Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· अमेरिका व्यापार करारात भारताचं हित साधण्यात यश आल्याचं सरकारचं प्रतिपादन
· येत्या शुक्रवारी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद
· समृद्ध शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेऊ नये-महसूलमंत्र्यांचं आवाहन
आणि
· १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचं भारतासमोर
३११ धावांचं आव्हान
****
भारत - अमेरिका व्यापार कराराबाबत उद्योग आणि वाणिज्य
मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं. या करारात भारताला आपल्या
महत्त्वाच्या क्षेत्रांचं हित साधण्यात यश आल्याचं गोयल यांनी सांगितलं. कृषी, दुग्धव्यवसाय
या क्षेत्रांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नव्या संधी
निर्माण होतील असं गोयल यांनी नमूद केलं. ते म्हणाले -
बाईट – केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल
गोयल यांचं हे निवेदन सुरू असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी
केली. या गदारोळातच गोयल यांनी आपलं निवेदन पूर्ण केलं. त्यापूर्वी सकाळी
सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्याचवेळी
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत घोषणाबाजी सुरू केली. सदनाची प्रतिमा कायम राखण्याचं आवाहन अध्यक्षांनी केलं..
बाईट – लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला
वारंवारच्या व्यत्ययानंतर सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यावर राष्ट्रपती अभिभाषणावरच्या आभार
प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. भाजपा खासदार निशीकांत दुबे यांनी काँग्रेसच्या
दिवंगत नेत्यांबाबतच्या विविध पुस्तकांचा दाखला देत टीका केली. पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना
पुस्तकांचा दाखल न देण्याविषयी सांगितलं, मात्र त्यांनी भाषण सुरूच ठेवलं, यामुळे
विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे सभागृहाचं कामकाज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
****
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर आज पुन्हा
चर्चा सुरू झाली. केंद्रीय मंत्री आणि सभागृह नेते जेपी नड्डा यांनी, राष्ट्रपतींचं हे अभिभाषण
देशाच्या विकासगाथेचं प्रतिबिंब असल्याचं
सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्था जगातील
सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था झाल्याचं, नड्डा यांनी नमूद केलं.
माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेने
केलेली लक्षणीय प्रगतीचा उल्लेख करत, सरकारचं अभिनंदन केलं.
****
समृद्ध शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेऊ
नये असं आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं
आहे.
ते
आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी कर्जमुक्त
व्हावा यासाठी प्रवीण परदेशी समिती काम करत असून, त्यांचा
अहवाल लवकरच असं बावकुळे यांनी सांगितलं."लातूर आणि धाराशिव
जिल्ह्यांचा हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे कायापालट होणार आहे. आगामी काळात जमिनींना मोठे
भाव येणार असल्याने शेतकऱ्यांनी घाईने जमिनी विकू नये, असं आवाहनही बावनकुळे
यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं.
ते म्हणाले..
बाईट
– महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
****
परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा
कार्यक्रम येत्या शुक्रवारी सकाळी १० वाजता प्रसारित होणार आहे. तणावमुक्त
वातावरणात परीक्षा देण्याचं महत्त्व तसंच मनाची शांतता, आत्मविश्वास वाढवणं आणि आव्हानांवर मात
करणं यासाठीचे उपाय याविषयी पंतप्रधान या कार्यक्रमातून विद्यार्थी, पालक
आणि शिक्षकांशी संवाद साधतात.
****
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक आजपासून सुरू
झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली सहा
सदस्यांची पत आणि वित्त धोरण समिती येत्या शुक्रवारी द्वैमासिक आढावा जाहीर करेल.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच केली
जाईल, असं
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सुनेत्रा पवार यांच्या
माध्यमातून पक्षाला मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भाजपाशी चर्चा आवश्यक असल्याचा पुनरुच्चार तटकरे यांनी केला.
****
अहिल्यानगर जिल्ह्याच्या
नेवासे तालुक्यात सौंदाणे नावाचं गाव आपल्या अनोख्या निर्णयांमुळे
आणि त्या निर्णयांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे वेगळं ठरत आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या
प्रतिनिधीकडून -
बाईट – मनोज सातपुते, अहिल्यानगर
****
जालना
महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी दहा तर उपमहापौर पदासाठी आठ नामनिर्देशपत्र आज वितरित
करण्यात आले.
महापौर
आणि उपमहापौर पदासाठी येत्या नऊ फेब्रुवारीला महापालिकेच्या सभागृहात निवडणूक
प्रक्रिया घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापौर तसंच उपमहापौर पदासाठी अर्जवाटप
आजपासून सुरू झालं असून, येत्या १० तारखेला ही निवडणूक होणार आहे.
****
कांद्याच्या दरात
होत असलेल्या घसरणीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथं शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको
आंदोलन केलं. तसंच येवला
कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद पाडत निषेध व्यक्त केला. कांद्याला
किमान दोन हजार रुपये हमीभाव मिळावा आणि ज्यांचा कांदा कमी दरात विकला गेला आहे, त्यांना
प्रतिक्विंटल एक
हजार
रुपये अनुदान द्यावं, अशा मागण्याचं निवेदन आंदोलकांनी तहसीलदारांना दिलं.
****
जागतिक क्रिकेटची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबने
क्रिकेटच्या ७३ नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये कनिष्ठ
गटासाठी आणि महिला खेळाडूंसाठी चेंडूचा आकार वेगवेगळा असणं, लॅमिनेटेड बॅटना
परवानगी, अपूर्ण धावेसाठी दंडात्मक कारवाई, आदी नियमांचा समावेश आहे.
त्याखेरीज नोबॉल, हिटविकेट, ओव्हर थ्रो यांमधल्या नियमांमध्येही बदल करण्यात आले
आहेत. यातले अनेक नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीने आधीच स्वीकारले
आहेत.
****
१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट
स्पर्धेच्या
उपांत्य फेरीत
आज भारताचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथे सुरू
असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि भारतासमोर
विजयासाठी ३११ धावांचं आव्हान दिलं आहे.
****
मुंबई–पुणे
द्रुतगती मार्गावर गेल्या सुमारे वीस तासांपासूनची वाहतुक कोंडी अजूनही सुटलेली नाही.
या मार्गावरच्या आडोशी बोगद्याजवळ काल संध्याकाळी ज्वलनशील वायू वाहतूक
करणारा टँकर उलटल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. या मार्गावर तीस किलोमीटरपर्यंत
वाहनांच्या रांगा
लागल्या आहेत.
राज्य
मार्ग परिवहन महामंडळाने पुणे मुंबई मार्गावरच्या १३९ बस फेऱ्या
रद्द केल्या
आहेत.
****
No comments:
Post a Comment