Tuesday, 3 March 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राजनय आणि संवादाच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भारताची भूमिका-पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      मराठवाड्यातील पर्यटक अबुधाबी आणि दुबईत सुरक्षित, जिल्हा प्रशासनाची माहिती

·      ज्येष्ठ विचारवंत, माजी कुलगुरु डॉ जनार्दन वाघमारे यांचं निधन, आज अंत्यसंस्कार

आणि

·      धुळवडीचा सर्वत्र उत्साह, शिमग्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा

****

राजनय आणि संवादाच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भारताची भूमिका असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पश्चिम आशियात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व देशांशी समन्वयातून काम करत असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

दरम्यान, या संघर्षादरम्यान सौदी अरब तसंच बहारीन या दोन देशांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. सौदीचे पंतप्रधान तसंच बहारीनच्या राजांशी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून भारतीय नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.

**

या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. इराणच्या बाजूने बोलणाऱ्या कट्टरपंथी लोकांची ओळख पटवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाईची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे.

**

इस्राईलच्या हल्ल्यात इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल जम्मू काश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला. त्यानंतर या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सर्व प्रकारची वाहतुक आणि नागरिकांसाठी श्रीनगरमधला लाल चौक बंद करण्यात आला आहे.

**

या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारसाठीची विमान वाहतुक सेवा रद्द केली आहे.

दरम्यान, पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे दुबईमधे अडकून पडलेली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशीपला मुकणार आहे. सिंधुला सुरक्षित जागी हलवण्यात आलं आहे.

**

जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह त्यांचे काही मित्र अबुधाबी इथं अडकले आहेत. दुबई आणि अबूधाबी इथं पर्यटनासाठी गेलेले खासदार काळे, परत येण्याच्या तयारीत असतानाच विमानसेवा बंद झाली. हे सर्व जण सुरक्षित असल्याचं, काळे यांच्या स्वीय सहायकांनी सांगितलं आहे. जालना जिल्ह्यातले अन्य सात जणही दुबईत आहेत. सर्वजण सुरक्षित असून, त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथलेही दहा पर्यटक आखाती देशात अडकले आहेत. यापैकी सहा जण दुबईत तर चौघे इजिप्तमध्ये कैरो इथं आहेत. हे सर्वजण प्रशासनाच्या संपर्कात असून सुरक्षित असल्याचं, कळवण्यात आलं आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त मक्का आणि मदिना इथं गेलेले नाशिक शहर आणि मालेगावमधले १३२ नागरिक सध्या तिथे अडकले आहेत. हे सर्व जणही सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली.

राज्य सरकारनं दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून 97 15   03 65 43 57 हा व्हॉटसॲप क्रमांक जारी केला आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं काल लातूर इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. साहित्यिक तथा प्रख्यात विचारवंत अशी ओळख असलेले वाघमारे यांनी, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलं. २००८ ते २०१४ या काळात ते राज्यसभेत खासदार होते. डॉ. वाघमारे यांच्या पार्थिव देहावर औसा तालुक्यातल्या कवठा या त्यांच्या मूळ गावी आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा दुवा निखळला, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी, वाघमारे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि कला क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना, व्यक्त केली आहे.

****

नाशिकच्या काळराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च १९३२ रोजी आंदोलन करण्यात आलं होतं, या ऐतिहासिक सत्याग्रहाला काल ९६ वर्षे झाली. त्या निमित्ताने नाशिकमध्ये विविध संस्था संघटनांच्या वतीने अनेक कार्यक्रम पार पडले. काळाराम मंदिर परिसरातल्या सत्याग्रह स्तंभानजिक विविध संस्थांच्या वतीने बौद्ध वंदना, भीम गीतांचे गायन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

****

होळी अर्थात शिमग्याचा सण काल राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. सायंकाळनंतर ठिकठिकाणी होलिकादहन करण्यात आलं, वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला हा सण, श्रद्धा आणि सकारात्मकतेची शक्ती अधोरेखित करतो. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचं प्रतीक असलेला रंगोत्सव आनंदाने साजरा करावा, तसंच पर्यावरण रक्षणाबद्दलही जागरुक राहण्याचं आवाहन त्यांनी केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातल्या जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा तेराशे सार्वजनिक आणि अडीच हजार खासगी होळ्यांचं, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकराशेपेक्षा जास्त ठिकाणी होलिकादहन झालं. जिल्ह्यात काही गावात पाच तर काही गावात सात दिवस होळीचा उत्सव चालेल.

राज्यात नंदुरबार जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या रजवाडी होलिकोत्सवासह मराठवाड्यातल्या होलिकोत्सवाचा आढावा घेणारा हा वृत्तांत…

बाईट- होळी

****

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि सूचनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लवकरच बैठक आयोजित करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं बोर्डीकर यांनी सांगितलं.

दरम्यान, परभणी शहरात कामगार भवन इमारतीच्या बांधकामाचं भुमिपूजन काल बोर्डीकर यांच्या हस्ते झालं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सभापती शिवाजी भालेराव यांच्या विरोधातला हा ठराव १३ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर करण्यात आला.

****

नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली काल पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढ तसंच विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत आढावा घेण्यात आला. गाय आणि म्हैस वर्गीय जनावरांसाठी वंध्यत्व निवारण शिबीरं आयोजित करून कृत्रिम रेतनाचं प्रमाण वाढवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवडणूक १० मार्चला होणार आहे. या दिवशी जिल्ह्यात सर्व ९ पंचायत समितींमध्ये विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

जालना शहर महानगरपालिकेतल्या सहा स्वीकृत सदस्यांच्या जागांसाठी एकूण सहा नामनिर्देशनपत्रे काल प्राप्त झाली. यामध्ये भाजपकडून चार, शिवसेना एक तर काँग्रेसकडून एका नामनिर्देशन पत्राचा समावेश आहे. येत्या सहा मार्च रोजी महानरपालिकेच्या सभागृहात सीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा होणार आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 03 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 03 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...