Wednesday, 19 August 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मंत्रीस्तरीय शिष्टमंडळासह सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाल्या. सिंगापूरमध्ये होणाऱ्या चौथ्या भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय बैठकीत त्या सहभागी होणार आहेत. या शिष्टमंडळात परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांचा समावेश आहे.

****

राष्ट्रीय परीक्षा संस्था, NTA नं आपल्या परीक्षा पथकाची पुनर्रचना करत 600 तज्ज्ञांना हटवून त्यांच्या जागी नव्या तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली. परीक्षेतील प्रश्नपत्रिकांची अधिक काटेकोर तपासणी सुनिश्चित करण्यासाठी NTA कडून चार-स्तरीय प्रश्नपत्रिका तपासणी व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. तसंच, पुढील दोन ते तीन आठवड्यांत NTA मध्ये 20 ते 25 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय, NTA ची कार्यालयं नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार असून, सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी CISF ची पथकं तैनात केली जाणार आहेत.

****

विशेष मतदार यादी पुनरीक्षण अर्थात एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7 कोटी 71

लाख मतदारांनी अर्ज दाखल केले असून २ कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेच नसल्याचं आढळलं आहे. त्यामुळं प्रारुप मतदार यादीतून त्यांनी नावं हटवली जाणार आहेत. तथापि SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदारयादीत नाव समाविष्ट करता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. SIR अंतर्गत मतदार गणना अर्ज सादर करण्यासाठी सोमवार,१७ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत होती. राज्यात 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार आहेत. त्यापैकी दोन कोटी 7 लाख 3 हजार 268 मतदारांनी SIR च्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा केले नसल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

एसआयआरसाठी अर्ज दाखल न करणाऱ्यांचं प्रमाण 21 टक्क्यांहून अधिक आहे.अर्ज दाखल न करण्याचं प्रमाण ठाण्यात सर्वाधिक 38 टक्के असल्याचं आढळलं आहे. मुंबई शहरात ते 37 टक्के तर पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31 टक्क्यांहून अधिक आहे.

****

महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती आजपासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहे. २१ ऑगस्टपर्यंतच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकासकामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. समिती प्रमुख आमदार दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत १५ आमदारांचा समावेश आहे. जिल्हा दौऱ्यादरम्यान विभागनिहाय माहिती, प्रगती अहवाल, योजनांची सद्यस्थिती, मंजूर प्रलंबित कामं, निधीची उपलब्धता आणि खर्च, लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विविध योजनांच्या लाभाची माहिती देण्यात येणार आहे. आदिवासीबहुल क्षेत्रातील विकासकामं, मूलभूत सुविधा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी, आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण, शैक्षणिक सुविधा, आश्रमशाळा आणि वसतिगृह, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आदी बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे.

****

पाल्याच्या यशापयशात सहभागी असणं म्हणजे पालकत्व आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे पालकांनी बदललंच पाहिजे, असं प्रतिपादन प्रयोगशील लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक राजीव तांबे यांनी केलं. प्रा.डॉ. विठ्ठल गोरे यांच्या विहंग प्रकाशन पुणे यांनी निर्मिती केलेल्या ' घडवताना घडत जाणे' या पुस्तकाचे प्रकाशन तांबे यांच्या हस्ते उदगीर इथं नुकतंच झालं त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेचे अध्यक्ष धनंजय गुडसूरकर होते. पालकांना भूतकाळ असतो तर मुलांना भविष्यकाळ असते, भूतकाळात गुंतायचे की भविष्यकाळ घडवायचा याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे असं मत तांबे यांनी व्यक्त केलं.

****

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारतीय संघानं पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा श्रीलंकेच्या ४ बाद १३८ धावा झाल्या आहेत. श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचं आव्हान आहे. 

****

पुढील दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात आज लातूर, धाराशिव, बीड, जालना या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...