Monday, 2 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      राजनय आणि संवादाच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भारताची भूमिका-पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      अबुधाबी इथं अडकलेले खासदार कल्याण काळे यांच्यासह इतर भारतीय सुरक्षित

·      स्वारातीचे पहिले कुलगुरू माजी खासदार डॉ.जनार्दन वाघमारे कालवश-उद्या अंत्यसंस्कार

आणि

·      शिमग्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा-उद्याच्या धुळवडीचा सर्वत्र उत्साह

****

संवाद आणि राजनयाच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भारताची भूमिका असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पश्चिम आशियात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व देशांशी समन्वयातून काम करत असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

दरम्यान, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. इराणच्या बाजूने बोलणाऱ्या कट्टरपंथी लोकांची ओळख पटवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाईची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे.

इस्राईलच्या हल्ल्यात इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल जम्मू काश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला. त्यानंतर त्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वाहतुकी आणि नागरिकांसाठी श्रीनगरमधला लाल चौक बंद करण्यात आला आहे. काश्मिर खोऱ्यात सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे.

संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारसाठीची विमान वाहतुक सेवा सध्या रद्द केली आहे. याशिवाय युरोपला जाणारी काही निवडक उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत.

दरम्यान, पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे दुबईमधे अडकून पडलेली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू उद्यापासून सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशीपला मुकणार आहे. सिंधुला सुरक्षित जागी हलवण्यात आलं आहे.

****

जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह त्यांचे काही मित्र अबुधाबी इथं अडले आहेत. दुबई आणि अबूधाबी इथं पर्यटनासाठी गेलेले खासदार काळे, परत येण्याच्या तयारीत असतानाच विमानसेवा बंद झाल्याने ते अबुधाबी इथं अडले. हे सर्व जण सुरक्षित असल्याचं, काळे यांच्या स्वीय सहायकांकडून सांगण्यात आलं आहे, जालना जिल्ह्यातले अन्य सात जणही दुबईत आहेत. सर्वजण सुरक्षित असून या सर्वांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवले आहे.

****

रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त मक्का आणि मदिना इथं गेलेले नाशिक शहर आणि मालेगावमधील १३२ नागरिक सध्या तिथे अडकले आहेत. मात्र, सर्व जण सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, माजी खासदार डॉ.जनार्दन वाघमारे यांचं आज लातूर इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. साहित्यिक तथा प्रख्यात विचारवंत अशी ओळख असलेले वाघमारे यांनी, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलं. २००८ ते २०१४ या काळात ते राज्यसभेत खासदार होते. डॉ.वाघमारे यांच्या पार्थिव देहावर औसा तालुक्यातल्या कौठा या त्यांच्या मूळ गावी उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. वाघमारे यांचं निधन ही, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

 

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी, वाघमारे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि कला क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना, व्यक्त केली.

****

राज्यात सर्वत्र आज होळी अर्थात शिमग्याचा सण साजरा केला जात आहे. आज संध्याकाळी ठिकठिकाणी होलिकादहन करण्यात येईल, वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला हा सण, श्रद्धा आणि सकारात्मकतेची शक्ती अधोरेखित करतो. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगोत्सव आनंदाने साजरा करावा, तसंच पर्यावरण रक्षणाबद्दलही जागरुक राहण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होळीच्या शुभेच्छा देताना, अधर्म, अन्याय आणि नकारात्मकतेचा नाश करून प्रगती आणि एकतेचा संकल्प करण्याचा संदेश दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनातील निराशा, दारिद्र्य, आळस आणि दुष्ट प्रवृत्तींचं दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, सुदृढ आरोग्य आणि शांती नांदो, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा तेराशे सार्वजनिक आणि अडीच हजार खासगी होळ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. होलिकादहनानंतर ग्रामदैवतांचा शिमगोत्सव सुरू होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकराशेपेक्षा जास्त ठिकाणी होळीचं पूजन होणार आहे. जिल्ह्यात रोंबाट तसंच विविध खेळ खेळले जातील. काही गावात पाच तर काही गावात सात दिवस होळीचा उत्सव चालेल. गोंदिया जिल्ह्यात सुमारे तीन हजार ठिकाणी होळी साजरी केली जाणार आहे.

राज्यात नंदूरबार जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या होलिकोत्सवासह मराठवाड्यातल्या होलिकोत्सवाचा आढावा घेणारा हा वृत्तांत…

बाईट – निलेश पवार, नंदुरबार

 

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्ववस्त व्यवस्थेच्या वतीने होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री गुरुस्थान मंदिरासमोर संस्थाभनचे मुख्या कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्यार हस्तेग होळीची विधीवत पूजा करून होळी प्रज्वलित करण्यात आली.

 

नांदेड इथं गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब इथं होला महल्ला सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. धुलिवंदनानिमित्त मुंबईचे भाई जैमल सिंघ सहगल आणि परिवाराचा रैन सबाई कीर्तन दरबार होणार असून, ४ मार्चला होणाऱ्या होला महल्ला सणासाठी देश विदेशातून हजारोच्या संख्येत भाविक नांदेड इथं दाखल होत आहेत.

 

जालना शहरातील मामा चौक इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची होळी उत्साहात साजरी झाली. या पारंपरिक सोहळ्याला सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळवडीला होणाऱ्या हत्तीरिसाला मिरवणुकीचा उत्साह शहरात पहायला मिळत आहे.

 

बीड जिल्ह्यातही विडा इथं धुळवडीला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याचा प्रघात आहे, विडा ग्रामस्थांनी या मिरवणुकीची सज्जता केली असून जावईशोध सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

छत्रपती संभाजीनगर इथंही पारंपरिक पद्धतीने होळी तसंच धुळवडीचा सण साजरा होत आहे.

****

नाशिकच्या काळराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च १९३२ रोजी आंदोलन करण्यात आलं होतं, या ऐतिहासिक सत्याग्रहाला ९६ वर्षे पूर्ण होत आहेत. आज त्या निमित्ताने नाशिकमध्ये विविध संस्था संघटनांच्या वतीने अभिवादनाचे कार्यक्रम होत आहेत. काळाराम मंदिराच्या बाहेर सत्याग्रह स्तंभ असून त्याठिकाणी विविध संस्थांच्या वतीने बौध्द वंदना, भीम गीतांचे गायन असे विविध कार्यक्रम सकाळपासूनच सुरू आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सभापती शिवाजी भालेराव यांच्या विरोधातला हा ठराव १३ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर करण्यात आला.

****

नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली आज पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातलं कृत्रीम रेतन, दुग्ध उत्पादन वाढ तसंच विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत आढावा घेण्यात आला. गाय आणि म्हैस वर्गीय जनावरांसाठी वंध्यत्व निवारण शिबिरे आयोजित करून कृत्रिम रेतनाचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

****

जालना शहर महानगरपालिकेतल्या सहा स्वीकृत सदस्यांच्या जागांसाठी एकूण सहा नामनिर्देशनपत्रे आज प्राप्त झाली. यामध्ये भाजपकडून चार, शिवसेना एक तर काँग्रेसकडून एका नामनिर्देशन पत्राचा समावेश आहे. येत्या सहा मार्च रोजी महानरपालिकेच्या सभागृहात सीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा होणार आहे.

****

औषधनिर्माण क्षेत्रातली वाढती मागणी आणि उद्योगक्षेत्राशी सुसंगत शिक्षण यांची प्रभावी सांगड घालत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं रोजगारनिर्मितीच्या दिशेने आणखी एक उल्लेखनीय पाऊल टाकलं आहे. विद्यापीठाच्या प्रशिक्षण आणि रोजगार विभाग आणि औषधनिर्माणशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या विशेष कॅम्पस रोजगार मेळाव्यात औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅक्लेओड्स फार्मास्युटिकल्सने २० विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली.

****

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत असलेल्या विविध ८८ शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक सत्र जानेवारी २०२६ करीता ऑनलाईन प्रवेश घेण्यास १६ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...