Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13
February 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा ९ मार्चपासून
सुरू होईल आणि २ एप्रिलपर्यंत चालेल. लोकसभेत आज अखेरच्या दिवशीही विरोधी पक्षाच्या
सदस्यांनी विविध मुद्द्यांवरुन गदारोळ केल्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत
आणि त्यानंतर नऊ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलं.
सरकारच्या कडधान्य स्वावलंबन
अभियानामुळे २०३०-३१ पर्यंत देश कडधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होईल,असा विश्वास
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराचा
तासात कडधान्य आणि त्यासंदर्भातल्या विविध प्रश्नांना चौहान उत्तर देत होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
नवी दिल्लीत ‘सेवातीर्थ’ इमारत संकुलाचं अनावरण करणार आहेत. या संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय
सुरक्षा परिषद सचिवालय तसंच मंत्रिमंडळ सचिवालयाचा समावेश आहे. सेवातीर्थसोबतच कर्तव्यभवन
१ आणि २ यांचं औपचारिक उद्घाटनही पंतप्रधान करतील. सायंकाळी ६ वाजता सेवातीर्थ इथं
आयोजित सार्वजनिक कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत. कर्तव्यभवन १ आणि २ या नव्या
इमारतींमुळे वित्त, संरक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कृषी यासह
अनेक महत्त्वाची मंत्रालयं प्रशस्त आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा जागेतून कामकाज
करणार आहेत.
****
जागतिक रेडिओ दिन आज साजरा
होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी यानिमित्त सर्वांना
शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत सर्वसामान्य नागरिकासाठी
रेडिओ योगदान देत असल्याचं मुरुगन यांनी या संदेशात म्हटलं आहे.
रेडिओ दिनानिमित्त आकाशवाणीच्या
वतीने छत्तीसगडमध्ये रायपूर इथं आज जागतिक रेडिओ दिन परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं
आहे. युनेस्कोच्या सहकार्याने होत असलेला हा परिसंवाद, “रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता:
एआय हे एक साधन आहे, आवाज नाही.” या यंदाच्या रेडिओ दिनाच्या संकल्पनेवर आधारित
आहे.
दरम्यान, जागतिक रेडिओ
दिना निमित्ताने छत्रपती संभाजीनगर इथले रेडिओ प्रेमी संजय पवार यांनी आज रेडिओ प्रदर्शन
आयोजित केलं आहे. एन आठ परिसरात वेणुताई चव्हाण शाळेजवळ आयोजित हे प्रदर्शन सर्वांसाठी
खुलं आहे. सुमारे चारशेहून अधिक विविध प्रकारचे रेडिओ या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.
****
राज्यात दिव्यांग व्यक्ती
अधिनियम अंतर्गत साधारणत: दोन हजारांहून अधिक संस्था कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ९००
संस्था विविध कारणांमुळे अपात्र ठरल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. दिव्यांग
कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली. नोंदणी रद्द केलेल्या संस्थांमध्ये
कोकणातल्या ५२, नाशिक विभगातल्या ४९, पुणे ६०, नागपूर ४९, अमरावती ५०
आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील १०३ संस्थांचा समावेश आहे.
****
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी
संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक
संवर्गातील पाच हजार १२ रिक्त पदं भरण्यास
शासनाने मान्यता दिली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी
ही माहिती दिली. ज्या शैक्षणिक संस्थांकडे 'नॅक' मान्यता आहे, त्यांनाच नवीन
पदनिर्मितीचा लाभ मिळेल, असं पाटील यांनी सांगितलं आहे.
****
परभणी जिल्हा पोलिस दलातील
९७ रिक्त जागांसाठी होणारी शिपाई आणि शिपाई चालक भरती प्रक्रिया उद्या पासून सुरु होणार
आहे. पाच मार्चपर्यंत चालणार्या या प्रक्रियेत रोज एक हजार युवक-युवतींची चाचणी घेतली
जाणार आहे. यंदाच्या भरतीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख
ठेवली जाणार आहे. प्रत्येक टप्प्यावर बायोमेट्रिक हजेरीची नोंद ठेवण्यात येणार असून
अर्ज भरलेल्या उमेदवाराची अंतिम टप्प्यापर्यंत खात्रीशीर पडताळणी केली जाणार आहे. गैरप्रकार
आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
****
चौथ्या जनहित राज्यस्तरीय
ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. लीला शिंदे यांची निवड करण्यात आली
आहे. नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील जवळा इथल्या ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने
हे आधिवेशन घेतलं जातं.
****
'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर
शाळा' या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील रिडज
इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. तीन टप्प्यात राबवण्यात
आलेल्या या उपक्रमात तिसऱ्या टप्प्यात तालुक्यातून
उत्कृष्ट नियोजन, शैक्षणिक गुणवत्ता, शाळेची स्वच्छता आणि सुशोभीकरण, या विविध निकषांवर
आधारित मूल्यमापन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या
माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात उद्या १४ आणि परवा १५ फेब्रुवारी रोजी अभिरूप न्यायालय
स्पर्धा होणार आहे. यंदा या स्पर्धेत विविध राज्यांतील २१ विधी महाविद्यालयांचे संघ
सहभागी होत असल्याची माहिती प्राचार्या डॉ. अपर्णा कोत्तापल्ले आणि समन्वयक डॉ. अंजू
सिंह यांनी दिली.
****
महाशिवरात्रीचा उत्सव येत्या
रविवारी साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथं घृष्णेश्वर मंदिरात
महाशिवरात्री निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येतात, या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड यांनी मंदिराची
पाहणी करून सुरक्षा तसंच प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला.
वेरुळ परिसरात आज स्वच्छता
मोहीम राबवण्यात आली. सुमारे दोन हजार नागरिकांनी श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर तसंच
गावातील महत्त्वाच्या परिसरात स्वच्छता केली.
****
No comments:
Post a Comment