Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 18
February 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं
दहा राज्यातल्या राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा
कार्यक्रम जाहिर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या सात जागांचा समावेश आहे. या रिक्त
होणार्या जागांसाठी येत्या १६ मार्च ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीची
२६ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
पाच मार्च असेल, अर्जांची छाननी सहा मार्च रोजी होईल आणि नऊ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता
येतील.
महाराष्ट्राबरोबरच ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगढ, हरियाणा, हिमाचल प्रदेश
आणि तेलंगणा या राज्यातल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये राज्यातल्या शरद
पवार, डॉ. भागवत कराड, डॉ. फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, रजनी पाटील
आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिल रोजी संपणार आहे.
****
वास्तविक जगातल्या समस्या
सोडवण्यासाठी भारत कृत्रिम बुद्धिमत्ता – एआयवर लक्ष केंद्रित करत असल्याचं, इलेक्ट्रॉनिक्स
आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. भारत एआय इम्पॅक्ट
शिखर परिषदेत आज संशोधन परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. उद्योगांमध्ये
उत्पादकता वाढवण्यासाठी आणि आरोग्यसेवा, शेती आणि हवामान बदल यासारख्या
व्यापक आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार एआयच्या वापराला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी
सांगितलं. एआय हे एक शक्तिशाली साधन असून, त्याचा वापर मानवतेच्या हितासाठी
केला पाहिजे, असं वैष्णव म्हणाले. कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाबाबत देशातल्या युवा पिढीतल्या
उत्साहाचंही त्यांनी कौतुक केलं.
****
दरम्यान, या शिखर परिषदेसाठी
जगभरातून आलेल्या नेत्यांची आणि उद्योगधुरिणांची पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेत आहेत.
आज सकाळी त्यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची भेट घेतली. स्पेनचे
अध्यक्ष पेट्रो सांचेझ, फिनलंडचे पंतप्रधान पेट्टेरी ओर्पो यांची मोदी यांनी हैदराबाद
हाऊस इथं भेट घेतली. सेशेल्सचे उपराष्ट्रपती सेबास्टियन पिलाय, मॉरिशसचे पंतप्रधान
नवीनचंद्र रामगुलाम, स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलिग्रीनी यांचं
देखील आज दिल्लीत आगमन झालं. पंतप्रधान मोदी संध्याकाळी भारत मंडपम इथं ते जागतिक नेत्यांचं
स्वागत करतील.
****
मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय
उद्यानातल्या गामिनी या चित्ता मादीनं नुकताच तीन बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे उद्यानातल्या
आणि पर्यायाने देशभरातल्या चित्त्यांची संख्या ३८ झाली आहे. गेली काही वर्ष भारतात
चित्त्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
****
भारतीय प्रशासकीय सेवेतले
ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांना आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या
अध्यक्ष पदाची शपथ देण्यात आली. लोकभवन इथं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीमनवार
यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची
जयंती उद्या साजरी होत आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं आहे.
परभणी शहरातल्या श्री सारंग
स्वामी विद्यालय आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांनी
मानवी साखळीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारत मानवंदना अर्पण
केली.
छत्रपती संभाजीनगर शहरात मिरवणुका, मशाल रॅली
यासह व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आज संध्याकाळपासून गोपाल टी
कॉर्नर – क्रांती चौक ते सिल्लेखाना हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तर उद्या
दिवसभर क्रांती चौकासह संस्थान गणपती – गुलमंडी– पैठण गेट– सिल्लेखाना तर क्रांती चौक
हा मार्ग, टीव्ही सेंटर – बळीराम पाटील चौक ते चिश्तिया चौक हा मार्ग आणि जयभवानीनगर चौक–गजानन
महाराज मंदिर–सेव्हन हिल उड्डाणपूल ते आदिनाथ चौक हा मार्ग बंद राहणार आहे.
**
बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही
शिवजयंतीनिमित्त आज आणि उद्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
आज बीड शहरातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर
आधारित नाटकाचं सादरीकरण होणार आहे. तर उद्या शाहिरी लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम
होणार आहे.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत आज भारताचा सामना नेदरलँड सोबत होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानात
संध्याकाळी सात वाजता हा सामना होईल. या स्पर्धेत सध्या दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त
अरव अमिरात यांच्यात सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा
निर्णय घेतला. युएईच्या संघानं प्रथम फलंदाजी करत १२३ धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तान
आणि नामिबिया दरम्यानही आज सामना होणार आहे.
****
No comments:
Post a Comment