Sunday, 9 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

·      सहकारी बँका जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन

·      स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ

·      एसआयआर अंतर्गत राज्यातल्या १२ जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्ज वाटप पूर्ण-मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश

·      कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अश्मिता चालिहाची आज विजेतेपदासाठी चीनच्या हान कियान शी हिच्याशी लढत

आणि

·      छत्रपती संभाजीनगर,जालना,बीड,लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट

****

सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला युपीआयद्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही, तसंच ग्राहकांनीही कुठलीही खरेदी केल्यावर युपीआयद्वारे पैसे दिले तरी त्यांना शुल्क द्यावं लागणार नाही असं अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. 'मर्चंट डिस्काउंट रेट' शुल्क लागू केलं गेलं, तरीही ते केवळ विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या मर्यादित संख्येच्या व्यापारी व्यवहारांवरच नाममात्र दराने लागू होईल, असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.

****

सहकारी बँका या नफा कमवण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. काल मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. बँकिंग सेवा आधुनिक, पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून ही संघटना, या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व सहकारी बँकांनी या संघटनेसोबतच आजपासून सुरु झालेल्या सुरक्षा कार्यान्वयन केंद्रातही सहभागी व्हावं, असं आवाहन शहा यांनी केलं. महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त ४४९ सहकारी बँका असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देतांना शहा म्हणाले…

बाईट- केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

****

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जीवाश्म-इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेमध्ये देशाने ३०० गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सामाजिक माध्यमावरून ही माहिती दिली. गेल्या १२ वर्षांत भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत ४०० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

****

गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्यूल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, देशभरात ४२ प्रकरणात तब्बल साडे सात कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरली आलेली बँक खाती उघडकीस आली आहेत. खार पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत या टोळीचा सुगावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराशी टेलिग्राम या ॲपच्या माध्यमातून संपर्क साधून त्याला मोठ्या परताव्याचं अमिष दाखवण्यात आलं होतं.

****

नवजात बालकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा वेळेवर उपलब्ध व्हावी, तसंच नवजात बालक विशेष दक्षता विभागात अधिक सक्षम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध होतील, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. ते काल मुंबईत आरोग्य भवनात ‘एनआयसीयू आणि बालकांवरील उपचार’ या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देशही आबिटकर यांनी दिले.

****

ऑगस्ट क्रांती दिन आज पाळला जात आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नऊ ऑगस्ट १९४२ या दिवशी मुंबईतल्या गोवालीयार टँक इथून महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना देश सोडण्यासाठी 'भारत छोडो' आंदोलनाची हाक दिली आणि 'करेंगे या मरेंगे' हा नारा दिला होता. या उठावाने संपूर्ण देशात तीव्र इंग्रज विरोधी भावना जागृत केली होती. हा लढा ब्रिटिश राजवटीच्या पाया हलवणारा ठरला आणि यामुळेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी प्राणांची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर आणि हुतात्म्यांना आज अभिवादन केलं जात आहे.

****

दरम्यान, येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ होत आहे. १७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या अभियानात नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकावून, त्यासोबत सेल्फी छायाचित्र काढून ते हर घर तिरंगा संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं…

बाईट- माजी आमदार श्रीकांत जोशी

****

राज्यातल्या १२ जिल्ह्यांमध्ये मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम १०० टक्के पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काल ही माहिती दिली. यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोलीसह जळगाव, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात एकंदर नऊ कोटी ५४ लाख ७७ हजार ११९ अर्ज वाटण्यात आले. एक लाख २५३ बूथ लेव्हल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या १७ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव उपपरिसर इथल्या पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठात विविध १३६ अभ्यासक्रम असून त्यात एकूण २ हजार ९३६ जागांची प्रवेशक्षमता आहे. यापैकी १ हजार ७१९ जागांवर प्रवेश घेण्यात आले आहेत.

****

जालना जिल्ह्यातल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री राजेश टोपे यांना यंदाचा 'साखर उद्योग गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. काल पुण्यात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनच्या ७१व्या वार्षिक अधिवेशनात माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते टोपे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या १३ हजार ११० पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण ९० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी थेट हस्तांतरित करण्यात आला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध झालेल्या ३२ हजार ३४ शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे.

****

‘आयुष्यमान भारत डिजिटल मिशन’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळामधून हिंगोली जिल्ह्याची, ‘मॉडेल डिस्ट्रिक्ट’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, काल हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष प्रशिक्षण पार पडलं. जिल्ह्याची डिजिटल आरोग्य परिसंस्था भक्कम करण्यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.

****

परभणी इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन काल प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. एम. सादराणी यांच्या हस्ते झालं. न्यायालयीन प्रक्रियेला पर्याय म्हणून नव्हे तर न्याय अधिक जलद, सुलभ आणि समाधानकारक पद्धतीने भेटून देणारी व्यवस्था म्हणून मध्यस्थीकडे पाहणं गरजेचं असल्याचं, ते यावेळी म्हणाले.  

****

नाशिक शहरासह दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांमधल्या विविध गावांमध्ये काल रात्री भूकंपाचा सौम्य झटका जाणवला. सुमारे २०-२२ सेकंदांपर्यंत जमीन थरथरली, तसंच काही ठिकाणी जोरदार आवाजदेखील आला.

****

दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरु असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अश्मिता चालिहा हिने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अस्मितानं भारताच्याच रक्षिता रामराजवर  २१-१३, १६-२१, २१-१३ अशी मात केली. आज अंतिम फेरीत अस्मिताची चीनच्या हान कियान शी हिच्याशी लढत होणार आहे.

****

पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयाचं काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गोडा, आमदार विलास भुमरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...