Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलग्रस्त भागात विकासाची नवी पहाट- राष्ट्रपतींचं
प्रतिपादन
· राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठीची मतदान प्रक्रिया
शांततेत पूर्ण
· वयोवृद्धांसह नवमतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क
आणि
· आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ
****
नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलग्रस्त भागात भीतीचं वातावरण
संपलं असून विकासाची नवी पहाट उजाडली असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी केलं आहे. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं बस्तर पंडुम उत्सवाचं उद्घाटन
केल्यानंतर बोलतांना राष्ट्रपती म्हणाल्या....
बाईट- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा
दलांबरोबर झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी मारले गेले. या भागात आता फक्त सात
नक्षलवादी शिल्लक राहिल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज वार्ताहरांना
सांगितलं. ३१ मार्चपर्यंत गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होईल, असा विश्वास निलोत्पल यांनी व्यक्त केला.
****
राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठीची
मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. या मतदानाची परवा नऊ तारखेला मतमोजणी होणार
आहे
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर तसंच धाराशिव या चार जिल्हा परिषदा आणि ३६ पंचायत समित्यांसाठी मतदान
झालं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ५१
पूर्णांक ३० शतांश टक्के मतदान झालं. परभणी जिल्ह्यात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत
५५ पूर्णांक ७१ टक्के, लातूर जिल्ह्यात सुमारे ५० टक्के, तर धाराशिव जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यत ५० पूर्णांक ७ टक्के मतदानाची
नोंद झाली.
****
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या काटेवाडी
इथं मतदानाचा हक्क बजावला. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यातल्या
शिरूर ताजबंद इथं, आमदार अभिमन्यू पवार यांनी कासार शिरशी
इथं तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजनी इथं मतदान केलं. आमदार अमित
देशमुख आणि धीरज देशमुख यांनी बाभळगाव इथं
मतदानाचा हक्क बजावला.
परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर
तालुक्यातील बोर्डी इथं आपला मतदानाचा हक्क बजावला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आमदार विलास भुमरे यांनी पैठण
इथं,
आमदार अनुराधा चव्हाण यांनी, तसंच
जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी फुलंब्री इथं तर माजी मंत्री अब्दुल सत्तार
यांनी सिल्लोड इथं मतदानाचा हक्क बजावला.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी धाराशिव तालुक्यातल्या
गोवर्धन वाडी इथं, आमदार तानाजीराव सावंत यांनी परंडा
तालुक्यातल्या मुगाव इथं, आमदार कैलास पाटील यांनी
सारोळा इथं तर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तेर इथं सपत्नीक मतदानाचा हक्क
बजावला.
उमरगा तालुक्यातल्या कोथळी इथं थल्या ९१ वर्षीय आजी सुमनबाई
नेमीनाथ गुरव यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. तर परभणी
जिल्ह्यात विश्रांती भोसले या नव मतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
आपल्या भावना तिने आकाशवाणीकडे या शब्दांत व्यक्त केल्या..
बाईट- विश्रांती भोसले
****
नाशिक जिल्ह्यातल्या
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर पदी इस्लाम पक्षाच्या नसरीन बानो खालिद शेख तर
उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांचा विजय झाला आहे. आज सकाळी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवडणूक
प्रक्रिया पार पडली.
****
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भारतीय जनता
पार्टीने रितू तावडे यांचं नाव आज जाहीर केलं, तर
उपमहापौर पदासाठी शिवसेनेने संजय घाडी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे मुंबई
अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या, तर
शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
****
सहकारातून समृद्धी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न
साकार करण्यसाठी विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्षमतेनं सहकार क्षेत्रात काम करावं
असं आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते आज
पुण्यात वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेत कृषी-व्यवसाय व्यवस्थापन
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ३१व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. ते म्हणाले…
बाईट - केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
****
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे राज्यस्तरीय पारितोषिकं
जाहीर झाली आहेत. विद्यापीठ गटात अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषि
विद्यापीठाला सलग तिसऱ्या वर्षी प्रथम पारितोषिक मिळालं आहे. कुलगुरू डॉ. शरद गडाख
यांच्या नेतृत्वात सौर ऊर्जेच्या प्रभावी वापरातून ऊर्जा संवर्धनात विद्यापीठाच्या
भरीव कामगिरीमुळे हे पारितोषिक विद्यापीठाला मिळालं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं उद्या संत श्री गजानन
महाराजांचा १४८ व्या प्रगट दिन उत्सव साजरा होणार आहे. राज्यातल्या विविध
जिल्ह्यातून अनेक दिंड्या शेगावकडे मार्गस्थ झाल्या आहेत. या पार्श्वभुमीवर उद्या
गजानन महाराज मंदिर २४ तास खुलं राहणार आहे.
दरम्यान, आज खामगाव -शेगाव
मार्गावरच्या लासुरा परिसरात एका वाहनातून पडून एका वारकऱ्याचा मृत्यू झाला.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने शेगाव इथं येत्या
२५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६ घेतला जाणार आहे, केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव
यांनी आज शेगाव इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यातल्या
शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं अवाहन जाधव
यांनी केलं.
****
आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरु झाली.
भारताचा या स्पर्धेतला पहिला सामना अमेरिका संघासोबत आज संध्याकाळी सात वाजता
मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होणार आहे. तत्पूर्वी, नेदरलँड
आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आजच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने
नेदरलँड संघाचा ३ गडी राखून पराभव केला. दरम्यान, कोलकत्ता
इथं वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड यांच्यात सध्या सामना सुरु आहे.
****
बीसीसीआय अर्थात भारत क्रिकेट नियामक मंडळाने १९
वर्षांखालील भारतीय पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाला साडेसात कोटी रुपयांचं
बक्षीस जाहीर केलं आहे. काल हरारे इथल्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या
आयसीसी १९ वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने
इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक विजेतेपद पटकावलं आहे.
****
देशाला महासत्ता करायचं असेल तर देशाचे शेतकरी आर्थिक सक्षम
झाले पाहीजेत,
असं मत नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद यांनी व्यक्त केलं
आहे. ते आज बीड जिल्ह्यातल्या परळी इथं बोलत होते. देशातील एकूण क्षेत्रापैकी केवळ
१५ टक्के एवढीच फळबाग लागवड केली जात असून, उत्तम
दर्जाचे फळे देशातून निर्यात झाली पाहिजेत, अशी
अपेक्षा रमेद चंद यांनी व्यक्त केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं २८
केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी आजपासून सुरळीतपणे सुरू झाली. या २८
केंद्रावर एकूण १२ हजार ६६० उमेदवारांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या येडेश्वरी साखर
कारखाना परिसरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भव्य स्मारक उभारण्यात
येणार आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ही घोषणा केली. येडेश्वरी साखर
कारखाना परिसरात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त
शहरात विविध ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम
राबवण्यात आले. कॅनॉट परिसरात रमाई यांच्या जयंतीनिमित्त आस्तेटिक कल्चर ग्रुपच्या
वतीने आज पहाटे रमाई पहाट या विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
****
No comments:
Post a Comment