Thursday, 26 February 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 26 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

सारथी योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३८८ विद्यार्थ्यांना सात कोटी २४ लाख रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वितरित झाली असल्याची माहिती सरकारने आज विधानसभेत दिली. उर्वरित ३७९ विद्यार्थ्यांसाठी ५ कोटी ९६ लाख रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्याचं नियोजन करण्यात आलं असून, ही योजना पुढेही सुरू राहील असं सरकारने स्पष्ट केलं. सदस्य जयंत पाटील, अभिजित पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

****

बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांबद्दल प्रश्न उपस्थित केला. काही स्वच्छतागृह बांधलेले असताना ते बंद आहेत, काहींचं बांधकाम पूर्ण झालं नसल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. यासंदर्भात माहिती घेण्याचे निर्देश दिल्याचं नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं.

****

निवडणूक निकाल जाहीर झालेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये अध्यक्षपद आणि सभापतीपदाची निवडणूक प्रक्रीया २० मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागानं जारी केले आहेत. नऊ फेब्रुवारी रोजी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. २० मार्चपूर्वी नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या सभेची बैठक घेण्याच्या सूचना विभागानं केल्या आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियमातील तरतुदीनुसार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो.

****

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या सात जागांचा समावेश आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पाच मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. सहा मार्च रोजी अर्जांची छाननी होईल, तर नऊ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. निवडणूक आवश्यक ठरल्यास १६ मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी केली जाणार आहे. शरद पवार यांच्यासह राज्यातल्या सात सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकरांनी देशाला गुलामगिरीच्या साखळ्यांपासून मुक्त करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या वीर सावरकरांच्या त्याग, समर्पण आणि वीरतेच्या गाथा अनंत काळापर्यंत प्रत्येक राष्ट्रप्रेमीसाठी राष्ट्रप्रथमविचारांचा दीपस्तंभ ठरतील, अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या रोपळेकर हॉस्पिटल जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेनिमित्त सावरकरांना अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

शहरातल्या समर्थनगर भागातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना, तसंच सेवाभावी संस्थाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे.

****

राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद – एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात न्यायपालिकेशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर समाविष्ट झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ही चूक नकळत झाल्याचे स्पष्ट करत शिक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार संबंधित पुस्तकाच्या वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. हे पाठ्यपुस्तक पुन्हा लिहिलं जाणार असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीला सुधारित आवृत्ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाईल, असं परिषदेकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून, न्यायपालिकेला बदनाम करण्याची परवानगी कुणालाही दिली जाणार नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं होतं.

****

दिल्लीत लाल किल्ला दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था – एनआयएनं दोन संशयितांना अटक केली. एकूण अटक झालेल्यांची संख्या आता ११ झाली आहे. जामीर अहमद आहंगर आणि तुफैल अहमद भट यांच्यावर प्राथमिक संशयिताला शस्त्रे पुरवण्याचा आरोप आहे. १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले होते.

****

मराठीचे व्याकरणकार, भाषांतरकार आणि मराठी विरामचिन्हाचे आद्य प्रणेते मेजर थॉमस कँडी यांच्या दीडशेव्या स्मृतीदिनाच्या निमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीनं आज मराठी विरामचिन्हेदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मेजर थॉमस कॅण्डी आणि विरामचिन्हेया विषयावर मराठी अभ्यासक डॉ. नागेश अंकुश हे विचार मांडणार आहेत. साहित्य परिषदेच्या वतीने ना गो नांदापुरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...