Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातल्या येनविहिरा इथं स्फोटकं
बनवणाऱ्या एका कंपनीत आज पहाटे झालेल्या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असून १८
जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक संपर्क माध्यमातल्या
एका संदेशाद्वारे या संदर्भातली माहिती दिली आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना
त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी या स्फोटाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना
व्यक्त करतानाच, मोदींनी जखमींच्या प्रकृतीत लवकरात
लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत
करत असल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मधून प्रत्येक मृताच्या वारसाला दोन लाख रुपयांची मदत जाहीर
केली आहे. तसंच जखमींना ५० हजार रुपयांची सवलत
देण्यात येणार आहे. एस बी एल एनर्जी लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून स्फोटातल्या जखमींना
उपचारासाठी नागपूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नागपूरपासून सुमारे ४०
किलोमीटर अंतरावर असलेल्या येनविहिरा येथे स्थित या कंपनीमध्ये सकाळी सात वाजून पाच
मिनिटांनी हा स्फोट झाला. याची तीव्रता येवढी अधिक होती की आवाज दूरवर ऐकू आल्याचं
स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं. संबंधित कंपनी खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी
लागणारी स्फोटकं, डिटोनेटर्स आणि संबंधित
उत्पादनं तयार करते. मुख्यमंत्र्यांनी या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचं
सांगून, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख
रुपयांची मदत जाहीर केली आहे. आपण याबाबत स्थानिक प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात असल्याचंही
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या
मार्गदर्शनाखाली स्फोट झालेल्या ठिकाणी मदत कार्य सुरू असल्याची माहिती जिल्हा माहिती
कार्यालयानं दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या
दौऱ्यावर आहेत.पुदुचेरी इथं थोड्या वेळापूर्वीच दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन हजार सातशे कोटी
रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमात सहभागी झाले. या प्रसंगी
आयोजित जाहीर सभेला पंतप्रधानांनी संबोधीत केलं.
आपण यापूर्वी दिलेल्या “बेस्ट पुदुच्चेरी” या मंत्रानुसार अर्थातच बिजनेस: उद्योग, एज्यूकेशन: शिक्षण, स्पीरीट्युॲलिटी: आध्यात्म आणि टुरीजम: पर्यटन याबाबतचा दृष्टिकोन या साडेचार
वर्षात फलद्रुप होत असल्याचं प्तप्रधान म्हणाले. जेव्हा केंद्रासह हा केंद्रशासित प्रदेश
एकाच दृष्टिकोन आणि समर्पणाने काम करतात, तेव्हा निकाल जलद आणि उत्कृष्ट मिळतात असही ते म्हणाले. नुकत्याच
जाहीर केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुधारणांना प्राधान्य देण्यात आलं असून यात ग्रामीण-शहरी
अशा दोन्ही भगांवर लक्ष केंद्रीत असून नागरिकांच्या जीवनाला यातील योजना अधिक सुकर
करतील असं मोदी म्हणाले.
****
पश्चिम आशियातील भारतीय दूतावासांनी भारतीय नागरिकांना
तणावाची प्रादेशिक परिस्थिती लक्षात घेता जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं
आवाहन केलं आहे. इस्रायलमधल्या भारतीय दूतावासानं देशात तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या
भारतीय नागरिकांना त्यांच्या आधीच्या सूचनांचं पालन करण्याची आणि वेळेवर मदत आणि संवाद
सुलभ करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याची विनंती केली आहे. सामाजिक संपर्क
माध्यमांवरच्या एका संदेशामध्ये दूतावासानं म्हटलं आहे की, ते परिस्थितीमुळं बाधित झालेल्या भारतीय समुदायाच्या सतत संपर्कात
आहेत, ज्यामध्ये पर्यटक, अल्पकालीन व्यावसायिक अभ्यागत आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा
समावेश आहे. दरम्यान, या एकंदर परिस्थितीमुळे या भागातील विमानसेवा विस्कळीत झाल्याच्या परिणामस्वरुप
मुंबईच्या शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक प्रवाश्यांचा खोळंबा झाल्याचं
चित्र आहे.
****
राज्य सरकारनं नेहमीच कोकणातल्या पायाभूत सुविधांच्या
विकासाला प्राधान्य दिलं असल्याचं राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मुंबई
(भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग नौकासेवेचं लोकार्पण आज होत आहे, त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या
आपल्या एका संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर एट गटातून
उपांत्य फेरीसाठी भारत-वेस्ट इंडीज यांच्यातल्या निर्णायक सामन्यासह दक्षिण अफ्रिका-झिम्बाब्वे
औपचारीक सामना, अशा दोन लढती आज खेळल्या जात आहेत.
थोड्याच वेळेनंतर दुपारी तीन वाजता दिल्ली इथं दक्षिण अफ्रिका-झिम्बाब्वे सामना होत
आहे. झिम्बाब्वे गुणतालिकेनुसार स्पर्धेबाहेर झालेला आहे. तर, दक्षिण अफ्रिका याआधीच उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात
न्युझीलंडशी येत्या चार मार्चला कोलकाता इथं खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. भारत-वेस्ट
इंडीज यांच्यातील सायंकाळी सात वाजता कोलकाता होणाऱ्या लढतीतील विजेता संघच, येत्या पाच मार्च रोजी मुंबईत इग्लंड विरुद्ध स्पर्धेच्या उपांत्य
फेरीसाठी पात्र ठरेल. येत्या आठ मार्चला अहमदाबाद इथं टी-ट्वेंटी विश्वविजेतेपदासाठीची लढत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment