी देण्याची मागणी यावेळी केली. कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनी श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, शिवभोजन योजना अशा योजनांसाठी निधी मिळत नसल्याची टीका केली.  सारथी योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३८८ विद्यार्थ्यांना सात कोटी २४ लाख रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वितरित झाली असल्याची माहिती सरकारने आज विधानसभेत दिली. उर्वरित ३७९ विद्यार्थ्यांसाठी ५ कोटी ९६ लाख रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्याचं नियोजन करण्यात आलं असून, ही योजना पुढेही सुरू राहील असं सरकारने स्पष्ट केलं.

****

राज्य महसूल आणि वन विभागाच्या वतीनं बीड जिल्ह्यात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” राबवण्यात येणार आहे. या अभियांनांतर्गत महसुली विषयांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचं तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत पूर्वतयारी आणि त्यानंतर महिन्यातून दोन दिवस हे शिबिर घेण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकरांचं व्यक्तिमत्व आणि कार्य प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.  सावरकरांच्या त्याग, समर्पण आणि वीरतेच्या गाथा अनंत काळापर्यंत प्रत्येक राष्ट्रप्रेमीसाठी राष्ट्रप्रथमविचारांचा दीपस्तंभ ठरतील, अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली. 

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शहरात इतरत्र असलेल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना, तसंच सेवाभावी संस्थाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे.

****

माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज नांदेड इथं विविध उपक्रम घेण्यात आले. खासदार अशोक चव्हाण यांनी शहरातल्या डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी महापौर कविता मुळे, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते. धनेगाव इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन चव्हाण कुटुंबीयांनी त्यांना आदरांजली वाहिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं ‘ग्रामीण कन्या सुरक्षा’ गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ झाला. सातारा परिसरातील जिल्हा परिषद शाळेत अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या हस्ते या मोहिमेची सुरूवात झाली.

या मोहिमेंतर्गत पाच हजार HPV लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात बनावट नोटा प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी आज अटक केली. हिंगोली तालुक्यातल्या बासंबा इथं सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. हे आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील असून त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे नऊ बंडल, चारचाकी गाडी आणि मोबाईल असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत-आसेगाव-नांदेड मार्गावर आज दुपारी झालेल्या कारच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. वसमतहून नांदेडला जात असताना भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने हा अपघात झाल्याचं पोलीसांनी सांगितलं.

****

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतल्या सुपर आठ फेरीत आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईत संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान अहमदाबाद इथं होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...