Friday, 27 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      दहशतवादाविरोधात इस्रायलच्या लढ्यात भारत खंबीरपणे सोबत-पंतप्रधानांची ग्वाही; इस्रायलचा 'स्पीकर ऑफ द नेसेट मेडल' सन्मान मोदींना प्रदान

·      महाराष्ट्र ही २०३२ पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल-मुख्यमंत्र्यांना विश्वास

·      छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

·      आज मराठी राजभाषा गौरव दिन-विविध कार्यक्रमांचं आयोजन

आणि

·      टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा झिम्बॉब्वेवर ७२ धावांनी विजय

****

दहशतवादाविरोधात इस्रायलनं पुकारलेल्या लढ्यात भारत खंबीरपणे सोबत असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते काल इस्रायलच्या संसदेत बोलत होते. भारत-इस्रायल धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांना इस्रायली संसदेनं 'स्पीकर ऑफ द नेसेट मेडल' हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवलं. मोदी यांनी या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल इस्रायलच्या संसदेचे आभार मानले. भारत आणि इस्रायल यांच्यातील आर्थिक तसंच सामरिक संबंधांबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले…

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत आणि इस्रायल यांच्यात काल विविध सामंजस्य करार झाले. यामध्ये, भू-भौतिक अन्वेषण, मत्स्योद्योग आणि जलशेती, युपीआय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन शिक्षण सुधारणा आदी क्षेत्रांतल्या करारांचा समावेश आहे.

****

महाराष्ट्र ही देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून २०३२ पर्यंत ती एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.‌ विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला ते काल उत्तर देत होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेत गेल्या अकरा वर्षांत तिप्पट वाढ झाली असून ती १३ लाख कोटींवरून ५१ लाख कोटींवर पोहोचली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ३९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला ते काल उत्तर देत होते. मुंबईत आशियातील सर्वात मोठे 'जागतिक क्षमता केंद्र' उभारलं जाणार असून त्यातून ४५ हजार रोजगार निर्माण होतील. छत्रपती संभाजीनगर हे देशातील पहिले स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी असून ते भविष्यातील ईव्ही उत्पादनाचे मोठे केंद्र असेल असं शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

राज्य विधानसभेत काल पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. यंदा पुरवणी मागण्यांमध्ये अकरा हजार कोटी रूपये इतकी वाढ झाली आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यासाठी विविध योजनांसाठीचा निधी देण्याची मागणी यावेळी केली. कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनी विविध योजनांसाठी निधी मिळत नसल्याची टीका केली. सारथी योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३८८ विद्यार्थ्यांना सात कोटी २४ लाख रुपये शिष्यवृत्ती वितरित झाल्याची माहिती सरकारने विधानसभेत दिली. ही योजना पुढेही सुरू राहील असं सरकारने स्पष्ट केलं.

****

अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित तथ्यं सरकारनं सभागृहासमोर मांडावीत, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले आहेत. या प्रकरणी २८ तारखेला चर्चा करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता.

दरम्यान, हा अपघात होता की घातपात, यावर सीआयडी, अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासाचा भर असल्याचं अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. विमान अपघात अन्वेषण विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातले निष्कर्ष सीआयडीच्या तपासात समाविष्ट केले जातील, असं रामानंद यांनी सांगितलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. काल मुंबईत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात एकमताने हा प्रस्ताव मंजूर झाला. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणाही प्रफुल्ल पटेल यांनी केली.

****

राज्यात नोंदणी प्रक्रियेसाठी आता ई-बॉण्डची सुविधा उपलब्ध होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या ई-बॉण्ड काढून मुद्रांक शुल्क ऑनलाइन भरता येईल.

****

विमान प्रवासाची तिकीटं आरक्षित केल्यानंतर ४८ तासांच्या आत अतिरिक्त शुल्क न भरता रद्द किंवा बदलता येणार आहेत. नागरी उड्डयन महासंचालनालय - डीजीसीए नं ही माहिती दिली. मात्र, देशांतर्गत प्रवासाला ७ दिवस आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाला १५ दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल तर हे नियम लागू होणार नाहीत.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत महापौर समीर राजूरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शहरात इतरत्र असलेल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना, तसंच सेवाभावी संस्थाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

****

माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल नांदेड इथं खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. धनेगाव इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन चव्हाण कुटुंबीयांनी आदरांजली अर्पण केली.

****

मराठी भाषा दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त आज विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात "जावे विनोदाच्या गावा" या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित "लोकसेवेचा लोकजागर" या ग्रंथाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सभागृहात चार दिवसीय माय मराठी गौरव महोत्सवात काल निर्दोष मराठी लेखन कार्यशाळा तसंच कविसंमेलन पार पडलं. महोत्सवाचा समारोप आज गीत लेखन कार्यशाळा आणि प्राध्यापक वा.ल. कुलकर्णी व्याख्यानमालेतील व्याख्यानानं होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने, मराठी भाषा गौरव दिनापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन -आठ मार्चपर्यंत महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या सप्ताहात निबंध, चित्रकला, रांगोळी यासारख्या स्पर्धा तसंच कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

**

नाशिक इथं आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाचं काल ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या संमेलनात काल बोली भाषांचा महोत्सव घेण्यात आला. जळगाव इथल्या कलाकारांनी कवयित्री बहिणाबाईंच्या साहित्यावर आधारित ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम काल सादर केला.

****

सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसंच ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनांचा लाभ पोहचवावा, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या आहेत. ते काल लातूर इथं आढावा बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान, किल्लारी इथं 'बुद्ध धम्म परिषद' काल आठवले यांच्या उपस्थितीत पार पडली. भूकंपाच्या वेदनेने होरपळलेल्या किल्लारीच्या भूमीत, आज शांततेचा संदेश जगभर जात असल्याचं आठवले यांनी यावेळी नमूद केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं जागतिक बौध्द धम्म परिषदेला कालपासून प्रारंभ झाला. या परिषदेत तीस देशांतील विद्वानांसह दीड हजारावर अनुयायी सहभागी झाले आहेत.

****

हिंगोली तालुक्यातल्या बासंबा इथं बनावट नोटा प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी काल अटक केली. आरोपींकडून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा, चारचाकी गाडी आणि मोबाईल असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने झिम्बॉब्वेवर ७२ धावांनी विजय मिळवला. चेन्नईत झालेल्या सामन्यात या झिम्बॉब्वेनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताने चार बाद २५६ धावा करत, या स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास आलेला झिम्बॉब्वेचा संघ निर्धारित षटकांत सहा बाद १८४ धावाच करू शकला. दमदार अर्धशतकी खेळी करणारा हार्दिक पांड्या सामनावीर ठरला. भारताचा आता परवा रविवारी वेस्ट इंडीज विरुद्ध् सामना होणार आहे. 

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...