Saturday, 14 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 14 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असून विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घघाटन होणार आहे. दिब्रुगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगत विकसित केलेल्या मोरन बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधेचे ते थोड्याच वेळात उद्घघाटन करतील. भारतीय हवाई दलाच्या समन्वयाने आणीबाणीच्या वेळी लष्करी आणि नागरी विमान उतरवणे आणि उड्डाणासाठीची ही ईशान्य भारतातील पहिलीच सुविधा आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बीड जिल्ह्यातल्या परळी इथं आज आगमन झालं. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं परळीतील ओपळे मैदान इथं आयोजित महापशुधन प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती, कालपासून सुरु झालेल्या या प्रदर्शनाचा आजचा दुसरा दिवस असून उद्या समारोप होणार आहे.

****

बीड जिल्ह्यातील केज इथं आज शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट, शिवसेनेच्या उपनेत्या आणि माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षाचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

****

आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने समाधाकारक आणि चांगलं काम केलं असल्याचं विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत सांगितलं. आमच्या पक्षाची पंचायत समितीमध्ये महत्त्वाची भूमिका असेल असंही अंबादास दानवे यावेळी म्हणाले.

****

२०२४ या वर्षासाठीचे मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्गमय निर्मितीसाठीचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार काल राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले. प्रौढ वाङ्गमय, बाल वाङ्गमय, प्रथम प्रकाशन आणि सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार अशा चार प्रकारांमध्ये एकंदर ३५ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

****

राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत २०२५ या वर्षासाठी राज्यस्तरीय तसंच विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारस्पर्धा जाहीर करण्यात आली असून या विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून १५ मार्च २०२६ पर्यंत प्रवेशिका मागवण्यात येत आहेत. यावर्षी देखील उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती असे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

हे पुरस्कार १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनासाठी दिले जाणार असून याविषयीची सविस्तर माहिती आणि अर्ज नमुने www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

****

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड इथं देवदूत प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी आशा सेविकांच्या कार्यावर आधारित ‘आशा’ चित्रपट दाखवण्यात आला. ‘आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती’चे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे, सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते यावेळी ४५ आशा सेविकांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. शासकीय तसंच सामाजिक पातळीवर कायम दुर्लक्षित असलेल्या आशा सेविकांना कायम स्वरुपी सेवेत सामावून घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरणार आहोत, असं ओमप्रकाश शेटे यांनी यावेळी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात सिल्क ॲण्ड मिल्क ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत असून त्याअंतर्गत असणाऱ्या महा-रेशीम अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा अवलंब करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रेशीम चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात ११ मार्चपर्यंत महा-रेशीम अभियान राबवण्यात येणार आहे.

****

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेत आर्यलँड आणि ओमान यांच्यात कोलंबो इथं सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आयर्लंडने ५ बाद २३५ धावा केल्या असून ओमानला विजयासाठी २३६ धावांचं आव्हान दिलं.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...