Saturday, 28 February 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील अजमेर इथून 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' अर्थात एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा आरंभ केला. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणं, हे या महत्त्वाकांक्षी मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे. याप्रसंगी पाच मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात लस देण्यात आली.  लसीकरणानंतर पंतप्रधानांनी मुलींशी संवाद साधला. देशातील १४ वर्षे वयोगटातील मुलींचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी हा महत्वाचा उपक्रम ठरणार आहे.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं- ओडीशाच्या चांदीपूर किनाऱ्यावरून ‘अति-अल्प पल्ला’ हवाई संरक्षण यंत्रणा असलेल्या सलग तीन यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. या चाचण्यांमध्ये क्षेपणास्त्रानं शत्रूच्या विमानांसारख्या वेगानं येणाऱ्या लक्ष्यांचा अचूक वेध घेत त्यांचा नाश केला. विविध उंची आणि अंतरावरून येणाऱ्या हवाई धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरली आहे.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं असून, ही यंत्रणा लवकरच भारतीय सशस्त्र दलात सामील केली जाईल.

****

आज देशभर 'राष्ट्रीय विज्ञान दिन' उत्साहात साजरा केला जात आहे. थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी लावलेल्या 'रामन इफेक्ट' या ऐतिहासिक शोधाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. "वैज्ञानिक कुतूहल आणि संशोधनाचा उत्सव देशाला पुढे नेतो," असं नमूद करत त्यांनी युवकांनी सक्षम बनावं आणि जागतिक हितासाठी विज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शास्त्रज्ञांना शुभेच्छा देत त्यांच्या प्रयत्नांमुळेच देशाचे भविष्य उज्वल आणि सुरक्षित होत असल्याचं म्हटलं आहे.या दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय मुख्य सोहळा होत आहे. पुण्यातही ‘आयुका’, ‘आयसर’, ‘जीएमआरटी’ आणि ‘पुणे वेधशाळा’ यांसारख्या संस्थांमध्ये शास्त्रज्ञांशी संवाद आणि वैज्ञानिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं  आहे.

****

उद्या १ मार्च पासून राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. याबाबत काल विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ऑनलाईन आणि पारदर्शक परवाना प्रक्रियेच्या माध्यमातून कायदेशीर वाहतूक सुलभ करणं, प्रवाशांनीही परवानाधारक सेवांचा वापर करण्याची जबाबदारी स्वीकारणं ही गरज असल्याचं मंत्री सरनाईक यांनी बैठकीत सांगितलं.  

****

भटक्या कुत्र्यांचं नियमन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्याचे कोणतेही आदेश महानगरपालिकेनं दिलेले नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नोडल अधिकाऱ्याची नेमणूकही केलेली नाही, असं स्पष्टीकरण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. आमदार मनीषा कायंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. कुत्रा चावल्यानंतर काय करायचं, याचं प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आलं आहे, मात्र हे काम त्यांनी करण्याबाबतचे आदेश काढण्यात आलेले नाहीत,असं मिसाळ यांनी स्पष्ट केलं. याप्रश्नी नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. 

****

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना केंद्र सरकारच्या 'सामाजिक सुरक्षा संहिता २०२०' अंतर्गत संरक्षण दिले जाणार असल्याचं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधानसभेत सांगितलं. केंद्र सरकारचे कायदे राज्यात लागू होणार असल्यानं, गिग कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करता येणार नाही, मात्र असंघटित कामगारांसाठी विविध तरतुदी केल्या जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं. ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलिस आणि चारित्र्य पडताळणी करणं कंपन्यांना बंधनकारक असून, याचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

****

होळीचा सण येत्या दोन मार्चला साजरा होत आहे. होळी पेटवताना, रंगांची उधळण करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महावितरण विभागानं केलं आहे. भूमिगत वीजवाहिन्यांपासून दुर अंतरावर होळी पेटवावी, होळीसाठी मोकळ्या जागेचा वापर करावा, होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही महावितरणनं केल्या आहेत.

****

होळीनिमित्त रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, 'दिवा-चिपळूण-दिवा' ही विशेष गाडी आता १ मार्चऐवजी २ मार्चपासून धावणार आहे. या गाडीसाठी प्रवाशांना सुपरफास्ट किंवा एक्स्प्रेसप्रमाणेच सामान्य शुल्क लागू असेल. या विशेष रेल्वे सेवेचे सविस्तर वेळापत्रक आणि अधिक माहिती 'रेल वन' या ॲपवर उपलब्ध करण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...