Sunday, 22 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषद आणि प्रदर्शनाचा समारोप

·      राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना करण्याची उच्च शिक्षण संचालकांची घोषणा

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार

·      ॲडलेड टी–ट्वेंटी क्रिकेट सामना जिंकत भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजय

आणि

·      टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर आठ मध्ये आज भारत – दक्षिण आफ्रिका लढत

****

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषद आणि प्रदर्शनाचा काल समारोप झाला. ही शिखर परिषद आणि परिषदेच्या निमित्तानं जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातले दिग्गज आणि स्टार्टअप प्रतिनिधींसह शंभरपेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी, संशोधक, उद्योग क्षेत्रातले प्रतिष्ठीत व्यक्ती आणि धोरणकर्ते एकाच ठिकाणी आले होते. या प्रदर्शनाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली, तसंच विविध कार्यशाळा तसंच चर्चासत्रांमध्ये सहभाग नोंदवला.

या परिषदेच्या घोषणापत्रावर ८६ देश आणि दोन आंतरराष्ट्रीय संघटनांनी स्वाक्षरी केली असून, कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक सहकार्यात हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानवकेंद्रित दृष्टिकोनाला जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” या तत्त्वावर आधारित घोषणापत्रात एआयचे फायदे सर्वांना समान मिळावेत यावर भर देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या घोषणापत्रात लोक, पृथ्वी आणि प्रगती या सूत्रानुसार ठोस कृतींसाठी सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार्य, बहु-भागधारकांचा सहभाग आणि जबाबदार एआय विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.

वैष्णव यांनी या परिषदेत काल नवोन्मेषकर्मींबरोबर संवाद साधला. यावेळी ते म्हणाले:

बाईट - केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव

****

राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना करण्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केली आहे. ते काल पुणे इथं इनोव्हेशन फाउंडेशनच्या इनोव्हेट यू टेकॅथॉन तीन च्या उद्घटनाप्रसंगी बोलत होते. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाची संधी आणि व्यासपीठ मिळावं यासाठी या लॅबची स्थापना करण्यात येणार आहे.

****

माझी वसुंधरा राज्यस्तरीय सन्मान सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. माझी वसुंधरा मिशन चार आणि मिशन पाच अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये विविध गटातल्या शंभरावर पुरस्कारांचा समावेश आहे.

****

ऑपरेशन सिंदूर मध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांना भारतीय लष्कर प्रमुखांचं प्रशंसा पदक काल प्रदान करण्यात आलं. नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयात झालेल्या एका सोहळ्यात लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांच्या हस्ते गायकवाड यांना हे पदक देऊन गौरवण्यात आलं. २०२५ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स संचालनालयात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत गायकवाड यांनी दळणवळण व्यवस्थापनात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम शृंखलेचा १३१ वा भाग आहे. सकाळी ११ वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप वरुन ऐकता येईल.

****

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आज होत आहे. या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाचवी आणि आठवीचे एकूण ५३ हजार १०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. प्रत्येकी दिडशे गुणांचे दोन पेपर होणार आहेत. पाचवीच्या परीक्षेसाठी १८८ केंद्रांमध्ये ३१ हजार ५९३ विद्यार्थी तर आठवीसाठी १४३ केंद्रांत २१ हजार ५१२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

****

छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय एकांकिका करंडक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या विद्यार्थी विकास मंडळाच्या "द लास्ट बॅटल" या एकांकिकेने पटकावला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं आयोजित या स्पर्धेत २१ संघानी दर्जेदार एकांकिका सादर केल्या. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं. पुढील वर्षीपासून या स्पर्धेच्या प्रथम पारितोषिकाची रक्कम दोन लाख रुपये करण्याची घोषणा जंजाळ यांनी केली.

****

परळी वैजनाथ इथं नुकत्याच पार पडलेल्या महा पशुधन प्रदर्शनात पुण्याच्या कृषी महाविद्यालयातल्या, देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला, शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरुपाचा हा पुरस्कार राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते देण्यात आला.

****

शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पुरस्कार काल छत्रपती संभाजीनगर इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. प्राचार्य रा. रं. बोराडे शेतकरी साहित्य पुरस्कार संगमनेर इथले लेखक श्रीकांत ढेरंगे यांना, तर संदीप दळवी बालसाहित्य पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले विशाल तायडे यांना प्रदान करण्यात आला. या दोन्ही लेखकांच्या साहित्यकृतींवर प्रसिद्ध कवी, प्रतिष्ठानचे संपादक श्रीधर नांदेडकर तसंच वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी भाष्य केलं.

****

हिंगोली इथं काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोटोकॉल डिझाइनिंग आणि एक्स्ट्राम्युरल फंडिंग संधी विषयक राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. या परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधनाची जाणीव आणि दिशा दृढ करण्याचा प्रयत्न आहे. देशभरातून ५०० पेक्षा अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

****

महिला क्रिकेटमध्ये, भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव करत तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका दोन – एक अशी जिंकली. ॲडलेड इथं झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत, निर्धारीत षटकांत सहा बाद १७६ धावा केल्या. उत्तरादाखल खेळण्यास उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारीत षटकांत नऊ बाद १५९ धावाच करू शकला. दरम्यान, या दोन्ही संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका मंगळवारपासून सुरु होत आहे.

****

टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर आठ मध्ये आज भारताची लढत दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षांचा ३५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अधिसभा बैठकीत मंजूर करण्यात आला. या वर्षात विद्यापीठाची अपेक्षित जमा ३३३ कोटी रुपये असून, २५ कोटींची तुट दर्शवण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक काल कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर ग्रामीण रुग्णालयाला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ जाहिर झाला आहे. राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार्या या पुरस्काराचं वितरण आज मुंबईत होत आहे.

****

लातूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात काल संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई यांच्यासह सात संतांच्या पवित्र पादुकांचा पूजन सोहळा साजरा झाला. यावेळी मंदिर परिसर ‘माऊली’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

दरम्यान, लातूर शहराजवळील खंडापूर शिवारात या सात संतांच्या पवित्र पादुकांचं आगमन झालं. त्यानिमित्त एक मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्य कार्यक्रम स्थळी माऊलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा काल पार पडला.

****

बीड जिल्ह्याची ऊसतोड कामगारांची ओळख पुसून टाकण्यासाठी माता-भगिनींनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. पाटोदा तालुक्यात अमळनेर आणि डोंगरकिन्ही इथं 'उमेद' अंतर्गत बँक कर्ज मंजुरी पत्र आणि कर्ज वितरणाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. विविध राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून मंजूर कर्जांचं वितरण यावेळी करण्यात आलं.

****

लातूर जिल्ह्यात, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, या मागणीसाठी २४ फेब्रुवारी पासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी दिला आहे.

****

रोटरी क्लब ऑफ जालना आणि जर्मन रोटरी वॉलेंटियर ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमानं जालना इथं मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला कालपासून प्रारंभ झाला. हे शिबीर येत्या तीन मार्चपर्यंत सुरू राहणार असून, यात जन्मजात दुभंगलेले ओठ, टाळू, भाजल्यामुळे आलेले व्यंग यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. गेल्या २१ वर्षांत २८०० हून अधिक रुग्णांना शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवीन आयुष्य दिल्याची माहिती क्लबच्या अध्यक्षा वर्षा पित्ती यांनी दिली.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...