Thursday, 12 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून तीन लाख ६० हजार कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी

·      लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाईचा केंद्राचा निर्णय

·      दूरदर्शनच्या माजी वृत्तनिवेदक सरला माहेश्वरी यांचं निधन

·      धाराशिव जिल्ह्यात अफूची झाडं जप्त तर बीड जिल्ह्यात गांजाच्या तस्करीचं रॅकेट उघड

आणि

·      जालना औद्योगिक वसाहतीत ठिबक सिंचनचं उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण आग

****

संरक्षण अधिग्रहण परिषद-DAC ने तीन लाख ६० हजार कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत वायू दलासाठी राफेल विमानं, क्षेपणास्त्रं तसंच छद्म उपग्रह, नौदलासाठी गॅस आधारित विद्युत जनरेटर, हेरगिरीसाठीची विमानं, तसंच पायदळासाठी रणगाडे आणि रणगाडेरोधी बॉम्बची खरेदी केली जाणार आहे. यापैकी बहुतांश राफेल विमानांची बांधणी देशांतर्गत केली जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

लोकसभेने औद्योगिक संबंध संहिता विधेयक, २०२६ आज मंजूर केलं. हे विधेयक औद्योगिक संबंध संहिता, २०२० मध्ये सुधारणा करतं. ट्रेड युनियन कायदा १९२६, औद्योगिक रोजगार कायदा, १९४६ आणि औद्योगिक वाद कायदा, १९४७ यामधली  संभाव्य गुंतागुंत टाळणं, हे या नवीन विधेयकाचं उद्दीष्ट आहे.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज राज्यसभेत अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देत आहेत. या अर्थसंकल्पातून सततच्या विकासावर लक्ष केंद्रीत केल्याचं, सीतारामन यांनी सांगितलं. जागतिक आव्हानांचा विचार करून देशवासियांसाठी हा अर्थसंकल्प तयार केल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

भारतीय रेल्वेने पश्चिम बंगालमधल्या डंकुनी ते गुजरातच्या सुरत या मालवाहतुक मार्गिकेच्या जलद कार्यान्वयनासाठी कार्यवाही सुरू केली आहे. सुमारे दोन हजार किलोमीटरची ही मार्गिका झारखंड, ओडिशा आणि महाराष्ट्रातून जात आहे.

****

काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कथित असभ्य वर्तनाविरोधात कारवाईचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान निराधार वक्तव्य करून सदनाची दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट – किरेन रिजीजू

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भात वार्ताहरांशी बोलतांना गांधी यांनी कोणत्याही पुराव्यांशिवाय निराधार विधानं केल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांचं सदनातलं तसंच सदनाबाहेरचं वर्तन हे अपरिपक्व असल्याची टीका जोशी यांनी केली. ते म्हणाले

बाईट – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

राहुल गांधी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा प्रस्ताव, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सदनात सादर केला आहे. या प्रकाराची दखल घेऊन गांधी यांचं सदस्यत्व रद्द करावं, आणि त्यांनी निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घालावी, असं दुबे यांनी म्हटलं आहे.

बाईट - खासदार निशिकांत दुबे

****

पशुवैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रात स्वायत्त आणि स्वतंत्र पशुवैद्यकीय परिषदेची स्थापना करणं ही काळाची गरज असल्याचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलत होते. पशु आरोग्य सेवा, व्यवस्थापन संरचना आणि व्यावसायिक मानदंड अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात यावा, असं आवाहन भागवत यांनी यावेळी केलं.

****

राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचं वेगानं परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज सह्याद्री अतिथीगृह इथं टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी बोलत होते. राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारण्याला शासनाचं प्राधान्य आहे. या भागीदारींमुळे विविध कल्याणकारी शासकीय योजना अधिक लोकोपयोगी होण्यास मदत होणार आहे.

****

दूरदर्शनच्या माजी वृत्तनिवेदक सरला माहेश्वरी यांचं आज निधन झालं. त्या ७० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निकटवर्तीयांनी समाजमाध्यमांवर ही माहिती दिली. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. दूरदर्शनवर अनेक वर्षं वृत्तनिवेदन करणाऱ्या माहेश्वरी यांची संयत वृत्तनिवेदन शैली, सर्वसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

****

केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांच्या विरोधात प्रमुख १४ कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आज देशाच्या विविध भागात अंशतः प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीने बंदला पाठिंबा दिला होता. बीडमध्येही आज सीटू या कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या  मोर्चामध्ये ८०० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यातील सर्व कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावीत आणि त्यातील कोणतीही कामे अर्धवट राहू नयेत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री  सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत. आज दूरदृष्य प्रणालीद्वारे बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्यात पवार बोलत होत्या. या बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, नांदेड जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या ५०६ कोटी ३८ लाख रुपयाच्या प्रारुप आराखड्याला आज मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली.

****

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेनं वाशी तालुक्यातील दशमेगाव शिवारातून अफूची ४८५ किलो वजनाची झाडं जप्त केली आहेत. पोलीस अधिक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनानुसार धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. या प्रकरणी मनोहर उघडे या शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अफूची किंमत सुमारे ७२ लाख ८५ हजार रुपये असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यात नेकनूर पोलिसांनी गांजाच्या तस्करीचं रॅकेट उघडकीस आणलं आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी एका शेतात छापा मारत ११ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत २ लाख ७८ हजार ७५० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.

****

जालना औद्योगिक वसाहत फेज तीनमध्ये असलेल्या ठिबक सिंचनचं उत्पादन करणाऱ्या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत कंपनीतल्या उत्पादन विभागातल्या साहित्यासह, गोदामातील ठिबक सिंचन सेट आणि इतर साहित्याचं नुकसान झालं. दरम्यान, जालना अग्निशन दलाच्या चार बंबाच्या मदतीने तीन तासात ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

****

परभणीच्या महापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सय्यद इकबाल सय्यद काजी तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची बहुमताने निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सय्यद इकबाल यांना ३७ मतं तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना २६ मतं मिळाली. उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी ३८ मतं मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाझेमा शेख यांचा पराभव केला.

****

महाशिवरात्रीचा उत्सव येत्या रविवारी साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथं घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येतात, या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने तयारीची आढावा बैठक घेण्यात आली.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथल्या महाशिवरात्री यात्रा महोत्सव २०२६ नियोजनार्थ आज आढावा बैठक घेण्यात आली.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतला आहे.

****

जालना जिल्हा बालविवाहमुक्त करण्याच्या दिशेने आज जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते बालविवाह निर्मूलन चित्ररथाचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालय तसंच इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा जनजागृती रथ जालना शहरासह आठही तालुक्यांत फिरणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना बालविवाहाच्या दुष्परिणामांची माहिती दिली जाणार आहे.

****

क्रिकेट

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना नामिबियाबरोबर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...