Monday, 9 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांसाठीच्या मतदानाची आज मोजणी होत आहे. मतमोजणीसाठी राज्य निवडणूक आयोगानं सुरक्षेसह सर्व व्यवस्था केली आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६८ पूर्णांक २८ शतांश टक्के मतदान झालं. सर्वाधिक सुमारे ७५ टक्के मतदान परभणी इथं तर रत्नागिरीत सर्वात कमी सुमारे ५६ टक्के मतदान झालं.

लातूर जिल्ह्यात मतमोजणीसाठी एकूण १४२ टेबल उभारण्यात आले असून, एक हजार २९१ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लातूर तालुक्यातल्या आर्वी गटातून काँग्रेसच्या राजश्री देशमुख विजयी झाल्या. तर दोन्ही पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर अहमदपूर तालुक्यातल्या खंडाळी इथल्या गटातून भाजपच्या रेखा हाके विजयी झाल्या.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी परीक्षा पे चर्चा २०२६ च्या नवव्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दहावी, बारावीच्या परीक्षा जवळ येत असल्यानं, परीक्षेचा ताण, परीक्षेची तयारी, वेळ व्यवस्थापन तसंच विद्यार्थ्यांनी या परीक्षांना आत्मविश्वासानं कसं सामोरं जावं यावर या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या भागात तामिळनाडुतल्या कोइम्बतूर, छत्तीसगडमधल्या रायपूर, गुजरातमधल्या देव मोगरा आणि आसाममधल्या गुवाहाटी इथले परीक्षा योद्धे सहभागी झाले होते. आत्मविश्वास, सकारात्मकता आणि सर्वसमावेशक कल्याण साधून, परीक्षा एक उत्सव म्हणून साजरा करण्याचा दृष्टिकोण प्रदान करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत आणि राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा पुढे सुरु होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी एक फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी पर्यंत चालेल, तर दुसरा टप्पा नऊ मार्च ते दोन एप्रिल दरम्यान होणार आहे.

****

परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण विभागाच्या सचिव डॉ. नीना मल्होत्रा यांनी कैरो इथं इजिप्तच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्र्यांसोबत १४व्या भारत–इजिप्त परराष्ट्र कार्यालय सल्लामसलतींचे सहअध्यक्षपद भूषवलं. या बैठकीत द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर मतांची देवाणघेवाण झाली.

****

केंद्र सरकारनं नागरिक आणि संबंधितांकडून प्राप्तीकर नियमावली २०२६ बाबतच्या सूचना मागवल्या आहेत. प्राप्तीकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर येत्या २२ तारखेपर्यंत या सूचना नोंदवता येतील. ही नियमावली नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. पारदर्शकतेला चालना देण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेतील लोकसहभाग या हेतूनं नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्याचीं माहिती प्राप्तीकर कार्यालयानं दिली आहे.

****

केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ साठीची नामांकन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची नामांकनं सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पुरस्कारांतर्गत दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार देण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत पाचोड इथल्या मतदान केंद्रावर नियुक्त तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आमदार विलास भुमरे यांच्यासोबत मतदान केंद्रात आलेल्या बालकाच्या बोटावर शाई लावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

अकोला जिल्ह्यातल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ६४ हजार ६१५ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, आतापर्यंत एक हजार ३२० लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित ६३ हजार ९४५ लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे केली आहे. मात्र, अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे अनुदानाचा निधी कधी मिळणार, याबाबत जिल्ह्यातले लाभार्थी शेतकरी प्रतिक्षेत आहे.

****

धाराशिव इथं कर्करोगाच्या जनजागृतीसाठी साडी वॉकेथॉनला काल मोठा प्रतिसाद मिळाला. यात शहराच्या सर्वच प्रमुख मार्गांवरुन साडी परिधान करुन महिलांनी कर्करोगाबाबत जनजागृतीचे फलक हातात घेऊन फेरी काढली. विविध क्षेत्रात कार्यरत कर्तृत्ववान महिलांना यावेळी धाराशिव नारीशक्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यात शिवजयंती तसंच रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी काल याबाबत आढावा बैठक घेतली. या मोहिमेसंदर्भात त्यांनी पालिका प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...