Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 March 2026
Time 17.00 to 17.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मार्च २०२६ सायंकाळी
५.००
****
· नागपूरनजिक स्फोटकांच्या कारखान्यातल्या भीषण स्फोटात १७ कामगारांचा मृत्यू, १८ जखमी
· कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख
करण्यासाठी शासन वचनबद्ध – महसूलमंत्री बावनकुळे यांची ग्वाही
आणि
· टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत – वेस्ट इंडिज लढतीचा रोमांच थोड्याच
वेळात
****
नागपूर जिल्ह्यात काटोलजवळ राऊळगाव इथं आज सकाळी एका कारखान्यात
झालेल्या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला, तर
१८ जण जखमी झाले. खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या एस बी एल एनर्जी
लिमिटेडच्या कारखान्यात हा स्फोट झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दुःख व्यक्त केलं असून, मृतांच्या वारसाला राज्यशासनातर्फे
पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची
डीएनए टेस्ट केली जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक
व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं
आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख
रुपयांची,
तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल असं त्यांनी
सामाजिक संपर्क माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात
उपचार सुरु असून, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचं पथक मदतकार्य करत
असल्याचं जिल्हाधिकारी बिपिन इटनकर यांनी सांगितलं.
****
कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी असून कॅनडातल्या
शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी राज्यात गुंतवणूक करण्याचं
आवाहन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत कॅनडाचे राष्ट्रीय महसूल
मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, कॅनडातील न्यू ब्रन्सविक राज्याच्या
प्रीमियर सुसान होल्ट आणि शिष्टमंडळासाठी आयोजित स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत
होते. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू असून मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय
विमानतळ मिळालं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे
या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. तसंच नवी मुंबई इथं आंतरराष्ट्रीय
‘एज्युसिटी’ निर्माण
करण्यात येत आहे. या ठिकाणी विदेशातील नामांकित विद्यापीठे आपले शैक्षणिक दालने उघडणार
आहेत. कॅनडा इथं राज्यातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात.
त्यामुळे कॅनडातल्या विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय ‘एज्युसिटी’ मध्ये आपली शैक्षणिक दालनं उघडावी
असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. कॅनडा शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि मुंबईतील
हा कार्यक्रम आपल्या द्विपक्षीय संबंधांची खरी सुरुवात असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
भविष्यातही कॅनडानं अशाच प्रकारे भारत आणि महाराष्ट्राला भेट देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री
फडणवीस यांनी यावेळी केलं.
****
राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात शीख गुरु तेग बहादुर यांच्या
बलिदानावर आधारित धडा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. नवी मुंबईत खारघर इथं शीख गुरू गुरू तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद दिनानिमित्त आयोजित हिंद
दि चादर कार्यक्रमात ते बोलत होते. नवी मुंबईत गुरू तेग बहादुर यांच्या नावानं नवीन
रुग्णालय सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमात शीख यांच्यासह बंजारा, शिकलगार,
उदासीन, वाल्मिकी यासारखे आठ मोठे समाज एकत्र आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पंजाब मधील
घुमानला देशाच्या पर्यटन नकाशावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न राज्य सरकार करेल असं आश्वासन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. कोणत्याही धर्मावर, पंथावर
अतिक्रमण सहन करणार नाही असं वचन देण्याचं आवाहन शिंदे यांनी उपस्थितांना केलं. उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांनी गुरू तेग बहादुर यांच्या बलिदानाची आठवण काढली. हे बलिदान धर्मासाठी
नव्हे तर मानवी संस्कृतीच्या मूल्य रक्षणासाठी होतं, असं
त्या म्हणाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील मदुराई इथं विविध
विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मदुराईमध्ये
चार हजार चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन
केलं. पुदुचेरी इथं आज दोन हजार सातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांच्या
उद्घाटन,
लोकार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी सहभागी
झाले.
****
राज्यातल्या भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन वचनबद्ध असून देशातली सर्वोत्तम भूमी अभिलेख
प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
म्हटलं आहे. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित
आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे
निर्देश त्यांनी दिले आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी
काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी
ते बोलत होते. राज्यातल्या सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला,
विद्यार्थी यांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचं जलद आणि
प्रभावी निराकरण व्हावं, यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर
अधिक परिणामकारकपणे शिबिरांचं आयोजन करावं, असे
निर्देशही बावनकुळे यांनी यावेळी दिले.
****
पश्चिम आशियात संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार
मंत्रालयानं तिथल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय दूतावास
रात्रंदिवस मदतीसाठी उपलब्ध असतील असं त्यात म्हटलं आहे. तसंच भारतात तात्पुरत्या वास्तव्यासाठी
आलेल्या परदेशी नागरिकांसाठीही परराष्ट्र मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या
आहेत. ज्या नागरिकांना व्हिसाची मुदत वाढवून हवी आहे, अथवा
आपलं वास्तव्य नियमित करून हवं आहे, त्यांनी आपल्या जवळच्या परदेशी
नागरिक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं
यात म्हटलं आहे. आखाती देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तिथं अडकलेल्या नागरिकांची
माहिती कळवण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कामाच्या ठिकाणी
लैंगिक छळ प्रतिबंध कायदा म्हणजेच पॉश ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यात
सर्व शासकीय,
खाजगी कार्यालयातील अंतर्गत तक्रार समितीचं परीक्षण एका महिन्यात
करण्यात यावं,
असे निर्देश जिल्हाधिकारी तसंच विभागीय आयुक्तांना राज्य महिला
आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत. अनेक कार्यालयांमध्ये अंतर्गत समितीची
स्थापना नाही,
जाणीव जागृती नसणं, समितीला
कामकाजाचं प्रशिक्षण नसणं, वार्षिक अहवाल सादर न होणं, दर्शनी भागात फलक नाही असं निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात
आले आहेत.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर एट गटातून उपांत्य
फेरीसाठी भारत-वेस्ट इंडीज यांच्यातला निर्णायक सामना आज संध्याकाळी सात वाजता कोलकाता
इथं होत आहे. नवी दिल्लीत सुरू सामन्यात झिम्बाब्वेनं ठेवलेल्या १५४ धावांच्या लक्ष्याचा
पाठलाग करताना दक्षिण अफ्रिका संघानं १३ षटकांत पाच
बाद १२० धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रजानं ७३ धावा केल्यामुळे संघाला २० षटकांत सात बाद १५३ धावा करता आल्या.
****
तारुण्यात असलेल्यांची भाषा आणि जेन झीची भाषा यात कमालीचं अंतर
पडलं आहे. जेन झी वापरत असलेली भाषा आता स्वीकारावी लागेल. त्यात संस्कृतीचा अंतर्भाव
असावा;
मात्र शुद्धतेचा आग्रह धरू नये, त्याचे
अवडंबर करू नये,
असा सूर नाशिकमधील विश्व मराठी संमेलनानिमित्त भाषेतील युवावर्गाचा
सहभाग या विषयावरच्या आजच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. विधान परिषद उपसभापती
नीलम गोऱ्हे,
अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील हे चर्चासत्रात
प्रमुख मार्गदर्शक होते.
****
राज्यात लागू झालेले नवीन शैक्षणिक धोरण मराठी मातृभाषेवर आधारित
असून शासन मराठीच्या समृद्धीसाठी पावले उचलत आहे. उच्च शिक्षणावरील आधारित असलेले काही
अभ्यासक्रम मराठीत सुरू केले असून बीएससी आणि बी.कॉमचे सर्व अभ्यासक्रमही लवकरच मराठी
भाषेत लागू केले जातील, अशी माहिती उच्च शिक्षण विभागाचे
संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली. नाशिक इथं आज झालेल्या विश्व मराठी संमेलनातील
परिसंवादात ‘अभ्यासक्रमातील मराठी भाषा’ या विषयावर ते बोलत होते.
****
मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून मराठवाडा साहित्य परिषद
उदगीरतर्फे भाषायण ही भाषिक उपक्रमासाठीची कार्यशाळा लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये महाराष्ट्र
उदयगिरी महाविद्यालयात झाली. बोली भाषेचे अभ्यासक डॉ. बालाजी मदन इंगळे यांनी या कार्यशाळेत
मार्गदर्शन केलं. मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र
तिरुके यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
****
छत्रपती संभाजीनगर परिमंडळातल्या चार लाखांहून अधिक ग्राहकांकडं
असलेल्या थकीत अडीचशे कोटी रुपयांच्या वीज बिल वसुलीसाठी महावितरणनं धडक मोहीम हाती
घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत केवळ फेब्रुवारी महिन्यातच २२ हजार थकबाकीदारांचा वीज
पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं हातगाड्यावर व्यवसाय करताना शिस्तीचं
पालन करा,
अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनानं हातगाडीचालकांना दिला आहे.
****
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंदाच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे
आरोग्य रत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान अंतर्गत, राष्ट्रीय
क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय मानांकनात नांदेड जिल्ह्यानं राज्यात पाचवा
क्रमांक,
तर लातूर विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. संबंधित यंत्रणांच्या
समन्वयातून हे यश प्राप्त झालं असल्याची माहिती नांदेड जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.
सतीश कोपुरवाड यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment