Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 March 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ मार्च
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक वन्यजीव दिवस आज पाळला
जात आहे. यानिमत्त सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध
असल्याचं सांगितलं. पृथ्वीच्या परिसंस्थांना भरभराटीला आणणाऱ्या जैवविविधतेचा उत्सव
साजरा करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. वन्यजीव संवर्धनासाठी सरकारच्या प्रयत्नांवरही
पंतप्रधानांनी प्रकाश टाकला, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय
बिग कॅट अलायन्सची स्थापना आणि ग्रेट इंडियन बस्टर्ड, घारियाल, स्लॉथ बेअर आणि
बिबट्यांचं संवर्धन आणि स्थलांतर यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी जागतिक वन्यजीव
दिनाचं वर्णन, पृथ्वीच्या अद्भुत जैवविविधतेचा उत्सव म्हणून केलं
आहे. भारत आपल्या समृद्ध परिसंस्थांबद्दल जागरूक असून, वन्यजीवांची भरभराट होईल आणि पृथ्वी समृद्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
‘शाश्वत आणि सशक्त आर्थिक विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करणार
आहेत. या उपक्रमांतर्गत चार स्वतंत्र वेबिनार सत्रांचं आयोजन करण्यात आलं असून, त्यामध्ये वस्तुनिर्माण, औद्योगिक उन्नती आणि धोरणात्मक क्षेत्रं, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग, वित्त आणि बाजारपेठ
प्रवेश, तसंच शहरी आर्थिक क्षेत्रं, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक यांचा समावेश आहे.
****
आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या
नागरिकांच्या मदतीसाठी सरकारने व्हॉटसॲप क्रमांक जारी केला आहे. ज्यांना मदतीची गरज
आहे त्यांनी +97 15 03 65 43 57 या क्रमांकावर
संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. दुबईतल्या इंडियन पीपल्स
फोरमच्या समन्वयानं राज्य सरकारनं हा क्रमांक जारी केला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस हे सातत्याने विविध यंत्रणां तसेच केंद्र सरकारसोबत सातत्याने संपर्क ठेवून
आहेत.
****
दरम्यान, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबई आणि अबू धाबीहून भारताकडे
येणारी विमानसेवा गेल्या काही दिवसांपासून बंद होती, ती काल रात्रीपासून अंशत: पुन्हा सुरु झाली आहे. या निर्णयामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये
अडकलेल्या हजारो भारतीयांना मोठा दिलासा मिळाला. दुबई आणि अबुधाबीहून दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुकडे काही प्रमाणात विमानसेवा सुरु करण्यात
आल्याचं दुबई मिडिया ऑफिसने आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने
अहिल्यानगर आणि यवतमाळ जिल्ह्यात तपासणी अभियानादरम्यान सुमारे ७४ लाख रुपये आणि धारदार
शस्त्रे जप्त करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद आणि उमरखेड क्षेत्रातून १४ जणांना
चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
****
नागपूरमधल्या स्फोटक निर्मिती
कारखान्यातल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १९ झाली असून, २३ जखमींपैकी १३ जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या कंपनीच्या
२१ संचालक आणि भागधारकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, ११ संचालकांना अटक केली आहे. या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. प्रत्येक
मृताच्या कुटुंबाला ७५ लाख रुपये आणि जखमींना २५ लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश
बावनकुळे यांनी कंपनीला दिले आहेत.
****
परभणी इथं कामगार भवन इमारतीच्या
बांधकामाचं भुमिपूजन काल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. कामगार भवनाच्या
माध्यमातून कामगार वर्गाला सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली तत्परतेने मिळतील, तसंच कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, नोंदणी प्रक्रिया, लाभांचं वितरण, आरोग्य सेवा, सुरक्षा उपाययोजना तसंच इतर कल्याणकारी कार्यक्रम अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने राबवता येतील, असं बोर्डीकर यावेळी म्हणाल्या.
****
औषधनिर्माण क्षेत्रातली वाढती
मागणी आणि उद्योगक्षेत्राशी सुसंगत शिक्षण यांची प्रभावी सांगड घालत स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने रोजगारनिर्मितीच्या दिशेने आणखी एक उल्लेखनीय पाऊल टाकलं
आहे. विद्यापीठाच्या प्रशिक्षण आणि रोजगार विभाग आणि औषधनिर्माणशास्त्र संकुल यांच्या
संयुक्त विद्यमाने घेतलेल्या विशेष कॅम्पस रोजगार मेळाव्यात औषधनिर्मिती क्षेत्रातील
नामांकित कंपनी मॅक्लेओड्स फार्मास्युटिकल्सने २० विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे
निवड केली.
****
लातूर शहरात अनधिकृत फलक लावणार्यांवर
दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त मानसी यांनी दिले आहेत. काल अतिक्रमण
हटाव विभागाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. शहरातील काही ठिकाणी फलकं लावता येतील का, याचीही तपासणी करावी, काही ठिकाणी मनपाने जागा निश्चित कराव्यात, अल्पकाळासाठी शुल्क आकारून तिथं फलकं लावण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
****
मध्य प्रदेशात जबलपूर इथं नुकत्याच
पार पडलेल्या ४५ व्या राष्ट्रीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने
३२ पदकं मिळवली. महिला संघाला विजेतेपद मिळालं तर पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान
मानावं लागलं.
****
No comments:
Post a Comment