Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 March
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०२ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे
पहिले कुलगुरू,
माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं आज लातूर इथं निधन
झालं,
ते ९१ वर्षांचे होते. साहित्यिक तथा प्रख्यात विचारवंत अशी
ओळख असलेले वाघमारे यांनी, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलं. २००८ ते २०१४ या
काळात ते राज्यसभेत खासदार होते. डॉ. वाघमारे यांच्या पार्थिवावर औसा
तालुक्यातल्या कौठा या त्यांच्या मूळ गावी उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
पश्चिम आशियात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर
इंडियाने संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इज्राइल आणि कतारला जाणारी तसंच त्याठिकाणाहून येणारी उड्डाणं आज रद्द केली
आहेत. त्याचप्रमाणे आज युरोपला जाणारी काही विमानंही रद्द करण्यात आली आहेत.
जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केंद्रशासित
प्रदेशातल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेत सर्व समाजघटकांना शांतता आणि एकता
राखण्याचं आवाहन केलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी समन्वयाने काम
करणाऱ्या जम्मू-काश्मीर पोलिस, सुरक्षा दल आणि
प्रशासनाच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.
**
दरम्यान, पश्चिम आशियात राहणाऱ्या
भारतीयांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आणि तिथल्या दूतावासांनी आपत्कालिन
मदत क्रमांक जाहीर केले आहेत.
राज्य सरकारनंही या देशांमधे राहणाऱ्या तसंच प्रवासाला
गेलेल्या राज्यातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक सूचना जारी केल्या
आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या
सूचनांचं पालन करावं असा सल्ला देण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र २४
तास सुरु राहणार आहे. परदेशात अडकलेल्या नागरिकांबाबतच्या माहितीसाठी अथवा
आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांनी १०७७ हा विनाशुल्क मदत क्रमांक, किंवा controlroom@gov.in
या इमेलवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच दोन महत्त्वाचे
सुधारणा कायदे आणणार असल्याची माहिती, केंद्रीय कृषीमंत्री
शिवराज सिंह चौहान यांनी दिली. मसूरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, नवीन बी-बियाणे कायदा आणि सुधारित कीटकनाशक कायदा आणण्याचा सरकारचा मानस
स्पष्ट केला. याशिवाय सरकारकडून एक मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म अद्ययावत करण्यात येत
असून,
‘एक भारत’ उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित
प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व महत्त्वाची
माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाचा
प्रभावी वापर आणि मजबूत कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करणं, शेती उत्पादन तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हा सरकारचा मुख्य उद्देश
असल्याचं कृषीमंत्र्यांनी नमूद केलं.
****
राज्यात सर्वत्र आज होळी अर्थात शिमग्याचा सण साजरा केला
जात आहे. होलिकादहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा पवित्र उत्सव
सत्य,
श्रद्धा आणि सकारात्मकतेची शक्ती अधोरेखित करतो.
कोकणात शिमग्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
मुंबईकर चाकरमानी शिमग्याला मोठ्या ओढीने आपल्या गावी जातात. रत्नागिरी जिल्ह्यात
शिमगोत्सव फाक पंचमी अर्थात फाल्गुन शुद्ध पंचमीला सुरू होऊन गावोगावच्या
प्रथांनुसार गुढीपाडव्यापर्यंत साजरा केला जातो. जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये
काल तेरसे शिमगे अर्थात त्रयोदशीला होळीचा मुख्य सण साजरा झाला. आज रत्नागिरी
जिल्ह्यात सुमारे तेराशे सार्वजनिक आणि अडीच हजार खासगी होळ्या पेटवल्या जातील.
नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्यातील विविध भागात होळी उत्सव
मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जिल्ह्यातल्या प्रसिद्ध राजवाडी काठी होळीचा उत्सव
आज मध्यरात्री साजरा होईल.
****
मुंबई-विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा शुभारंभ काल मुंबईत
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाला. मुंबईहून निघालेली हि
रो-रोची पहिली फेरी सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी विजयदुर्ग बंदरात दाखल झाली.
सुमारे ३५ वर्षांनंतर एखादी प्रवासी बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाल्याने येणाऱ्या
प्रवाशांचं स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गवासियांनी विजयदुर्ग बंदरावर गर्दी केली
होती. आठवड्यातून दोन वेळा ही सेवा सुरु राहणार आहे. ही रो-पॅक्स बोट सुमारे ६२५
प्रवासी क्षमतेची असून त्यामध्ये एकाच वेळी ४० चारचाकी वाहने आणि २५ दुचाकी वाहने
वाहून नेण्याची क्षमता आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा
पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून देशी, विदेशी
दारुसह सुमारे १२ लाख ७४ हजार
रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चारचाकी वाहनातून किरकोळ विक्रेत्यांना दारु पुरवठा
करणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवरगाव इथं ही
कारवाई केली.
****
बंगळुरूमध्ये झालेल्या आयटीएफडब्ल्यू १०० खुल्या महिला टेनिस स्पर्धेत पुण्याच्या २१ वर्षीय वैष्णवी अडकर हिने
उपविजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. माजी दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा
नंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.
****
No comments:
Post a Comment