Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 March 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यासाठीच्या
एचपीव्ही देशव्यापी लसीकरण मोहिमेला प्रारंभ
·
राज्यात एकात्मिक कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
·
अजित पवार यांचं विमान झाडांना आदळल्यानंतर बारामतीच्या
धावपट्टीवर कोसळल्याचा प्राथमिक अहवाल
·
होळी आणि धुळवडीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचं
पंकजा मुंडे यांचं आवाहन
आणि
·
टी –ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत – वेस्ट
इंडिज लढत
****
एचपीव्ही
लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला काल राजस्थानात अजमेर इथून प्रारंभ झाला. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल पाच मुलींना ही लस देण्यात आली, हे लसीकरण
महिला सक्षमीकरणातलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गर्भाशय
मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावं, याकरता १४ वर्ष वयाच्या मुलींना ही लस
देण्यात येणार आहे. दरवर्षी एक कोटी १५ लाख मुलींना लस देण्याचं उद्दिष्ट आहे. हे लसीकरण
ऐच्छिक असून, सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध
आहे.
दरम्यान, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये साणंद इथं मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक
सेमीकंडक्टर प्रकल्पाचं काल उद्घाटन करण्यात आलं. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या
सुसज्जतेबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले,
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
इंडिया
सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत साडेबावीस हजार कोटींहून जास्त गुंतवणूक असलेला हा पहिला
मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूल्सचा व्यावसायिक उत्पादन प्रकल्प आहे. इथून
अधिकृत निर्यातदेखील सुरू होणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या
दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.
****
राज्यातल्या
विविध विमानतळांच्या विकासकामांना कालबद्ध गती देण्यात यावी, असे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधिमंडळात विमानतळ विकास प्राधिकरणच्या
संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीत नांदेड, सिंधुदुर्ग आणि नागपूर इथल्या कार्यरत विमानतळांच्या सुविधा विस्तार आणि आधुनिकीकरणाचा
आढावा घेण्यात आला.
****
गिग कामगार
आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी केंद्र सरकारनं सामाजिक सुरक्षा संहिता २०२० लागू केली
आहे, यामुळे या कामगारांसाठी राज्य सरकारला स्वतंत्र महामंडळ स्थापन
करता येणार नाही, असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट
केलं. ते काल विधानसभेत बोलत होते.
**
राज्यात
एकात्मिक कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती, राज्य सरकारने
काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. यात प्रतिएकर उत्पादकतेच्या आधारे खरेदीची मर्यादा
ठरवली जाणार आहे.
दरम्यान, आज एक मार्च
पासून हरभरा खरेदी पाच हजार ८८५ रुपये प्रति क्विंटल हमीभावानं सुरू करण्यात येणार
असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
**
राज्यात
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला प्रारंभ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी या अभियानाबाबत माहिती दिली, ते म्हणाले,
बाईट - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
**
हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर देशातली पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन
सिस्टीम बसवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी
सांगितलं. त्या काल विधान परिषदेत बोलत होत्या. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक
सक्षम होऊन भविष्यात अपघातांचं प्रमाण घटण्यास मदत होणार असल्याची माहिती बोर्डीकर
यांनी दिली.
दरम्यान, मुंबई महानगर
प्रदेशातल्या मोठ्या रुग्णालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा
फुले जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं, बोर्डीकर यांनी सांगितलं. राज्यातल्या चार हजारांहून जास्त रूग्णालयात ही योजना
लागू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
नवी मुंबईत
खारघर इथं श्री गुरु तेग बहादुर यांच्या साडे तिनशेव्या हौतात्म्य वर्षानिमित्त आयोजित
‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत भक्ती, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचं अद्वितीय
वातावरण अनुभवायला मिळत आहे. देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर पूर्णपणे
आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला आहे.
****
माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांचं विमान झाडांना आदळून त्यानंतर बारामतीच्या धावपट्टीवर अपघातग्रस्त
झाल्याचं हवाई अपघात तपास संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल काल प्रसिद्ध झालं.
अपघातानंतर विमानानं पेट घेतला आणि त्यात संपूर्ण कॉकपिट आणि केबिन जळून खाक झालं.
विमानातले दोन्ही रेकॉर्डर्सही आगीच्या तडाख्यात सापडले, त्यामुळे
त्यांच्यातला डेटा मिळवण्यासाठी विशेष तंत्र वापरावं लागलं, असंही
अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यापैकी एस एस एफ डी आर या रेकॉर्डरमधला रॉ डेटा डाऊनलोड
करण्यात यश आल्याचं अहवालात सांगितलं आहे.
****
एसटी प्रवास
भाड्यात सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक केलेलं नाही, असं एसटी महामंडळानं स्पष्ट केलं आहे. सवलत धारक प्रवाशांना हे कार्ड बंधनकारक
असल्याची अफवा समाज माध्यमांवर पसरली आहे. तथापि, जोपर्यंत ८०
टक्के सवलत धारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य
केलं जाणार नाही, असा खुलासा एसटी महामंडळानं केला आहे.
दरम्यान, या स्मार्ट
कार्ड उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या कार्डच्या नोंदणीची संख्या आता एक लाखाच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याचं परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.
****
होलिका
दहनाचा सण उद्या दोन तारखेला तर परवा तीन मार्चला धुळवडीचा सण साजरा होणार आहे. राज्याच्या
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी होळी सणानिमित्त नागरिकांना पर्यावरणपूरक रंग वापरण्याचं
आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या,
बाईट - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
****
यंदाचा
रणजी करंडक प्रथमच जम्मू काश्मीर संघाने पटकावला आहे. कर्नाटक संघासोबत झालेल्या अंतिम
सामन्यात दुसरा डाव अनिर्णित राहिला, पण पहिल्या डावातल्या आघाडीमुळे जम्मू
काश्मीर संघाला विजेता घोषीत करण्यात आलं. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला तसंच माजी क्रिकेटपटू भारतरत्न
सचिन तेंडुलकर यांनी जम्मू काश्मीर संघाचं अभिनंदन केलं आहे.
****
टी–ट्वेंटी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर आठ फेरीत आज कोलकाता इथं भारताचा सामना वेस्ट इंडिज
सोबत होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
दरम्यान, या स्पर्धेत
काल पाकिस्ताननं श्रीलंकेला पाच गडी राखून पराभूत केलं. या विजयानंतरही पाकिस्तान स्पर्धेबाहेर
गेला आहे. सुपर आठ गटातील ग्रुप ब मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडने, तर ग्रुप अ मध्ये दक्षिण आफ्रिकेनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतासाठी
आजचा सामना उपान्त्य फेरीतल्या प्रवेशासाठी निर्णायक ठरणार आहे.
****
नाशिक इथं
सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात काल विविध विषयांवरचे परीसंवाद पार पडले.
एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठीला बळ मिळेल तसंच माध्यमं मराठी ही भाषा सशक्त
करत असल्याचं मत विविध परीसंवादांमध्ये व्यक्त करण्यात आलं. माध्यमांमध्ये मराठी भाषेचा
शुद्ध, सुबोध, समृद्ध आणि प्रभावी वापर व्हावा या
उद्देशानं माध्यमं नेहमीच पुढाकार घेत असल्याचा सूर चर्चासत्रात उमटला.
****
महा विधी
सेवा शिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची संकल्पना
प्रत्यक्षात आणणे, हा या मेळाव्यांचा मूळ उद्देश असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा लातूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर
यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं महामेळाव्यात बोलत होते. त्यांनी यावेळी या मेळावा
आयोजनाबाबत प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं.
****
नांदेड
जिल्ह्यात भोकर इथंही काल विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवांचा महामेळावा पार पडला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी यावेळी मार्गदर्शन
केलं.
****
No comments:
Post a Comment