Wednesday, 4 March 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण, पंतप्रधानाचं अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये प्रतिपादन

·      दुबई आणि अबू धाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा अंशतः सुरू, देशात ४० ते ४५ दिवस पुरेल एवढा इंधनसाठा शिल्लक- सरकारचं स्पष्टीकरण

·      मुंबई, यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एटीएसचे छापे

·      धुलिवंदनाचा सण सर्वत्र उत्साहात साजरा

आणि

·      टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड दरम्यान उपांत्यफेरीचा पहिला सामना

****

बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण ठरला आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारमध्ये ‘शाश्वत आणि सशक्त आर्थिक प्रगती’ या विषयावर ते दूरस्थ पद्धतीने बोलत होते. आज जग परिवर्तनशील आणि विश्वासार्ह भागीदाराच्या शोधात आहे, त्यामुळे भारताला ही एक मोठी संधी आहे, असं ते म्हणाले. भारताने मुक्त व्यापार करार केल्यामुळे संधीची दारं उघडली गेल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले…

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याची जबाबदारी सर्वांची असून, देशात तयार होणारी उत्पादनं जागतिक दर्जाची असायला हवीत असं पंतप्रधान म्हणाले. त्यांनी उद्योजकांना गुंतवणूक करण्याचं, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं.

****

पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबई आणि अबू धाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा अंशतः सुरू झाली आहे.

दुबईत अडकलेल्या १४९ प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान काल सकाळी दिल्ली विमानतळावर उतरलं, तर एमिरेट्स कंपनीचं विमान २१७ प्रवाशांना घेऊन चेन्नई विमानतळावर उतरलं.  राज्यातल्या १६४ जणांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन विमानांची व्यवस्था केली आहे.

या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सौदी अरेबियातील जेद्दाह इथून भारतातल्या विविध शहरांमध्ये इंडिगो एअरलाइन्सने १० विशेष उड्डाणं सुरू करण्याची घोषणा केली आहे.

उमराह यात्रेसाठी राज्यातून सुमारे ४५ हजाराच्या वर पर्यटक सौदी अरेबियात गेले आहेत. या पर्यटकांना त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगितलं असून, ट्रॅव्हल्स संचालकांकडून संभाव्य मदतीची चाचपणी करण्यात येत असल्याचं, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी सांगितलं आहे.

**

दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्र्यांची समिती स्थापन केली असून, याची दैनंदिन बैठक घेतली जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल पुरवठा थांबला तर भारताकडे दहा कोटी बॅरल तेलाचा साठा शिल्लक असून, हे तेल ४० ते ४५ दिवस पुरेल एवढं आहे. याबाबत सरकार समाधानी असून गरज पडली तर उपाययोजना केल्या जातील, असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं.

दरम्यान, पश्चिम आशियातील परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कुवेत, कतार आणि ओमानच्या राष्ट्रप्रमुखांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी संवादाची गरज असल्याचं मोदी म्हणाले.

****

राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सहा राज्यातल्या या उमेदवारांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा समावेश आहे.

****

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक-एटीएसने राज्यातल्या तीन जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. मुंबई, यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात, आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात १२ ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ७४ लाख रुपये रोख, तलवारी आणि चाकूंसह अन्य धारदार शस्त्रं जप्त करण्यात आली. ही शस्त्र बाळगल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अनेक कागदपत्रं, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि सीसीटीव्ही कॅमेरेही जप्त करण्यात आले असून, त्यांची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद आणि उमरखेड भागातल्या १४ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून २५० कोटी रुपयांहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचं, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. सध्या जाहिरातींद्वारे एस टी महामंडळाला दरवर्षी सुमारे २२ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. या नव्या आराखड्याच्या माध्यमाद्वारे तिकीट विक्रीव्यतिरिक्त विविध पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न निर्माण झालं, तर भविष्यात तोट्याच्या गर्तेत जाण्याची वेळ एसटीवर येणार नाही, असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

****

धूलिवंदनाचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्थेच्या वतीने धुलिवंदन, रंगपंचमी निमित्त समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी पाणी वाचवा, कोरडा रंग लावा असा मजकूर असलेले फलक हातामध्ये घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकी फेरी काढली.

खासदार संदिपान भुमरे यांनी लहान मुलं आणि युवकांसोबत रंग उधळून पर्यावरणपूरक धुळवड साजरी केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही शहरात गुलमंडी परिसरात नागरिक, कार्यकर्ते तसंच दुकानदार बांधवांसोबत धुळवडीचा आनंद लुटला.

पैठण इथलं संत एकनाथ समाधी स्थळ तसंच संत एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील विजयी पांडुरंग मंदिरामध्ये फुलांची उधळण करुन कीर्तनासह विविध भक्ती गीतांच्या सादरीकरणासह धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला.

**

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुलिवंदनानिमित्त जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून त्याला कपड्यांचा आहेर करण्याची प्रथा आहे. यंदाही हा मजेशीर सोहळा उत्साहात पार पडला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून,

बाईट-रवी उबाळे

**

जालना शहरात धुलिवंदनाच्या पारंपरिक ‘हत्ती रिसाला’ मिरवणुकीने यंदा १३८ व्या वर्षात पदार्पण केलं. शहराच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक ठरलेली ही मिरवणूक पिढ्यान्‌पिढ्या उत्साहात साजरी केली जाते. काल साजऱ्या झालेल्या या सोहळ्याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून,

बाईट-बाबासाहेब म्हस्के

****

माजी खासदार तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या पार्थिव देहावर काल लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात कवठा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार विक्रम काळे यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसंच साहित्य क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी यावेळी डॉ वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ शोभना बरिदे यांचं काल पुण्यात ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात रुजू झालेल्या, डॉ बरिदे, लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून निवृत्त झाल्या होत्या. प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉ जयंत बरिदे यांच्या त्या पत्नी, तर डॉ पी वाय मुळे यांच्या भगिनी होत.  

****

टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघात लढत होणार आहे. उद्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना इंग्लंडसोबत होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...