Sunday, 22 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

नवी दिल्लीत घेण्यात आलेली भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषद आणि प्रदर्शन ही  ए.आय. - कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शक्तीचा भविष्यातील जागतिक पातळीवर क्षमता वापर दर्शवणारा परिवर्तनाचा क्षण ठरल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी थोड्यावेळेपूर्वी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. हा या कार्यक्रम शृंखलेचा १३१वा भाग होता. अनेक देश, उद्योग नेते, नवोन्मेषक आणि स्टार्टअप चालकांचा उत्स्फूर्त सहभाग या परिषदेत होता असं मोदी म्हणाले. जगभरातील नेत्यांना या परिषदेतील दोन गोष्टींनी प्रभावित केल्याचं मोदी ते म्हणाले. ज्यामध्ये प्राण्यांवर उपचारांसह कृत्रीम बुद्धीमत्तेद्वारे २४ तास जनावरांकडे लक्ष देणं कसं शक्य आहे. तसंच, आपले प्राचिन ग्रंथ-हस्तलिखितं यांचं जतन आणि त्यांचं आजच्या पिढीच्या स्वरुपात रुपांतरणासह संबंधित प्रतिमांना यंत्राद्वारे वाचण्यायोग्य मजकुरात  बदलणं यांचा समावेश असल्याचा त्यांनी उल्लेख केला. आधुनिक अवतारातील भारताचं प्राचीन ज्ञान जाणून घेण्यात जागतिक नेत्यांना रस दिसून आल्याचं त्यांनी नमूद केलं.

भारतीयांच्या वैशिष्ट्याबद्दल बोलतांना मोदी यांनी भारतीय जगभरात कुठेही गेले तरी आपल्या मातीशी जोडलेले असतांनाच ज्या कर्मभूमी अर्थात देशासाठी काम करतात त्यांच्या विकासातही हातभार लावतात असं नमूद केलं. यासाठी सध्या सुरु असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकात सहभागी विविध देशांच्या संघातील भारतीय खेळाडूंचं उदाहरण त्यांनी दिलं. जे खेळतील-ते खुलतील असं सांगून कॅनडा, ओमान, अमेरिका, न्युझीलंड, इटली, यु.ए.ई. या देशांकडून खेळणारे भारतीय वंशाचे खेळाडू मनापासून त्या देशांचं प्रतिनिधीत्व करतांना पाहणं मनात आनंदाची लहर उठवणार असल्याचं मोदी म्हणाले.

देशात अवयव दानाविषयी जागृती वाढत असून आपल्या मृत्यूनंतरही केरळच्या अँलिन शेरीन अब्राहम या अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाच्या अवयव दानामुळे दात्यांच्या यादीत जोडली गेली अवयवदानामुळे गरजूंना मदत होवून दुसरं आयुष्य लाभणार असून हे बाळ सर्वात लहान अवयव दाता ठरल्याचं पंतप्रधान म्हणाले. अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींनी केलेली केदारनाथ यात्रा, क्रीडा प्रकारातील सहभाग याबाबत त्यांनी बोलतांना माहिती दिली. अवयव दानासारखं पवित्र कार्य करणाऱ्या सर्वांचं कौतुक वाटत असल्याचं ते म्हणाले.

आपला देश आता भारतीय संस्कृतीशी निगडीत गोष्टींना प्राधान्यानं महत्त्व देऊ लागला आहे असं सांगून पारतंत्र्यातील ब्रिटीश प्रशासकांच्या प्रतिमांऐवजी त्याची जागा आता देशाच्या महान सुपुत्रांना देण्यात येत असल्याचं ते म्हणाले. त्यानुसार  उद्या, २३ फेब्रुवारी  रोजी राष्ट्रपती भवनात ‘राजाजी उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय प्रांगणात, स्वतंत्र भारताचे पहिले गर्व्हनर जनरल सी. राजगोपालचारी यांच्या प्रतिमेचे अनावरण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सामान्य, निर्दोष लोक आजही डिजीटल अरेस्ट आणि आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत असं सांगून  अनेकदा ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारला जातो. कधी शालेय फीच्या तर कधी व्यापाऱ्यांच्या मिळकतीची लूट होते. फसव्या फोनवर तपशील सामाईक करण्याची मागणी होते, त्यामुळे सतर्क रहा, जागरुक राहणे अत्यंत गरजेचे असल्याचं आवाहन मोदी यांनी केलं.

निवृत्तीवेतन, अनुदान, विमा, युपीआय सर्वच खाती बँकेशी जोडली गेली असल्यानं बँका सातत्याने ग्राहक ओळख-केवायसी करून घेतानाही सुरक्षिततेच्या दृष्टीने सावधान रहण्याचं सांगून, आपला पासवर्ड अर्थात  संकेतांक सातत्याने अद्ययावत करत राहाण्याचे आवाहनही मोदींनी केलं. शेतकरी अन्नदाता आहेच पण धरतीचा उपासक असल्याचे सांगून, आधुनिक शेतकरी पारंपरिक आणि तंत्रज्ञान दोन्हींचा संगम साधत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. उत्पादनच नव्हे तर गुणवत्ता, मूल्य संवर्धन आणि नव्या बाजारपेठा यांच्यावरही शेतकऱ्यांचे लक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली. परीक्षा देणाऱ्या मुलांना संबोधित करताना, आपण संवाद साधलेल्या परिक्षा पे चर्चा मधून काही शिकायला मिळाले असेल अशी आशा व्यक्त करून परीक्षेचा ताण न घेण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.

रमजानच्या पवित्र महिन्याच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसंच आगामी  होळी सणावेळी परदेशी उत्पादनांना दूर ठेवत स्वदेशी आपलेसे करण्याचे पुन्हा एकदा आवाहन पंतप्रधानांनी केलं.

****

चैन्नई येथे समुद्रात बुडून महाराष्ट्रातल्या तीन युवकांचा काल मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार एका खाजगी कंपनीत तिथं कार्यरत महाराष्ट्रातील १५ युवक समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. त्याठिकाणी समुद्रातील मोठ्या लाटांसह सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला.

****

राज्यभरात  बहुतांश  ठिकाणी आज हवामान बहुतांश कोरडं राहण्याची शक्यता आहे.मात्र, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह सातारा जिल्ह्यासह अन्य  काही भागात काल रात्री अवकाळी पाऊस झाल्याचं वृत्त्त आहे.

****

टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर आठ फेरीत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. सायंकाळी सात वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर सामना सुरू होईल.

****

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील क्रीडा संकुल इथं काल सुरुवात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल (पुरुष) स्पर्धेमध्ये १६ विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...