Saturday, 14 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा केंद्राचा निर्णय

·      कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणालाही मंजुरी

·      शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा-परळी इथं महापशुधन प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·      पाथरीच्या अरुणा थोरे या शेतकरी महिलेची युरोप अभ्यास दौऱ्यासाठी निवड

आणि

·      छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं शिवकालीन युद्धनौका प्रदर्शनाचं आयोजन

****

एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना याचा लाभ होईल. यातून शहरांचा पुनर्विकास, शहरांचं वृद्धी केंद्रात रुपांतर तसंच पाणी आणि स्वच्छता या समस्यांवर काम केलं जाईल. याशिवाय १० हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंडस्‌ही केंद्र सरकार सुरू करणार आहे.

कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

राष्ट्रीय महामार्ग १६० ए च्या घोटी-त्र्यंबकेश्वर-पालघर या टप्प्याच्या चौपदरीकरणालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे हा भाग दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. १५४ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी ३ हजार ३२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची साऊथ ब्लॉक मध्ये झालेली ही शेवटची बैठक होती. या पुढे मंत्रिमंडळाच्या बैठका सेवा तीर्थमध्ये होणार आहेत. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचं रुपांतर ‘युगे युगीन भारत’ या संग्रहालयात होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

****

रासायनिक खतामुळे शेतीची उत्पादकता कमी होत असून, या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी जीवामृत नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज बीड जिल्ह्यातील परळी इथं महा पशुधन एक्स्पोला भेट दिल्यानंतर बोलत होते. पशुधन सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून वैरण विकास उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आपली संस्कृती ही निसर्ग आणि मातीच्या संवर्धनाची कहाणी सांगत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पशु संवर्धन तथा पर्यावरण विभागा अंतर्गत संपूर्ण राज्यात महिलांसाठी कुक्कुटपालन योजना, शेळी मेंढी पालन योजना यासह अन्य शेतीसाठी जोड व्यवसाय योजना निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान याच्यासोबत केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र टीका केली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. टिपू सुलतान सारख्या क्रुर शासनकर्त्याने लाखो हिंदूंची हत्या केली होती. त्याची तुलना शिवाजी महाराजांसोबत करणं म्हणजे मतांसाठी लांगुलचालन आहे. याबद्दल काँग्रेसने आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी माफी मागावी तसंच काँग्रेसच्या मित्र पक्षांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

नागपूर इथं आज पंतप्रधान ई-बस योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ५० ई-बसचं लोकार्पण करण्यात आलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलतांना, अवघ्या अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये या बस २५० किलोमीटरपर्यंत धावू शकत असल्याची माहिती दिली. या बस सौर ऊर्जेवर चार्ज होणार आहेत.

****

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं या वर्षीपासून सुरू होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. त्या आज नाशिक इथं विभागीय बैठकीत बोलत होत्या. या कुंभमेळ्यात मदत केंद्रं, हिरकणी कक्ष, प्रसाधन गृह तसंच दिव्यांगासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****

बीड जिल्ह्यातील आष्टी इथं दिवाणी न्यायालय - वरिष्ठ स्तर न्यायालय इमारतीचं उद्घाटन आज करण्यात आलं. या न्यायालयाच्या स्थापनेमुळं आष्टी तालुक्यातील नागरिकांना न्यायासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज कमी होऊन स्थानिक पातळीवरच जलद आणि सुलभ न्याय मिळणार असल्याचं, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात देवनंद्रा इथल्या अरुणा भुजंग थोरे या शेतकरी महिलेची युरोप खंडातील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. अरुणा थोरे यांनी नैसर्गिक शेती विकसित केली आहे. याची दखल घेऊन राज्य शासनानं त्यांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. या युरोप दौऱ्यात स्वित्झर्लं, नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी या चार देशांतील आधुनिक शेती, तंत्रज्ञान तसंच फळप्रक्रियेचा अभ्यास केला जाणार आहे. १६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान हा दौरा होणार आहे.

****

बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या दिंद्रुड इथं देवदूत प्रतिष्ठानच्या वतीनं ४५ आशा सेविकांचा, पैठणी भेट देऊन सन्मान करण्यात आला. सिने अभिनेत्री वर्षा गांवकर यांच्या हस्ते या आशा सेविकांना पैठणी प्रदान करण्यात आली. आशा सेविकांच्या कार्यावर आधारित “आशा” सिनेमाचा खास शो या कार्यक्रमात दाखवण्यात आला.

****

लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील जानवळ इथल्या जनार्दनराव राजेमाने आश्रमशाळेच्या इयत्ता नववीतील दोन विद्यार्थ्यांची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जातो. महेश वैद्य आणि अभिषेक जाधव अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. ही सहल १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृतींचं दर्यापती शिवराय मराठा आरमार युद्धनौका प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. येत्या १७ आणि १८ तारखेला शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात आयोजित हे प्रदर्शन मंगळवारी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तसंच बुधवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं येत्या १६ ते १८ फेब्रुवारी पर्यंत छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय एकांकिका करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत जास्तीत जास्त कलाकारांनी आपला सहभाग नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात “सिल्क अ‍ॅण्ड मिल्क” ही अभिनव संकल्पना राबवली जात आहे. याचाच भाग म्हणून ११ मार्च पर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज रेशीम चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व, शासकीय योजना तसंच अनुदानाची माहिती देण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज पहिल्या वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलनाला ग्रंथ दिंडीने प्रारंभ झाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी निबंध, कविता सादरीकरण आणि वक्तृत्व स्पर्धेसह, आरोग्य जनजागृती करण्यात आली. आज या संमेलनात ललित लेख अभिवाचन, मराठी गझल संमेलन, नाट्य संगीत आदी कार्यक्रम पार पडले. उद्या दिग्दर्शक पद्मश्री जब्बार पटेल यांच्या प्रकट मुलाखतीसह भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

क्रिकेट

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात आयर्लंडने ओमानचा ९६ धावांनी पराभव केला.

स्कॉटलंड आणि इंग्लंड संघात सध्या कोलकाता इथं सामना सुरू असून, स्कॉटलंडने दिलेलं आव्हान पार करण्यासाठी इंग्लंड संघाला ३२ चेंडूत ५ धावांची गरज आहे.

आज तिसरा सामना अहमदाबाद इथं न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघात होणार आहे. सायंकाळी सात वाजता सामना सुरू होईल.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...