Monday, 2 March 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 02 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतात संभाव्य हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून इराण समर्थक आणि भडकाऊ भाषणे देणाऱ्यांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले आहेत. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण अधिक प्रभावीपणे करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

****

दरम्यान, या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने नागरी विमान वाहतुकीत सर्वोच्च सुरक्षितता राखत त्वरित आणि सक्रिय पावलं उचलली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं भारतीय विमान कंपन्यांना इराण, इराक, इस्रायल आणि आखाती प्रदेशातल्या काही उच्च-जोखीम हवाई क्षेत्रांचा वापर टाळण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत सुमारे ३५० उड्डाणं रद्द करण्यात आली असून, प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. सुरक्षा आणि सतर्कता यांना प्राधान्य देत केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

****

दरम्यान, पश्चिम आशियात राहणाऱ्या भारतीयांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आणि तिथल्या दूतावासांनी आपत्कालिन मदत क्रमांक जाहीर केले आहेत.

राज्य सरकारनंही या देशांमधे राहणाऱ्या तसंच प्रवासाला गेलेल्या राज्यातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं असा सल्ला देण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र २४ तास सुरु राहणार आहे. परदेशात अडकलेल्या नागरिकांबाबतच्या माहितीसाठी अथवा आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांनी १०७७ हा विनाशुल्क मदत क्रमांक, किंवा controlroom@gov.in या इमेलवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर संयुक्त अरब अमिराती – यूएईने अबू धाबी आणि दुबई शेअर बाजार आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक अस्थिरतेमुळे हा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजारावरही परिणाम झाला असून, आज सेन्सेक्सने २७०० पेक्षा जास्त अंकांची घसरण नोंदवली, तर निफ्टी सुमारे ३०० अंकांनी घसरला. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सेन्सेक्स १००० पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता.

****

दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट झाली. हा दौरा भारत-कॅनडा संबंध अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. बैठकीत व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, महत्त्वाची खनिजं, शेती, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि एआय क्षेत्रातील नवीन भागीदारीवर चर्चा झाली.

****

राज्यात सर्वत्र आज होळी अर्थात शिमग्याचा सण साजरा केला जात आहे. आज संध्याकाळी ठिकठिकाणी होलिकादहन करण्यात येईल, हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असून, हा पवित्र उत्सव सत्य, श्रद्धा आणि सकारात्मकतेची शक्ती अधोरेखित करतो.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगोत्सव आनंदाने साजरा करावा, तसंच पर्यावरण रक्षणाबद्दलही जागरुक राहण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होळीच्या शुभेच्छा देताना, अधर्म, अन्याय आणि नकारात्मकतेचा नाश करून प्रगती आणि एकतेचा संकल्प करण्याचा संदेश दिला आहे.

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनातील निराशा, दारिद्र्य, आळस आणि दुष्ट प्रवृत्तींचं दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, सुदृढ आरोग्य आणि शांती नांदो, अशी अपेक्षा व्यक्त केली.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं आज लातूर इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. साहित्यिक तथा प्रख्यात विचारवंत अशी ओळख असलेले वाघमारे यांनी, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलं. २००८ ते २०१४ या काळात ते राज्यसभेत खासदार होते. डॉ.वाघमारे यांच्या पार्थिवावर औसा तालुक्यातल्या कौठा या त्यांच्या मूळ गावी उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

नागपूरनजिक एका कंपनीत काल स्फोट होऊन १७ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आपण करणार असल्याचं काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काटोल तालुक्यात राऊळगाव इथं एसबीएल एक्सप्लोजीव मॅन्युफॅक्चर कंपनीत काल हा स्फोट झाला होता. मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना ७५ लाख तर गंभीर जखमीना २५ लाख रुपये अर्थसहाय्य या कंपनीतर्फे मिळावं, अशी मागणी देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...