Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 February
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
परीक्षा पे
चर्चा कार्यक्रमातून पंतप्रधानांचा आज विद्यार्थ्यांशी संवाद
·
राष्ट्रपती
अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सदनात मंजूर
·
'भारत टॅक्सी' या वाहन सेवेचं केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
·
जिल्हा
परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार संपला;उद्या मतदान
आणि
·
१९
वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड संघात अंतिम सामना
****
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरून आज
सकाळी १० वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. तणावमुक्त
वातावरणात परीक्षा देण्याचं महत्त्व तसंच मनाची शांतता, आत्मविश्वास
वाढवणं आणि आव्हानांवर मात करणं यासाठीचे उपाय याविषयी पंतप्रधान या कार्यक्रमातून
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात. हा या कार्यक्रम मालिकेचा नववा भाग आहे.
****
जागतिक व्यासपीठावर
ग्लोबल साऊथचा बुलंद आवाज म्हणून भारताची ओळख निर्माण झाल्याचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद
प्रस्तावाच्या चर्चेला ते काल राज्यसभेत उत्तर देत होते. गेल्या काही दिवसांत
जागतिक पातळीवर अनेक मोठे व्यापारी करार भारतानं केल्याचं,
पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट- पंतप्रधान
नरेंद्र मोदी
पंतप्रधानांच्या उत्तरानंतर हा प्रस्ताव राज्यसभेत
आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला.
दरम्यान, पंतप्रधानांनी फक्त राज्यसभेत
भाषण करण्याला काँग्रेस अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी
आक्षेप घेतला. संसदेत राज्यसभा हे एकच सभागृह नसून लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद
तयार होते, असं त्यांनी नमूद केलं. खरगे यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातला मजकूर
वाचून दाखवायची परवानगी सभापतींकडे मागितली, ती नाकारण्यात
आली. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
****
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभारप्रस्ताव लोकसभेनंही काल आवाजी
मतदानानं मंजूर केला. त्याआधी सभागृहात काल
कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या
वर्तनावर नापसंती व्यक्त करत, विरोधकांचं वर्तन
सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन असल्याचं नमूद केलं. विरोधकांच्या
अप्रिय कृतीच्या शक्यतेमुळे आपणच पंतप्रधानांना सदनात येऊ नये, अशी विनंती केल्याचा खुलासाही अध्यक्ष बिर्ला यांनी केला. विरोधी पक्षाच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं
कामकाज वारंवारच्या व्यत्ययानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
ॲप-आधारित वाहन सेवा देणाऱ्या 'भारत टॅक्सी' सुविधेचं काल उद्घाटन झालं.
नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा कार्यक्रम
झाला. हा भारताचा पहिला सहकारी-आधारित राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. भारत टॅक्सीची
संकल्पना दळणवळण क्षेत्रातला एक परिवर्तनकारी उपक्रम ठरेल, सेवा देणाऱ्या चालकाला सारथी या नावानं संबोधलं जाईल, याद्वारे 'बाईक दीदी' सारखे उपक्रम राबवले जात असून आतापर्यंत दीडशेहून अधिक महिला चालक भारत
टॅक्सीमध्ये सहभागी झाल्या आहेत. पुढच्या तीन वर्षांत देशभरात या सेवेचा विस्तार होईल,
असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले…
बाईट- केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह
****
छत्तीसगडच्या बीजापूर
जिल्ह्यात आठ महिलांसह बारा नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर
मिळून ५४ लाख रुपये बक्षीस होतं. तत्पूर्वी, काल सकाळी झालेल्या
चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी एक एके-४७ रायफलसह
शस्त्रे आणि दारुगोळाही जमा केला. पुनर्वसन प्रक्रियेअंतर्गत, प्रत्येक
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्याला प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांची आर्थिक मदत
तत्काळ देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात
भामरागड तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला तर एक पोलिस जखमी झाला.
पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षलवाद्यांची शस्त्रं जप्त केली असून, या चकमकीत आणखी
काही नक्षली जखमी किंवा मृत झाल्याचा अंदाज आहे.
****
राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा
प्रचार काल संपला. या सर्व ठिकाणी उद्या मतदान होणार असून, नऊ तारखेला मतमोजणी होईल. या निवडणुकांसाठी
मतदारांना आपलं नाव आणि मतदान केंद्र सहज शोधता यावं, यासाठी
राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे.
या निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांमधले
१५ आठवडी बाजार उद्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी
दिले आहेत.
****
लातूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महापौर पदासाठी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौर पदासाठी स्नेहल उटगे यांचे
अर्ज वैध ठरले असून दोघांची नावे अंतिम झाली आहेत.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून महापौर
पदासाठी निकिता सोमवंशी यांनी, तर उपमहापौर पदासाठी सचिन गायकवाड
यांनी अर्ज भरला. महापौर पदाची निवड येत्या नऊ तारखेला होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या सभागृह गटनेतेपदी
गोविंद केंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या ५७ नगरसेवकांची काल विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासमोर
ओळख परेड झाली.
दरम्यान, महापौर आणि उपमहापौर पदासाठी
अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपत आहे. या पदांसाठी भाजपचे
उमेदवार अद्याप ठरले नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपाच्या सुजाता सूरज यांची, तर उपमहापौर पदी भाजपाचे दशरथ भगत यांची बिनविरोध
निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांनीही अर्ज भरले होते,
मात्र त्यांनी माघार घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे दोन नगरसेवक, मनसेचा एक नगरसेवक, आणि एक अपक्ष नगरसेवक यांनीही भाजपाला पाठिंबा दिला.
****
केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला नववा अर्थसंकल्प देशाला दिशा
देणारा आहे, असं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
ते काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
या अर्थसंकल्पातून विकसित भारताचं उद्दिष्ट स्पष्ट होतं,
असं चव्हाण यांनी सांगितलं. ते म्हणाले.
बाईट- माजी
मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं येत्या १३ ते १५ फेब्रुवारी या
कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो’ आयोजित करण्यात आला आहे. या पशु प्रदर्शनात पंधराशे
पशु प्रदर्शीत करण्यात येणार असून, डॉग शोसह विविध
प्राण्यांसाठी ४० प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी काल या प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा
घेऊन, आवश्यक निर्देश दिले.
****
धाराशिव
इथं कॅन्सर जनजागृतीसाठी साडी वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे.
उद्या रविवारी होणारं हे वॉकेथॉन ओस्ला ओयासीस लेडीज फाउंडेशन,
धारासुर मर्दिनी महिला फेडरेशन, धाराशिव
आयएमए डॉक्टर वुमन्स विंग, धाराशिव अक्षरवेल
महिला साहित्य मंडळ आणि निमा वुमन्स
फोरम धाराशिव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे.
****
१९
वर्षांखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम
सामना होणार आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथल्या मैदानावर होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार
दुपारी एक वाजता सुरू होईल. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे.
आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा हा विश्वचषक जिंकण्याचा विक्रमही भारतीय संघाच्याच
नावावर आहे.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्या शनिवारपासून प्रारंभ
होत आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन देश या स्पर्धेचं यजमानपद भुषवत आहेत.
पहिल्या दिवशी कोलंबो इथं पाकिस्तान आणि नेदरलँड, कोलकाता इथं वेस्ट इंडीज आणि स्कॉटलंड तसंच मुंबईत वानखेडे मैदानावर भारत
आणि अमेरिका संघात सामना होणार आहे.
****
No comments:
Post a Comment