Thursday, 27 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      सरकार २१ व्या शतकातील आधुनिक क्रीडा परिसंस्था तयार करण्यास कटीबद्ध- पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      नेपाळमधे अडकलेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्याचा केंद्र सरकारशी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी

·      एमपीएससी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यावर सरकारचा भर, मुख्यमंत्रांची माहिती

·      विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील काम मुदतवाढीसह निर्धारित कालावधीत पूर्ण

आणि

·      कोलंबो क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित, भारताचा १-० असा मालिका विजय

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१व्या शतकातील भारतासाठी आधुनिक क्रीडा व्यवस्था उभारण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. क्रीडा विद्यापीठं, आधुनिक प्रशिक्षण केंद्रं आणि इतर सुविधा विकसित करून खेळाडूंना प्रत्येक स्तरावर मदत केली जात असल्याचं मोदी म्हणाले. सरकारनं क्रीडा क्षेत्र आणि प्रतिभा शोधण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी दिली.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील युवक सहभागी झाले. नाशिक इथं झालेल्या कार्यक्रमात क्रिकेटपटू शाल्मली क्षत्रिय सहभागी झाली होती. कार्यक्रमाबद्दल तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

बाईट – शाल्मली क्षत्रिय

 

धाराशिव इथं झालेल्या कार्यक्रमात मुष्टीयोद्धा सनी कापसे सहभागी झाले होते. त्यांनी युवकांना विविध क्रीडा प्रकारात स्वतःचे भविष्य घडवण्याचं आवाहन केलं.

बाईट – सनी कापसे

 

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आलं. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांतील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

****

नेपाळमधे अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्यशासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातून नेपाळ, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून, आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. १-०-७-० हा क्रमांक मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात २४ तास कार्यरत राहील. राज्यातल्या ४५ प्रवाशांचे दोन गट बसने नेपाळला गेले असून त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न सुरु आहे, असं महाजन यांनी सांगितलं. त्याखेरीज आणखी काही पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं समजलं आहे.

दरम्यान, नेपाळला भारताकडून सुमारे साडे सदतीस टन मदत सामग्री आज रवाना करण्यात आली.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. यासंदर्भात एक समिती नेमली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एमपीएससी परीक्षा पद्धतीत अधिक पारकदर्शकता आणण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील घरभेटी देऊन सर्व्हेचे काम मुदतवाढीसह निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आलं आहे. एसआयआरच्या पुढील टप्प्यात प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी आणि त्यानंतरच्या कार्यवाहीचे काटेकोर नियोजन करावं, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांबाबत गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज दिले. ते नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. दुसऱ्या टप्प्यासाठी यंत्रणेनं प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी सक्रिय राहून नागरिकांना प्रक्रियेबाबत अचूक माहिती द्यावी असं मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी म्हटलं आहे.

****

कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी, केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून, तसंच सफल आणि केंद्रीय भांडारमधून ३५ रुपये प्रति किलो दराने करण्यात येईल.

****

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. या घटनेच्या तपासाबाबत सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडून माहिती घेतली. तपासामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच प्रकरणाचा तपास वेगानं आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमेच्या निमित्तानं विविध टाकाऊ पदार्थांपासून ‘वारली राख्या’ तयार केल्या आहेत. यासाठी टाकाऊ बॉक्सचे पुठ्ठे, जुन्या कापडाचे मणी, रंगीत दोरे, रंगीत कागदाचे तुकडे इत्यादी वस्तूंचा कलात्मक वापर करून या राख्या तयार केल्या आहेत. शाळेतील कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवी, आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. या राख्यांचे प्रदर्शन शाळेत भरवले असून ग्रामस्थांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली.

****

सहा नामांकित विद्यापीठातल्या विविध शाखेची पदवी आणि डिप्लोमा विक्री कोणतीही परीक्षा न देता पाच ते १० लाख रुपयांत करण्यात येत असल्याचं प्रकरण चंद्रपुरात उघडकीस आलं आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिस ठाण्यात विद्यापीठांची बनावट प्रमाणपत्रे, गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्र विकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात परिमल बाबूराव गौरकर हा फरार असून कागदपत्रासाठी ग्राहक शोधणारा वैभव सोनुले याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर करीत आहेत.

****

केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीची माहिती नागरिकांना देण्यासाठी केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं धाराशिवमध्ये मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मध्यवर्ती बसस्थानकात येत्या एक आणि दोन सप्टेंबरला हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. ‘केंद्र सरकारची १२ वर्षे सेवा’ तसंच ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५ या विषयांवर हे प्रदर्शन आधारित आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणं, तसंच देशाच्या विकासाच्या वाटचालीची माहिती देणं हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

****

क्रिकेट

कोलंबो इथला दुसरा क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित अवस्थेत संपला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं ९ बाद ४२९ धावा केल्या. सोनल दिनुशाच्या १३३ धावांच्या खेळीच्या बळावर श्रीलंकेला सामना अनिर्णित राखण्यात यश आलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...