Thursday, 6 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 06 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. सकाळी ११ वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर, हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या अणुबॉम्ब हल्ल्यातल्या बळींना लोकसभेने आदरांजली वाहिली. जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या त्या दुःखद अणुबॉम्ब हल्ल्यांना आज ८१ वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात लाखो निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले आणि असंख्य लोक जखमी झाले. या घटनेनंतरच जगाला अणुशस्त्रांच्या विनाशकारी परिणामांची जाणीव झाल्याचं बिर्ला यांनी सांगितलं.

त्यानंतर, बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं, अशी मागणी त्यांनी लाऊन धरली. संसद ही चर्चा करण्यासाठी, प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि विचारांची अर्थपूर्ण देवाणघेवाण करण्यासाठी असते, असं सांगून बिर्ला यांनी सदस्यांना कामकाज सुरळीत चालू देण्याचं आवाहन केलं. मात्र गदारोळ सुरुच राहील्यानं त्यांनी कामकाज स्थगित केलं.

**

राज्यसभेतही नीट आंदोलनावरुन विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. आज सकाळी सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर मंत्र्यांनी विविध कागदपत्रे सादर केली. वाणिज्य, उद्योग, रसायने आणि खते यांवरील संसदीय स्थायी समितीचा अहवालही सादर करण्यात आला. त्यानंतर, विरोधी पक्षांच्या गदारोळात, सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर सुरू केला. सभागृहातल्या प्रत्येक सदस्याने शिस्तबद्धता राखून संबंधित विषयांवर बोलावं अशी अपेक्षा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली. मात्र विरोधी पक्ष सदस्यांचा गदारोळ सुरुच राहिल्यानं सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

भाजप नेत्या, माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वराज या नम्रता आणि साधेपणाचे प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. स्वराज यांनी शिस्त, निष्ठा आणि धाडसाच्या बळावर संघटनेपासून सरकारपर्यंत, प्रत्येक जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली, असं ते म्हणाले. परराष्ट्र मंत्रालयाला सर्वसामान्य जनतेशी जोडणारी त्यांची कार्यशैली आणि त्यांचं साधं जीवन नेहमीच आठवणीत राहील, असं शाह यांनी म्हटलं आहे.

****

राज्य शासनानं पिंक इ-ऑटो योजनेच्या अनुदानात २० टक्क्यांवरुन ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत याआधी पिंक इ-रिक्षा घेतलेल्या महिलांनाही वाहन कर्जाची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त २० टक्के अनुदानाचा लाभ मिळेल. महिलांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करणं आणि स्वच्छ वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

****

महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड देशात आणि परदेशात अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रसिद्धी, प्रभावी जनसंपर्क आणि आधुनिक माध्यमांचा वापर वाढवण्यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भर दिला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत पर्यटन संचालनालयाच्या यावर्षीच्या जनसंपर्क आणि सामाजिक माध्यमांअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य आधुनिक माध्यमांच्या माध्यमातून जगासमोर प्रभावीपणे मांडण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

आषाढी वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गोमळवाडा इथं पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.

****

अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत आज व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. शहरातल्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमधले विद्यार्थी यात सहभागी झाले.

****

महसूल गुप्तचर यंत्रणेनं काल सातारा जिल्ह्यातला अवैध औषध निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली. तसंच काही अंमली पदार्थ आणि सुमारे चारशे लीटर कच्चा माल जप्त केल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

****

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत 'आमचं गाव, आमचा विकास' उपक्रमाअंतर्गत बीड इथं ग्रामपंचायत विकास आराखडा, पंचायत समिती विकास आराखडा आणि जिल्हा परिषद विकास आराखडा विषयक जिल्हास्तरीय कार्यशाळा काल घेण्यात आली. ग्रामपंचायतींचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायत विकास आराखडे दर्जेदार, सर्वसमावेशक आणि वास्तवाधारित असणं गरजेचं असल्याचं मत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी व्यक्त केलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...