Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 February
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
एक लाख कोटी रुपयांचा अर्बन
चॅलेंज फंड उभारण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
·
देशातल्या लांब
पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये आता दर तासा-दीड तासाला स्वच्छता –
रेल्वेमंत्र्यांची घोषणा
·
शेतकऱ्यांनी नैसर्गिक
शेतीचा अवलंब करावा-परळी इथं महापशुधन प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांचं आवाहन
·
महाशिवरात्रीनिनिमित्त आज
ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम
आणि
·
टी–ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत आज भारत – पाकिस्तान लढत
****
एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा निर्णय
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. १० लाखांहून अधिक
लोकसंख्या असलेल्या शहरांना याचा लाभ होईल. याशिवाय १० हजार कोटी रुपयांचा
स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्सही केंद्र सरकार सुरू करणार आहे.
महाराष्ट्रात कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि
चौथी मार्गिका,
तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या
चौपदरीकरणाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट- माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची साऊथ ब्लॉक
मध्ये झालेली ही शेवटची बैठक होती. यापुढे मंत्रिमंडळाच्या बैठका सेवा तीर्थमध्ये
होणार आहेत. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचं रुपांतर ‘युगे युगीन भारत’ या
संग्रहालयात होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
****
रासायनिक खतामुळे शेतीची उत्पादकता कमी होत असून, या
संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या परळी इथं महापशुधन
एक्स्पोला भेट दिल्यानंतर बोलत होते. पशुधन सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून वैरण
विकास उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपली संस्कृती निसर्ग
आणि मातीच्या संवर्धनाची कहाणी सांगते असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते
म्हणाले…
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
पशु संवर्धन तथा पर्यावरण विभागाअंतर्गत संपूर्ण राज्यात
महिलांसाठी कुक्कुटपालन योजना, शेळी मेंढी पालन योजना यासह शेतीसाठी
अन्य जोड व्यवसाय योजना निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर
मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती
शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र
नापसंती व्यक्त केली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ज्या क्रूर
शासनकर्त्याने हिंदूंची नृशंस हत्या केली, त्याची तुलना शिवाजी
महाराजांसोबत करणं म्हणजे मतांसाठी लांगुलचालन आहे. याबद्दल काँग्रेसने आणि
त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी माफी मागावी तसंच काँग्रेसच्या मित्र पक्षांनी याबाबत
आपली भूमिका स्पष्ट करावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं सिंहस्थ कुंभमेळ्यात
महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना, विधान
परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. त्या काल नाशिक इथं
विभागीय बैठकीत बोलत होत्या. या कुंभमेळ्यात मदत केंद्रं, हिरकणी
कक्ष, प्रसाधन गृह तसंच दिव्यांगासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी
यावेळी दिल्या.
****
वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराज जयंती
पर्यटन महोत्सवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात
आलं. या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृरदृश्यप्रणालीद्वारे
शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात मान्यवरांना
यावेळी सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री
इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
देशातल्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये आता दर
तासा-दीड तासाला स्वच्छता केली जाणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी
दिल्लीत रेल्वे सुधारणांबाबतच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सफाईसाठी
नियुक्त विशेष कर्मचारी,
शौचालयं, कचऱ्याचे डबे आणि कंपार्टमेंट्सची सतत
स्वच्छता करतील. बिछाना तसंच स्वच्छतेचं काम यापूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांना दिलं
जात होतं, आता ते एकाच कंपनीला दिलं जाईल, जेणेकरून जबाबदारी निश्चित
करून कार्यक्षमता वाढवता येईल, असंही वैष्णव यांनी सांगितलं.
रेल्वेच्या सामान्य श्रेणीतल्या डब्यांची सफाईसुध्दा प्रथम श्रेणीच्या
डाब्यांसारखीच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाशिवरात्रीचा उत्सव आज साजरा होत आहे. शिव पार्वती
विवाहाची आख्यायिका असलेल्या या उत्सवानिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये विविध
धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाड्यात परळी इथं वैद्यनाथ, औंढा
इथं नागनाथ तर वेरुळ इथं घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या
रांगा लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या खडकेश्वर इथल्या महादेव
मंदीरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, विशेष व्यवस्था करण्यात आली
आहे. सिडको एन वन परिसरातल्या नर्मदेश्वर मंदिरात आज सायंकाळी भक्तीगीत गायनाचा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
लातूर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर
देवस्थानची महाशिवरात्री निमित्त यात्रा आजपासून सुरु झाली.
****
लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या जानवळ इथल्या
जनार्दनराव राजेमाने आश्रमशाळेच्या इयत्ता नववीतल्या दोन विद्यार्थ्यांची इस्रो
शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण
विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत हा कार्यक्रम
राबवला जातो. महेश वैद्य आणि अभिषेक जाधव अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. ही
सहल आजपासून ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात देवनंद्रा इथल्या अरुणा
भुजंग थोरे या शेतकरी महिलेची युरोप खंडातील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
अरुणा थोरे यांनी नैसर्गिक शेती विकसित केली आहे. याची दखल घेऊन राज्य शासनानं
त्यांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. या युरोप दौऱ्यात स्वित्झर्लंड, नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी
या चार देशांतल्या आधुनिक शेती, तंत्रज्ञान तसंच फळप्रक्रियेचा अभ्यास
केला जाणार आहे. याविषयी माहिती देताना अरुणा थोरे म्हणाल्या,
बाईट – अरुणा थोरे
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा
फडकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तालुक्यातल्या सहा जिल्हा परिषद गट आणि १२
पंचायत समिती गणांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक चार, शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीन, यशवंत सेनेनं दोन, राष्ट्रवादी
काँग्रेसनं एक तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. नवनिर्वाचित तीन पंचायत
समिती सदस्यांनी भाजपत प्रवेश करून घेतल्यानं, भाजपचं संख्याबळ सात झालं
आहे.
****
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या दिंद्रुड इथं
देवदूत प्रतिष्ठानच्या वतीनं ४५ आशा सेविकांचा, पैठणी भेट देऊन सन्मान
करण्यात आला. सिने अभिनेत्री वर्षा ऊसगांवकर यांच्या हस्ते या आशा सेविकांना पैठणी
प्रदान करण्यात आली. आशा सेविकांच्या कार्यावर आधारित “आशा” सिनेमाचा खास शो या
कार्यक्रमात दाखवण्यात आला.
****
क्रिकेट
टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पारंपरिक
प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. कोलंबो इथं आयोजित हा
सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल. या स्पर्धेत आज वेस्ट इंडीज विरुद्ध नेपाळ
आणि अमेरिका विरुद्ध नामिबिया हे अन्य दोन सामने होणार आहेत.
दरम्यान, या स्पर्धेत काल आयर्लंडने ओमानचा, इंग्लंडने
स्कॉटलंडचा तर दक्षिण अफ्रिकेनं न्युझीलंडचा पराभव केला.
****
परभणी जिल्हयात “सिल्क अॅण्ड मिल्क” ही अभिनव संकल्पना
राबवली जात आहे. याचाच भाग म्हणून ११ मार्च पर्यंत महारेशीम अभियान राबवण्यात
येणार आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काल रेशीम चित्ररथाला हिरवा झेंडा
दाखवून अभियानाचा शुभारंभ केला. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना रेशीम शेतीचं
महत्त्व, शासकीय योजना तसंच अनुदानाची माहिती देण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित पहिल्या वैद्यकीय साहित्य
संस्कृती संमेलनाचा आज समारोप होत आहे. काल सकाळी ग्रंथ दिंडीने संमेलनाला प्रारंभ
झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment