Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 20 February 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी; राज्यकारभाराचा
वस्तुपाठ महाराजांनी घालून दिला- आग्रा इथल्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी आणि ग्रामीण
अर्थव्यवस्थेलाही प्राधान्य द्यावं-राज्यपालांचं आवाहन
·
एसटी महामंडळाला २० ते २५ हजार बसगाड्या खरेदीसाठी तत्वतः
मान्यता
·
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ
आणि
·
'ऑपरेशन उपलब्ध' अंतर्गत जालना रेल्वे स्थानकातल्या
अनधिकृत दलालावर कारवाई
****
हिंदवी
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल उत्साहात साजरी करण्यात
आली. यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम पार पडले. शिवजयंतीनिमित्त उत्तर प्रदेशात
आग्रा किल्ला इथं ‘शिवजन्मोत्सव भारत वर्ष का’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील,
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे तसंच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार
उपस्थित होते. राज्यकारभार कसा चालवावा याचा आदर्श वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी
घालून दिला, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले..
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ आग्र्यातील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मीना बाजार
परिसरात राजा रामसिंग यांच्या कोठीमध्ये भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
त्यापूर्वी
काल सकाळी शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत
शिवजन्माचा सोहळा साजरा झाला. शिवरायांची पालखी पूजन तसंच पाळणा उत्सवात ते सहभागी
झाले होते.
छत्रपती
शिवाजी महाराज यांनी दाखवलेला मार्ग विकासाचा आणि प्रत्येकाच्या उत्थानाचा मार्ग असल्याचं
प्रतितपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. येत्या चार वर्षांनी महाराजांचा चारशेवा
जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सुनेत्रा
पवार यांनी यावेळी बोलतांना, शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी विकास आराखड्यासह
इतरही स्मारकांसंदर्भात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संकल्प पूर्ण करण्याची
जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं नमूद केलं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना शिवाजी
महाराज हे काळाच्या पुढे विचार करणारे राजे असल्याचं सांगितलं. शिवनेरी आणि जुन्नर
भागाचा विकास, स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग, तसंच सुरक्षित आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प शिंदे यांनी केला.
****
शिवजयंतीनिमित्त
सर्वत्र विविध कार्यक्रम पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं ठिकठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहन
फेरी काढण्यात आली. अनेक भागात रक्तदान शिबीर तसंच आरोग्य तपासणी शिबीरासह,
विविध स्पर्धां घेण्यात आल्या. शहरातल्या शिवरायांच्या पाच पुतळ्यांवर
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. डीजे मुक्त शिवजयंतीच्या आवाहनाला प्रतिसाद
देत, पारंपरिक ढोल ताशा वादनाला काल बहुतांश ठिकाणी प्राधान्य
दिल्याचं दिसून आलं.
भारतीय
जनता पक्षाच्या वतीने क्रांती चौक इथं पाच हजार युवतींना भगवे फेटे बांधण्यात आले.
जिल्हा
परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. पोलिस आयुक्त कार्यालयाला जिल्हा नियोजन समितीकडून
मिळालेल्या नऊ चारचाकी वाहनांचं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात
आलं.
**
नांदेड
इथं विविध पक्ष, संघटनांच्या वतीने शिवजयंतीनिमित विविध उपक्रम राबवण्यात आले.
नांदेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तसंच विविध पक्ष संघटनांच्या
पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं. शहरातल्या विविध भागातून ढोल, ताशा,
लेझीम पथक तसंच शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित देखावे सादर करत
मिरवणुका निघाल्या.
**
बीड इथं
शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान,
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, यांच्यासह इतर अधिकारी
आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते.
बीड जिल्हा
प्रशासनाच्या वतीने घेतलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रिया पवार यांनी एकच राजा इथे
जन्मला शिवनेरीच्या किल्लयावर, हे गाणे सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध
केलं.
**
लातूर इथं
‘गौरव गाथा शिवरायांची’ या कार्यक्रमांतर्गत शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग
रंगमंचावर साकारण्यात आले. त्यापूर्वी सादर झालेल्या ‘आम्ही जिजाऊच्या लेकी’ या कार्यक्रमात
शाहिरी पोवाडे आणि स्फूर्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आलं.
**
धाराशिव
शहरातील कलाकार कलायोगी राजकुमार कुंभार यांच्या कलाविष्कारातून, छत्रपती शिवाजी
महाराज यांची 2D आणि 3D प्रकारातील अद्भुत
कलाकृती साकारण्यात आली. या कलाकृतीची नोंद प्रक्रिया सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
शिवजयंतीनिमित्त
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा काल मांडण्यात
आली. ही पूजा पाहण्यासाठी अनेक भाविक काल तुळजापुरात दाखल झाले होते.
दरम्यान, श्री तुळजाभवानी
मंदिर संस्थानमध्ये तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी
महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं.
**
जालना जिल्ह्यात
शिवजयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज
पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी आकर्षक
मिरवणुका, व्याख्याने, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान आणि सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले.
**
परभणी तसंच
हिंगोली इथं शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी असंख्य शिवप्रेमींनी मोठी गर्दी
केली होती. शहरातल्या प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. शिवकालीन प्रसंगांचे
देखावे आणि देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं होतं.
****
जागतिक
पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही प्राधान्य दिलं
पाहिजे, असं आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं. ते काल मुंबईत
हवामान परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. रासायनिक शेतीचे गंभीर दुष्परिणाम असून
प्रदूषण आणि आजारांचं प्रमाण वाढत आहे, या पार्श्वभूमीवर नैसर्गिक
शेतीकडे वळण्याचं आणि पर्यावरणपूरक पद्धती अवलंबण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं. या
परिषदेच्या माध्यमातून हवामान बदलाच्या गंभीर प्रश्नावर देश-विदेशातल्या तज्ज्ञांनी
चिंतन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचं अभिनंदन केलं.
****
एसटीच्या
दीर्घकालीन धोरणानुसार पुढच्या काही वर्षांत २० ते २५ हजार बसगाड्या खरेदी करण्याला
राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली असून, यंदा पहिल्या टप्प्यात ८ हजार ३०० गाड्या
दाखल होणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकाद्वारे
ही माहिती दिली. राज्य शासनानं महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरच्या
ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्यानं प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागला. सध्या दररोज सुमारे
५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात; मात्र अनेक मार्गांवर फेऱ्या
अपुऱ्या पडत आहेत, असं त्यात म्हटलं आहे.
****
राज्य शिक्षण
मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यभरातील सोळा लाखाहून
अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी
तयारी करण्यात आली आहे. १८ मार्च पर्यंत दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे.
****
रेल्वे
आरक्षण प्रणालीतील बेकायदेशीर दलाली रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या 'ऑपरेशन उपलब्ध'
अंतर्गत जालना रेल्वे स्थानकावर काल एका दलालास ताब्यात घेण्यात आलं.
त्याच्याकडून १ हजार २७० रुपयांच्या किमतीची दोन रेल्वे आरक्षण तिकिटं, दोन भरलेले आरक्षण मागणी अर्ज आणि पाच कोरे अर्ज जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान
संबंधित आरोपीने मागील एका महिन्यापासून कमिशनच्या मोबदल्यात प्रवाशांसाठी तिकिटं काढून
देत असल्याची कबुली दिली. रेल्वे तिकिट केवळ अधिकृत आरक्षण काउंटर किंवा अधिकृत माध्यमांतूनच
खरेदी करावीत आणि दलालांशी व्यवहार टाळावा, असं आवाहन रेल्वे
प्रशासनानं केलं आहे.
****
महाराष्ट्र
राज्य स्मॉल अॅण्ड मीडियम न्यूज पेपर्स असोसिएशन या संघटनेच्या वतीनं देण्यात येणारा
यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार नांदेड इथले जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांना जाहिर
झाला आहे. येत्या शनिवारी २२ तारखेला चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथं आयोजित संघटनेच्या
अधिवेशनात बोकारे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष संतोष धरमकर
यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
टी ट्वेंटी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल वेस्ट इंडिजनं इटलीचा ४२ धावांनी, झिम्बाब्वेनं
श्रीलंकेचा ६ गडी राखून, तर अफगाणिस्तानने कॅनडाचा ८२ धावांनी
पराभव केला.
****
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था-बार्टी आणि छत्रपती संभाजीनगर इथलं महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातल्या युवक–
युवतींसाठी अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले
आहेत. विविध मुदतींचे हे कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहेत. अनुसूचित जाती
प्रवर्गातल्या युवक-युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा, हा या आयोजनाचा
उद्देश आहे. इच्छुकांनी सदर संस्थांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात मौजे सरसम कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. काल दुपारच्या
सुमारास हा अपघात झाला. मृत गजानन पांचाळ आणि शंकर देशमुख हे सरसम इथले रहिवाशी होते.
****
No comments:
Post a Comment