Tuesday, 3 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेसह जगासाठी आशेचा किरण असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘शाश्वत आणि सशक्त आर्थिक विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते आज बोलत होते.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

आज जग विश्वासार्ह आणि लवचिक उत्पादन भागीदारांच्या शोधात असून, भारताकडे या दिशेने एक प्रमुख खेळाडू बनण्याची संधी असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करुन, देशासाठी मोठ्या संधींचे दरवाजे उघडले आहेत, असं सांगून त्यांनी, गुणवत्तेशी कधीही तडजोड न करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं नमूद केलं. उद्योगांनी संशोधन आणि विकासात गुंतवणूक वाढवण्याचं आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या यु ट्युब वाहिनीच्या सबस्क्रायबर्सचा तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. या व्यासपीठावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले मोदी हे विश्वनेते ठरले आहेत. २००७ मध्ये मोदी यांनी यु ट्युब वर आपलं चॅनल सुरु केलं होतं. या श्रेणीतल्या अन्य लोकांच्या तुलनेत ही संख़्या अनेक पटींनी जास्त आहे.

****

ग्रामीण रोजगारासाठी मनरेगाच्या माध्यमातून २०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी चौथा हप्ता म्हणून केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी एक हजार १६८ कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरुन ही माहिती दिली. याचा मोठा लाभ आदिवासी, अनुसूचित जाती आणि इतरही श्रमिकांना होणार असून, ग्रामीण कुटुंबांना सणासुदीच्या काळात मोठा आधार मिळणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

देशभरात आज धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा होत आहे. सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून काही ठिकाणी कोरड्या रंगांनी सण साजरा करण्यावर भर दिला जात आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहनही करण्यात येत असून, पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.

**

जालना शहरात आज धुलिवंदनाच्या दिवशी परंपरेप्रमाणे ‘हत्ती रिसाला’ मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक ठरलेली ही मिरवणूक पिढ्यान्‌पिढ्या उत्साहात साजरी केली जाते. हत्तीवर बसलेला राजा आणि प्रधान रेवड्यांची उधळण करतात. या मिरवणुकीत सर्व धर्मीय नागरिक सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचा संदेश देतात. ज्या मार्गांवरून ही मिरवणूक जाते त्या भागात नागरिक रंग खेळणं बंद करतात, अशी मान्यता आहे. या वर्षीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. पोलिस प्रशासनाकडून मिरवणुकीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

**

बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या विडा इथं धुलिवंदनानिमित्त प्रथेप्रमाणे जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्यात आली. यासाठी जावयाचा शोध घेतला जातो. यंदा शिवाजी गालफाडे यांची मिरवणूक काढून त्यांचा योग्य मान सन्मान करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ शोभना बरिदे यांचं आज पहाटे पुण्यात ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात रुजू झालेल्या, डॉ बरिदे, लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात येणार आहे. प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉ जयंत बरिदे यांच्या त्या पत्नी, तर डॉ पी वाय मुळे यांच्या भगिनी होत.

****

वर्षातलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण आज होत आहे. दुपारी तीन वाजून २० मिनिटांनी आंशिक टप्प्याला सुरुवात होईल, तर संध्याकाळी चार वाजून ३४ मिनिटांपासून पाच वाजून ३३ मिनिटांपर्यंत पूर्ण चंद्रग्रहणाचा टप्पा राहील. ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे तीन तास २७ मिनिटांचा असेल. ईशान्य भारत आणि अंदमान-निकोबार बेटांतील काही भाग वगळता अनेक ठिकाणी चंद्रोदयाच्या वेळी ग्रहणाचं दर्शन होईल. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर देशातले अनेक मंदिरं बंद राहतील.

****

जागतिक वन्यजीव दिवस आज पाळला जात आहे. यानिमत्त सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं. वन्यजीव संवर्धनासाठी सरकारच्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी जागतिक वन्यजीव दिनाचं वर्णन, पृथ्वीच्या अद्भुत जैवविविधतेचा उत्सव म्हणून केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...