Saturday, 28 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला राजस्थानात अजमेर इथून प्रारंभ

·      गुजरातमध्ये साणंद इथं सेमीकंडक्टर प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

·      राज्यात एकात्मिक कापूस खरेदीला १५मार्चपर्यंत मुदतवाढ

·      होळी आणि धुळवडीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचं पंकजा मुंडे यांचं आवाहन

आणि

·      एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक नसल्याचा महामंडळाचा खुलासा

****

एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला आज राजस्थानात अजमेर इथून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पाच मुलींना ही लस देण्यात आली, हे लसीकरण महिला सक्षमीकरणातलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावं, याकरता १४ वर्ष वयाच्या मुलींना ही लस देण्यात येणार आहे. दरवर्षी १ कोटी १५ लाख मुलींना लस देण्याचं उद्दिष्ट आहे. हे लसीकरण ऐच्छिक असून, सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत दिली उपलब्ध आहे.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधे साणंद इथं मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या सुसज्जतेबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत साडेबावीस हजार कोटींहून जास्त गुंतवणूक असलेला हा पहिला मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूल्सचा व्यावसायिक उत्पादन प्रकल्प आहे. इथून अधिकृत निर्यातदेखील सुरू होणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

****

गिग कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी केंद्र सरकारनं सामाजिक सुरक्षा संहिता २०२० लागू केली आहे, यामुळे या कामगारांसाठी राज्य सरकारला स्वतंत्र महामंडळ स्थापन करता येणार नाही, असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केलं. ते आज विधानसभेत बोलत होते.

****

शासनानं राज्यात एकात्मिक कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे. राज्य सरकारनं निवेदनाद्वारे आज विधानसभेत ही माहिती दिली. यात प्रतिएकर उत्पादकतेच्या आधारे खरेदीची मर्यादा ठरवली जाणार आहे. दरम्यान उद्या १ मार्च पासून हरभरा खरेदी ५ हजार ८८५ रुपये प्रति क्विंटल हमीभावानं सुरू करण्यात येणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

****

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला प्रारंभ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानाबाबत माहिती दिली, ते म्हणाले -

बाईट - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

****

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर देशातील पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितलं. त्या आज विधान परिषदेत बोलत होत्या. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यात अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होणार असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली.

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातल्या मोठ्या रुग्णालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं, मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. राज्यातल्या चार हजारांहून जास्त रूग्णालयात ही योजना लागू असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली.

****

इस्रायलने आज इराणवर हल्ला चढवला असून देशात आणीबाणी पुकारली आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एअर इंडियाने या भागातली आपली सगळी उड्डाणं स्थगित केली आहेत.

****

राष्ट्रीय विज्ञान दिन’ आज देशभरात साजरा होत आहे. नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी वी रामन यांनी, ‘रामन इफेक्ट’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला, त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून आजचा दिवस ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशातले शास्त्रज्ञ आणि संशोधकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

होलिका दहनाचा सण परवा दोन तारखेला तर तीन मार्चला धुलिवंदनाचा सण साजरा होणार आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी होळी सणानिमित्त नागरिकांना पर्यावरणपूरक रंग वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या -

बाईट - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

****

एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक केलेलं नाही, असं एसटी महामंडळानं स्पष्ट केलं आहे. सवलत धारक प्रवाशांना हे कार्ड बंधनकारक असल्याची अफवा समाज माध्यमांवर पसरली आहे. तथापि, जोपर्यंत ८० टक्के सवलत धारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य केलं जाणार नाही, असा खुलासा एसटी महामंडळानं केला आहे.

दरम्यान या स्मार्ट कार्ड’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,या कार्डच्या नोंदणीची संख्या आता एक लाखाच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

****

महाशिबिर आणि योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती तसंच शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी केलं आहे. ते आज नांदेड जिल्ह्यातील भोकर इथं विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवांच्या महामेळाव्यात बोलत होते. येत्या १४ मार्च रोजी आयोजित लोक अदालतीत प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी पक्षकार आणि विधीज्ञांनी पुढाकार घ्यावा, असंही न्यायमूर्ती धोटे यांनी म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय ‘डिपेक्स - २०२६ या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन यांच्या संयुक्त विद्यमानं, ५ ते ८ मार्च दरम्यान आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. बीड बायपास परिसरातल्या एमआयटी महाविद्यालयात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील महाविद्यालयांचे संघ, उद्योजक, संशोधक, इनक्युबेशन सेंटर आणि धोरणनिर्माते सहभागी होणार आहेत.

****

आंध्रप्रदेशात काकीनाडा इथं एका फटाका कारखान्यात आज स्फोट झाला. या स्फोटात वीस लोक ठार झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. श्रीलंकेत पल्लेकेले इथं सायंकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान, सुपर आठ फेरीत उद्या कोलकाता इथे भारताचा सामना वेस्ट इंडिज सोबत होणार आहे. या स्पर्धेतले उपान्त्य फेरीतले सामने ४ आणि ५ मार्च रोजी तर अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळला जाणार आहे.

****

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत असलेल्या विविध ८८ शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक सत्र जानेवारी २०२६ करीता ऑनलाईन प्रवेश घेण्यास १६ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...