Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 28
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
'विकसित भारत अभियाना'अंतर्गत येत्या
२०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा क्षमता साध्य करण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट
भारतानं ठरवलं आहे. सध्या देशात सात विविध ठिकाणी २४ अणुऊर्जा प्रकल्प चालवले जात असून, त्यांची एकूण
स्थापित क्षमता ८ पुर्णांक ७८ गिगावॅट इतकी आहे. देशात आणखी नऊ अणुभट्ट्यांच्या उभारणीचं
काम वेगानं सुरू असल्याचं अणुऊर्जा विभागानं म्हटलं आहे. अणुऊर्जा केवळ वीज निर्मितीमध्येच
नव्हे, तर आरोग्यसेवा, कृषी आणि विविध औद्योगिक क्षेत्रांतही योगदान देत आहे.
'सुरक्षा सर्वोपरी' या तत्त्वावर भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम आधारित आहे.
संरक्षण, आपत्कालीन परिस्थितीसाठीची सर्वसमावेशक तयारीद्वारे, हा कार्यक्रम विश्वसनीय आणि
कमी कार्बन उत्सर्जन करणारा आहे तसंच वीज पुरवण्यासोबतच लोक आणि पर्यावरणाचेही रक्षण
करतो, असं अणू विभागानं म्हटलं आहे.
****
'प्रधानमंत्री जन धन योजनेला
आज बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. 'जन धन योजने'ने अभूतपूर्व व्याप्ती आणि
परिवर्तनकारी परिणाम साधले असून या योजनेचा प्रभाव अद्वितीय राहिला असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५९ कोटींहून अधिक खाती उघडण्यात
आली असून, त्यामध्ये एकूण ३ लाख १७ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांपैकी
७८ टक्के खाती ग्रामीण किंवा निम-शहरी भागातील असून ५६ टक्के खाती महिला ग्राहकांची
आहे. त्यामुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन बळकट झाले असून, थेट आर्थिक मदत अधिक सुलभपणे
उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
****
नाशिकमधून ४५० टनांहून अधिक
कांदा घेऊन आलेली पहिली 'कांदा एक्सप्रेस' आज सकाळी दिल्लीत दाखल झाली.
कांद्याची पुरेशी उपलब्धता आणि किमतींमध्ये स्थिरता राखण्यासाठी सरकारने राखीव साठ्यातील
कांदा नियोजित पद्धतीने बाजारात आणण्यास सुरुवात केली, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं
स्पष्ट केलं. उत्पादन क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणात कांदा मागणी असलेल्या केंद्रांपर्यंत
पोहोचवण्यासाठी 'कांदा एक्सप्रेस' प्रभावी वाहतूक उपाय ठरत आहे.
तसंच, चेन्नई, कोलकाता, एर्नाकुलम, गुवाहाटी, वाराणसी, लखनौ, पाटणा, चंदीगड, जम्मू आणि अमृतसर यांसारख्या इतर प्रमुख शहरांमध्येही रस्ते मार्गाने कांद्याचा
पुरवठा केला जात आहे. २०२५-२६ या कालावधीसाठी ३०७ लाख टनांहून अधिक उत्पादनाचा अंदाज
असल्याने, आगामी महिन्यांत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याचा पुरवठा पुरेसा असल्याचं
संबंधित मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीर इथं सुरू असलेल्या
अमरनाथ यात्रेचा आज 'छडी मुबारक' सोहळ्यानं समारोप होत आहे. यंदा तीन जुलै रोजी पहलगाम
आणि बालताल इथून सुरू झालेली ही यात्रा ५७ दिवसांपर्यंत चालली. यावर्षी चार लाख ८०
हजारांहून अधिक भाविकांनी या यात्रेदरम्यान पवित्र गुहेत जाऊन दर्शन घेतलं असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या
पवित्र सणानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
****
भंडारा इथं शहीद भगतसिंग वरिष्ठ
प्राथमिक नगर परिषद शाळेला काल जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी अचानक भेट देत शाळेतील
शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि उपलब्ध साधनसामग्रीची पाहणी
केली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या जिल्हाधिकाऱ्यांना
बांधल्या. या आपुलकीच्या आणि अनोख्या भेटीने जिल्हाधिकारी भारावून गेले. यावेळी त्यांनी
विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाविषयक तसंच शाळेतील विविध बाबींची माहिती
घेतली. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण असून विद्यार्थिनींनी
दिलेली ही प्रेमाची भेट विशेष असल्याचं त्यांनी म्हटलं. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण
घेत भविष्यात जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यानी
केलं.
****
हवामान - आज आणि उद्या मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर विदर्भ मध्य महाराष्ट्रात
काही ठिकाणी तसंच कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला
आहे.
****
हॉकी- नेदरलँड्समधील अॅमस्टेलफेन
इथं काल झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतील पाचव्या स्थानासाठीच्या सामन्यात भारतीय
महिला संघानं जर्मनीला ३-१ ने पराभूत केलं. १९७४ मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत
चौथे स्थान पटकावल्यानंतर भारतीय महिला संघाची ही सर्वोत्तम कामगिरी होती. या विजयात
नवनीत कौरनं दोन गोल करून भारताला आपल्या मोहिमेचा शेवट यशस्वीपणे करण्यास मदत केली.
****
भालाफेकपटू नीरज चोप्रानं
यंदाच्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी चार
आणि पाच सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स इथं होणार आहे. नीरजनं डायमंड लीगच्या दोन टप्प्यांमध्ये
सहभाग घेतला आहे.
****
No comments:
Post a Comment