Tuesday, 3 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      दुबई आणि अबू धाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा अंशतः सुरू

·      बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      मुंबई, यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एटीएसचे छापे

·      जाहिरातींच्या माध्यमातून २५० कोटी रुपये महसूल देणारी निविदा एसटीने स्वीकारली

आणि

·      धुलिवंदनाचा सण सर्वत्र उत्साहात साजरा

****

पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबई आणि अबू धाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा अंशतः सुरू झाली आहे. दुबईत अडकलेल्या १४९ प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरलं, तर एमिरेट्स कंपनीचं विमान २१७ प्रवाशांना घेऊन चेन्नई विमानतळावर उतरलं.  राज्यातल्या १६४ जणांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन विमानांची व्यवस्था केली असून. ही दोन्ही विमानं थोड्या वेळातच मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सौदी अरेबियातील जेद्दाह इथून भारतातल्या विविध शहरांमध्ये इंडिगो एअरलाइन्सने १० विशेष उड्डाणं सुरू करण्याची घोषणा केली आहे.

****

बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण ठरला आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारमधे ‘शाश्वत आणि सशक्त आर्थिक प्रगती’ या विषयावर ते दूरस्थ पद्धतीने बोलत होते. आज जग परिवर्तनशील आणि विश्वासार्ह भागीदाराच्या शोधात आहे, त्यामुळे भारताला ही एक मोठी संधी आहे, असं मोदी म्हणाले. भारताने मुक्त व्यापार करार केल्यामुळे संधीची दारं उघडली गेल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याची जबाबदारी सर्वांची असून देशात तयार होणारी उत्पादनं जागतिक दर्जाची असायला हवीत असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी उद्योजकांना गुंतवणूक करण्याचं तसंच तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या यू ट्यूब वाहिनीच्या सबस्क्रायबर्सचा तीन कोटींचा टप्पा पार केला. या व्यासपीठावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले मोदी हे विश्वनेते ठरले आहेत. २००७ मध्ये मोदी यांनी यू ट्यूब वर आपलं चॅनल सुरु केलं होतं. या श्रेणीतल्या अन्य लोकांच्या तुलनेत ही संख़्या अनेक पटींनी जास्त आहे. 

****

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक-एटीएसने राज्यातल्या तीन जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित मुंबईत कुर्ला, शिवाजीनगर आणि गोवंडी भागात ही कारवाई करण्यात आली. यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही छापे टाकण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात १२ ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ७४ लाख रुपये रोख, तलवारी आणि चाकूंसह अन्य धारदार शस्त्रं जप्त करण्यात आली. ही शस्त्र बाळगल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अनेक कागदपत्रं, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि सीसीटीव्ही कॅमेरेही जप्त करण्यात आले असून त्यांची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद आणि उमरखेड भागातल्या १४ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून २५० कोटी रुपयांहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते बसस्थानकं, त्यांचा परिसर, बसेसच्या आतील आणि बाहेरील भाग तसंच उपलब्ध सर्व संसाधनांचा पुरेपुर वापर करून जाहिरात महसूल वाढवण्यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, सद्यस्थितीत कार्यरत असलेले जाहिरात परवानाधारकांचा परवाना कालावधी समाप्त झाल्यानंतर जाहिरातीचे अधिकार नवीन परवानाधारकांकडे जाणार आहेत. सध्या जाहिरातींद्वारे एस टी महामंडळाला दरवर्षी सुमारे २२ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. या नव्या आराखड्याच्या माध्यमाद्वारे “तिकीट विक्रीव्यतिरिक्त विविध पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न निर्माण झालं, तर एसटीवर भविष्यात तोट्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येणार नाही,” असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

****

धूलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्थेच्या वतीने धुलिवंदन, रंगपंचमी निमित्त समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी पाणी वाचवा,  कोरडा रंग लावा असा मजकूर असलेले फलक हातामध्ये घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकी फेरी काढली.

पैठण इथलं संत एकनाथ समाधी स्थळ तसंच संत एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील विजयी पांडुरंग मंदिरामध्ये फुलांची उधळण करुन कीर्तनासह विविध भक्ती गीतांच्या सादरीकरणासह धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर इथे खासदार संदिपान भुमरे यांनी आज होळी उत्सवानिमित्त लहान मुलं आणि युवकांसोबत रंग उधळून पर्यावरणपूरक होळी साजरी केली.

शिवसेना नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शहरातील गुलमंडी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते तसंच दुकानदार बांधवांसोबत धुलिवंदनचा आनंद लुटला.

****

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुलिवंदनानिमित्त जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून त्याला कपड्यांचा आहेर करण्याची प्रथा आहे. आजही हा मजेशीर सोहळा उत्साहात पार पडला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -

बाईट – रवी उबाळे, बीड

****

जालना शहरात धुलिवंदनाच्या पारंपरिक ‘हत्ती रिसाला’ मिरवणुकीने यंदा १३८ व्या वर्षात पदार्पण केलं. शहराच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरलेली ही मिरवणूक पिढ्यान्‌पिढ्या उत्साहात साजरी केली जाते. आजही साजऱ्या झालेल्या या सोहळ्याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -

बाईट – बाबासाहेब म्हस्के, जालना

****

वर्षातलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण आज होत आहे. संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी हे ग्रहण सुटेल. ईशान्य भारत आणि अंदमान-निकोबार बेटांतील काही भाग वगळता देशात अनेक ठिकाणी चंद्रोदयाच्या वेळी ग्रहण पाहता येणार आहे. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर देशातली अनेक मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. 

****

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक राजेश कोगदे यांनी आपल्या वर्गातील एकही विद्यार्थी गणित विषयात मागे राहू नये याकरिता केवळ प्लास्टिक पाईपपासून गणकयंत्र बनवलं आहे. या गणकयंत्रासाठी कोणतीही बॅटरी किंवा इलेक्ट्रिक साधनाची गरज नाही. या गणकयंत्रावर विद्यार्थी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराची उत्तरे पडताळून पाहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना गणित विषयात अजिबात आवड नाही त्या विद्यार्थ्यांना खेळातून गणित शिकता असल्याने गणित विषयात आवड निर्माण होत आहे.

****

माजी खासदार तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या पार्थिव देहावर आज लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात कौठा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, आमदार विक्रम काळे यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसंच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी डॉ वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ वाघमारे यांचं काल लातूर इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते.

****

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा इथे तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...