Saturday, 14 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सेवातीर्थ आणि कर्तव्यभवन या इमारतींचं उद्घाटन म्हणजे विकसित भारताकडे प्रतिकात्मक पाऊल-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण; नऊ मार्चपासून दुसरा टप्पा

·      जागतिक रेडियो दिवस काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा

·      परळी इथं ‘महापशुधन एक्सपो’ या राष्ट्रीय पशू प्रदर्शनाला प्रारंभ

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथे आज पहिल्या अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलनाचं आयोजन

****

सेवातीर्थ आणि कर्तव्यभवन या इमारतींचं उद्घाटन हे विकसित भारताच्या दृष्टिकोनाकडे एक प्रतिकात्मक पाऊल असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत ‘सेवातीर्थ’ इमारत तसंच कर्तव्यभवन १ आणि २ चं औपचारिक उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ही नवीन संकुलं भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बांधल्याचं पंतप्रधान म्हणाले..

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

या संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय तसंच मंत्रिमंडळ सचिवालयाचा समावेश आहे. या नव्या इमारतींमुळे वित्त, संरक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कृषी यासह अनेक महत्त्वाची मंत्रालयं प्रशस्त आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा जागेतून कामकाज करणार आहेत. संबंधित कार्यालयांच्या जुन्या इमारती आता संग्रहालयात रूपांतरित करण्यात येणार आहेत.

**

दरम्यान, या कार्यालयात स्थलांतरित झाल्यानंतरच्या पहिल्याच निर्णयांमध्ये, पंतप्रधान मोदी यांनी, लखपती दिदी योजनेचं लक्ष्य दुप्पट करून सहा कोटी रुपये, कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून दोन लाख कोटी रुपये आणि स्टार्टअप इंडिया योजनेच्या १० हजार कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा काल समारोप झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा नऊ मार्चपासून सुरू होईल, आणि दोन एप्रिलपर्यंत चालेल. लोकसभेत काल अखेरच्या दिवशीही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरुन गदारोळ केल्यामुळे सदनाचं कामकाज आधी दोन वेळा आणि त्यानंतर नऊ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभापती सी पी राधाकृष्णन यांनी सदनाचं कामकाज नऊ मार्चपर्यंत तहकूब केलं.

****

सरकारच्या कडधान्य स्वावलंबन अभियानामुळे २०३०-३१पर्यंत देश कडधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तासात कडधान्य आणि त्यासंदर्भातल्या विविध प्रश्नांना ते उत्तर देत होते. शेतमालाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी सरकारने कृषी पायाभूत सुविधा निधीची स्थापना केली आहे. यामुळे नाशवंत शेतमालाच्या नुकसानाच्या प्रमाणात पाच ते १५ टक्के घट झाल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

****

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दाखल केलेल्या मूळ प्रस्तावानुसार कार्यवाहीचा निर्णय सरकारने घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. दुबे यांचा हा प्रस्ताव लोकसभाध्यक्षांशी चर्चेनंतर विशेषाधिकार समितीकडे पाठवला जाईल किंवा थेट सदनात चर्चेसाठी आणला जाणार असल्याचं रिजीजू यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू

 

दुबे यांनी दाखल केलेला हा प्रस्ताव विचाराधीन असल्यामुळे गांधी यांच्याविरोधात वेगळा हक्कभंग प्रस्ताव आणला जाणार नसल्याचं, रिजीजू यांनी सांगितलं. दुबे यांनी या प्रस्तावात गांधी यांचं सदस्यत्व रद्द करण्याची तसंच त्यांना आजीवन निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

****

जागतिक रेडियो दिवस काल साजरा करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा या माध्यमातला वापर हे साधन राहील, ते मानवी आवाजाची जागा घेऊ शकणार नाही अशी यंदाच्या रेडियो दिनाची संकल्पना आहे. आकाशवाणीच्या वतीने छत्तीसगडमध्ये रायपूर इथं काल जागतिक रेडिओ दिन परिसंवाद घेण्यात आला, तसंच आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात व्हॉक्स अँड वाईब्ज हा पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम पार पडला. छत्रपती संभाजीनगर इथले रेडिओप्रेमी संजय पवार यांनी भरवलेल्या प्रदर्शनाला अनेक नागरिकांनी भेट दिली.

****

शिवभोजन थाळी योजना राबवणाऱ्या चालकांचं दहा महिन्यांपासून प्रलंबित असलेलं मानधन लवकरात लवकर मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं बोलत होते.

****

सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सेवेचा आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी ‘पॉड टॅक्सी’ सेवेचा आढावा शिंदे यांनी काल घेतला, त्यानंतर ते बोलत होते. नागरिकांना थेट गंतव्य स्थळापर्यंत सोडण्यास महापालिकांनी प्राधान्य द्यावं, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.

****

परळी इथं पशुसंवर्धन विभागाच्या ‘महापशुधन एक्सपो’ या राष्ट्रीय पशू प्रदर्शनाचं काल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. ग्रामीण भागातला पशुपालक हा फक्त शेतकरी न राहता उद्योजक कसा बनेल, यासाठी सरकार प्रयत्नशील असून, पशुसंवर्धन क्षेत्राला कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे वीज बिलात सवलतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. यावेळी मुंडे यांनी विविध पशुधन प्रजातींची पाहणी करुन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या महोत्सवात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पहिल्या अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलनाला आजपासून छत्रपती संभाजीनगर इथे प्रारंभ होत आहे. एम आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित या संमेलनाला सकाळी ग्रंथदिंडी आणि ध्वजारोहणाने प्रारंभ होईल. या दोन दिवसीय संमेलनात ललित लेख आणि गझल संमेलन, कवी संमेलन, नाट्य संगीत, डॉ जब्बार पटेल यांची प्रकट मुलाखत, आदी कार्यक्रम होणार आहेत. सामाजिक तसंच वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणास्थान असलेल्या अनेक मान्यवरांचे अनुभव कथन या संमेलनात ऐकता येणार आहेत.

****

जालना जिल्ह्यात 'महारेशीम अभियान २०२६'चा शुभारंभ काल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते रेशीम चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. जिल्ह्यात यावर्षी पाच हजार एकर क्षेत्रावर तुती लागवडीचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं असून, शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम उद्योगाकडे वळण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.

****

धाराशिव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. कचरा डेपो हटवणं, मालमत्ता कर सवलत आणि अभय योजना आदी प्रमुख निर्णय यावेळी घेण्यात आले.

****

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरुळ परिसरात काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या दोन हजार जणांनी वेरुळ परिसरातील येळगंगा नदी, मालोजीराजे भोसले गढी परिसर, अरिहंत चौक, लेणी परिसर स्वच्छ केला. दरम्यान, महाशिवरात्र काळात वेरुळ गावात जाण्यास वाहनांना येत्या सोमवार पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

****

बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी गेवराई विधानसभा क्षेत्रीय समितीची काल बैठक झाली. माजी आमदार तथा जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. सर्व ग्रामपंचायतींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचे रितसर प्रस्ताव दाखल करावेत असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

क्रिकेट

पुरुषांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज आयर्लंड-ओमान, इंग्लंड-स्कॉटलंड आणि न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका असे सामने होणार आहेत. या स्पर्धेत काल झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी मात दिली. अन्य सामन्यात अमेरिकेने नेदरलँडचा ९३ धावांनी पराभव केला तर संयुक्त अरब अमिरातने कॅनडावर ५ गडी राखून विजय मिळवला.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...