Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 02 March 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीबाबत भारताची चिंता, पंतप्रधानांच्या
अध्यक्षतेखाली सुरक्षेसंबंधी मंत्रिमंडळ समितीची बैठक
·
देशाला सामाजिक एकतेची गरज, पंतप्रधानांचं
हिंद दि चादर कार्यक्रमात प्रतिपादन; तर गुरु तेग बहादूर यांच्या
हौतात्म्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
·
चालू हंगामात साखर उत्पादनात महाराष्ट्र उत्तरप्रदेशला
मागे टाकेल, भारतीय साखर उत्पादक संघटनेचा अंदाज
·
नागपूर जिल्ह्यात कारखान्यात स्फोट होऊन १७ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून
चौकशीचे आदेश, मृतांच्या कुटुंबाना पाच लाख रुपयांची मदत
आणि
·
टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपान्त्य
फेरीत प्रवेश, चार तारखेला दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड आणि पाच तारखेला भारत-इंग्लंड
सामना
****
पश्चिम
आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अधिकृत निवेदन जारी करत तीव्र चिंता
व्यक्त केली आहे. सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगावा, तणाव कमी
करण्यासाठी संवाद आणि राजकीय कूटनीतीचा मार्ग अवलंबावा, तसंच
सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखावा, असं भारताने
स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल नवी
दिल्लीत सुरक्षेसंबंधी मंत्रिमंडळ समितीची बैठक घेतली.
अमेरिका
आणि इस्राईलने केलेल्या हल्ल्यात इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं संपूर्ण मध्यपूर्वेत हल्ले सुरु केले
आहेत. दुबई, दोहा, बहरीन आणि कुवेतमध्ये अमेरिकेचे लष्करी
तळ असलेल्या किंवा अमेरिकेशी संबंधित ठिकाणी इराणने हल्ले केल्याचं वृत्त आहे.
या युद्धाच्या
तणावामुळे दुबई विमानतळावरची उड्डाणं अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत. दुबई विमानतळावर
अडकलेली भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला सुरक्षित स्थानी हलवलं आहे. लातूरची
विद्यार्थिनी नेहा मिसर ही देखील दुबईत शिक्षण घेत असून, तिच्यासह
इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, या संघर्षाच्या
पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तिथल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना
जारी केल्या आहेत. भारतीय दूतावास रात्रंदिवस मदतीसाठी उपलब्ध असतील असं त्यात म्हटलं
आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तिथं अडकलेल्या नागरिकांची
माहिती कळवण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
देशाला
सामाजिक एकतेची सर्वाधिक गरज असताना, हिंद दि चादर या सारख्या कार्यक्रमातून
गुरू आणि संताचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचा विश्वास मिळतो असं प्रतिपादन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी मुंबईत खारघर इथं गुरू तेग बहादुर
यांच्या साडे तिनशेव्या हौतात्म्य दिनानिमित्त आयोजित हिंद दि चादर कार्यक्रमात काल
पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केलं. देशातल्या सर्व समाजातल्या नागरिकांनी
शीख समाजातल्या गुरूंपासून प्रेरणा घेतली असं ते म्हणाले.
केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, राज्यमंत्री
माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होत्या.
शीख धर्मातल्या
सर्व १० गुरूंनी धर्म रक्षणाचंच काम केलं, जागतिक पातळीवर या गोष्टी अनुकरणीय असल्याचं
अमित शाह यावेळी म्हणाले.
गुरु तेग
बहादूर यांच्या हौतात्म्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केला जाईल, अशी घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. तसंच नवी मुंबईत गुरू तेग बहादुर यांच्या नावानं
नवीन रुग्णालय सुरू करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
गुरु तेग
बहादूर यांनी संपूर्ण देशाचं रक्षण केलं, तसंच आपणही एकतेनं देश आणि समाजाचं रक्षण
करुया, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. तर श्री गुरु तेग बहादुरजी
साहिब यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात शीख धर्माचा त्याग आणि शौर्याची परंपरा अधोरेखित
झाली, असं सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.
दोन दिवस
चालणाऱ्या या कार्यक्रमाला १५ लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे.
****
मुंबईत
कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, कॅनडातील
न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या स्वागत
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कॅनडातील शैक्षणिक संस्था
आणि उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यात
मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून, नवी मुंबई
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं.
****
नाशिक इथं
विश्व मराठी संमेलनाचा काल समारोप झाला. माजी सरन्यायाधीश भूषण गवई, विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यावेळी
उपस्थित होते. मराठी भाषा, संस्कृती, कला
पुढे न्यायाची असेल तर राजाश्रय हवा; तरच मराठीची कीर्ती जगभरात
पोहोचेल, असं गवई यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात संगीतकार अजय
अतुल यांना कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पद्मश्री पुरस्कार जाहिर
झालेले तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंड्या यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुढचं
विश्व मराठी संमेलन नागपूर इथं होणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी
दूरदृश्य प्रणालीद्वारे दिलेल्या संदेशातून केली.
****
चालू हंगामात
विक्रमी साखर उत्पादन करून महाराष्ट्र उत्तरप्रदेशाला मागे टाकेल असा अंदाज भारतीय
साखर आणि जैव ऊर्जा उत्पादक संघटनेनं वर्तवला आहे. देशातलं एकूण साखर उत्पादन तीन कोटी
२० लाख टनापेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे, यात महाराष्ट्राचा वाटा एक कोटी दहा लाख
टनापेक्षा जास्त तर उत्तरप्रदेशाचा वाटा जवळपास एक कोटी टन इतका राहील. गेल्या हंगामात
महाराष्ट्राने ९० लाख टन साखर उत्पादन केलं होतं तर उत्तरप्रदेशाचं साखर उत्पादन एक
कोटी टन इतकं होतं.
****
नागपूर
जिल्ह्यात काटोलजवळ राऊळगाव इथं एका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू
झाला, तर १८ जण जखमी झाले. खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार
करणाऱ्या एस बी एल एनर्जी लिमिटेडच्या कारखान्यात काल सकाळी हा स्फोट झाला. या दुर्घटनेबद्दल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं असून, मृतांच्या
वारसाला राज्य शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून, मृतांच्या
वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहिर केली आहे.
****
फाल्गुन
पौर्णिमा म्हणजेच होळीचा सण आज साजरा होत आहे. मनातल्या वाईट विचारांचा जाळून नाश करण्यासाठीचा
प्रतिकात्मक सण म्हणून होळी साजरी केली जाते. तर उद्या धुळवड साजरी होणार आहे. होळीचा
सण साजरा करताना झाडं न तोडण्याचं तसंच, वायू प्रदूषण टाळण्याचं आणि पाण्याचा
वापर कमी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
टी–ट्वेंटी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत उपान्त्य फेरीत दाखल झाला आहे. काल कोलकाता इथं झालेल्या
सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव केला. वेस्ट इंडिजच्या संघाने
प्रथम फलंदाजीकरत चार बाद १९६ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या भारतीय संघाने
चार चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य साध्य केलं. नाबाद ९७ धावा करणारा संजू सॅमसन सामनावीर
पुरस्काराचा मानकरी ठरला.
या स्पर्धेत
उपान्त्य फेरीचा पहिला सामना चार मार्चला दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दरम्यान, तर दुसरा
सामना पाच मार्चला भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.
****
राष्ट्रीय
क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय मानांकनात नांदेड जिल्ह्यानं राज्यात पाचवा, तर लातूर
विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून हे यश प्राप्त
झालं असल्याची माहिती नांदेड जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी दिली.
****
धाराशिव
इथं विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या हस्ते
झालं. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाही, तर त्या कागदावरच
राहतात. या महाशिबिराच्या माध्यमातून या योजना प्रत्येक नागरीकापर्यंत पोहोचाव्यात,
असं ते म्हणाले.
****
उदगीर इथं
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून ‘भाषायण’ ही भाषिक
उपक्रमासाठीची कार्यशाळा काल पार पडली. बोली भाषेचे अभ्यासक डॉ. बालाजी इंगळे यांनी
यावेळी मार्गदर्शन केलं.
****
कामाच्या
ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यात सर्व
शासकीय, खाजगी कार्यालयातल्या अंतर्गत तक्रार समितीचं परीक्षण एका महिन्यात
करण्यात यावं, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली
चाकणकर यांनी, जिल्हाधिकारी तसंच विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
अनेक कार्यालयांमध्ये अंतर्गत समितीची स्थापना नाही, जाणीव जागृती
नसणं, समितीला कामकाजाचं प्रशिक्षण नसणं, वार्षिक अहवाल सादर न होणं, दर्शनी भागात फलक नाही असं
निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.
****
No comments:
Post a Comment