Tuesday, 10 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      जलसंपदा विभागाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून १५ हजार कोटी रुपये कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·      येत्या २३ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन-सहा मार्चला अर्थसंकल्प

·      माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी सत्तावीस जणांविरोधात दोषारोप निश्चित

·      छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर तर नांदेडच्या महापौरपदी भाजपच्या कविता मुळे यांची निवड

आणि

·      १२वीच्या परीक्षेला राज्यभरात प्रारंभ

****

जलसंपदा विभागाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-नाबार्डकडून १५ हजार कोटी रुपये दीर्घ मुदतीचं कर्ज घ्यायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. अपूर्ण असलेले हे ४० प्रकल्प आणि १०० नाले पूर्ण झाल्यावर आठ लाख एकर जमीन ओलिताखाली येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या बैठकीत झालेल्या इतर निर्णयांबाबत माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

नवी मुंबई विमानतळाच्या जवळ तिसरी मुंबई उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला विविध सवलती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण करण्याला आणि त्यासाठी निधी उभारण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

सार्वजनिक – खासगी भागीदारी –पीपीपी- धोरण २०२६ या बैठकीत जाहीर करण्यात आलं.

राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव हे अभियान राबवण्यात येणार आहे. जीवनशैली आणि आहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन, हे या अभियानाचे चार स्तंभ असून, या अभियानातून गावपातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर सरकारचा भर असेल. या अभियानासाठी सुमारे ऐंशी लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात इंद्राणी सहकारी सूतगिरणीला शासकीय अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

जमीन महसूल अधिनियमात सुधारणा करून, ई-मेलद्वारे बजावण्यात आलेली नोटीसही कायदेशीर ठरवण्याला मंत्रिमंडळाने या बैठकीत संमती दिली.

याशिवाय, राज्यस्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शनातल्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्याला, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या ११ पदांच्या निर्मितीला तसंच सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम आणि विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार असून ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सलागार समितीची बैठक आज मुंबईत विधानभवनात झाली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते

****

लोकसभेच्या कामकाजातला अडथळा संपून आज अर्थसंकल्पावरची चर्चा सदनात सुरू झाली. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या चर्चेला सुरुवात केली. राज्यसभेतही अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असून शिवसेनेचे मिलिंद देवरा यांनी या चर्चेत भाग घेतला.

****

लोकसभेत विरोधी पक्षांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. या नोटिसीवर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी सह्या केल्या आहेत, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मात्र या प्रस्तावावर सही केलेली नाही.

****

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईच्या एका विशेष मोका न्यायालयानं सत्तावीस आरोपींविरोधात दोषारोप निश्चित केले आहेत. २०२४ साली सिद्दिकी यांची मुंबईत बांद्रा इथे तीन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणी सत्तावीस जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून, कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याला फरार आरोपी दर्शवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर यांची निवड झाली आहे. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत आज ही निवडणूक झाली. यावेळी राजूरकर यांना ७०, तर एमआयएमचे उमेदवार अशोक हिवराळे यांना ३३ मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहिले. उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली.

नांदेड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कविता मुळे यांचा विजय झाला. त्यांना ८१ पैकी ५० मतं मिळाली. एमआयएमच्या अश्विनी धोंगडे यांना १४ तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या महेजबीन अब्दुल फहीम यांना १५ मतं मिळाली. उपमहापौर पदी भाजपाचे दीपकसिंह रावत हे विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेनेच्या चार नगरसेवकांसह एका अपक्ष उमेदवारानंही भाजपाला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १८ मार्चपर्यंत राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांत परीक्षा होणार आहे. विभागात या परीक्षेसंदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ४५४ परीक्षा केंद्रावर, एक लाख ९० हजार ५९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व केंद्रांवर भरारी पथकांच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात आली आहे.

 

बीड जिल्ह्यात ४५ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रावर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ठिकठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारेही तपासणी केली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

लातूर जिल्ह्यात १०१ केद्रांवर ही परीक्षा होत असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन अधिकाऱ्यांचं बैठं पथक तैनात करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी लातूरच्या जिल्हा परिषदेत या परीक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आज सगळ्या बैठ्या पथकांचा आढावा घेतला.

 

परभणी जिल्हयात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रशासनासह शिक्षण आणि पोलीस विभागानं आवश्यक त्या उपयोजना केल्या आहेत. परीक्षा कक्षात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज परभणी शहरातल्या परीक्षा केंद्रांना भेट देऊन आवश्यक त्या सूचना केल्या.

****

देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची एकोणतीस हजारहून अधिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. अवजड उद्योग राज्यमंत्री भूपतिराजू श्रीनिवास वर्मा यांनी आज लोकसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. देशभरात पुरेशी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी सरकारनं सुमारे तीन हजार कोटी रुपये वितरित केल्याचं त्यांनी सांगितलं.

****

भारतानं आतापर्यंत दोनशे बहात्तर गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता प्राप्त केली आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात ही माहिती दिली. हरित हायड्रोजन क्षेत्रातही जागतिक भविष्याला आकार देण्यात भारत अग्रणी असल्याचं नमूद करत, मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत देशभरात एकवीस हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात आल्याचं जोशी यांनी सांगितलं.

****

देशानं २०२४-२५ या वर्षात राष्ट्रीय जलमार्गांवरून विक्रमी चौदा पूर्णांक सहा कोटी टन मालाची वाहतूक केली. केंद्रीय बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत प्रश्नकाळात ही माहिती दिली. देशात क्रूज पर्यटनात पूर्वीच्या तुलनेत चारशे ऐंशी टक्क्यांनी वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या नागरिकांना वीजचोरी किंवा इतर माहिती देता यावी, यासाठी महावितरणनं दोन स्वतंत्र व्हाट्सअप क्रमांक जारी केले आहेत. वीजचोरीची माहिती ९० ११ ०७ ५२ ०० या क्रमांकावर तर धोकादायक वीजयंत्रणा किंवा चुकीची वीजबिलं याबाबतची माहिती ९० ११ ०७ ५६ ०० या क्रमांकावर देता येईल.

****

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नेदरलँडने नामिबियाचा सात गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात युएईने न्यूझीलंडसमोर विजयासाठी १७४ धावांचं लक्ष्य दिलं. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या सातव्या षटकांत बिनबाद ८५ धावा झाल्या होत्या. स्पर्धेतला तिसरा सामना पाकिस्तान आणि अमेरिका संघात सायंकाळी सात वाजता होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...