Wednesday, 26 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      नेपाळमध्ये आलेल्या पुरात ३८४ पर्यटक बेपत्ता, १०५ भारतीयांचा समावेश असल्याची माहिती

·      सायबर गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत जनजागृती आवश्यक, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय

·      देशभरासह राज्यात आज ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्साह

आणि

·      कोलंबो क्रिकेट कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात सहा बाद २२९ धावा

****

नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे रसुवा भागात ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १०५ हून अधिक भारतीय नागरिकांचा यात समावेश असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, उत्तर प्रदेशातील सीमावर्ती भागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि नेपाळला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. नेपाळमधल्या भारतीय दुतावासानं 977 985 131 6807 आणि 977 970 910 7500 हे मदत क्रमांक जारी केले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या २७ तारखेला खेलो इंडिया डायलॉग या कार्यक्रमाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. देशाच्या क्रीडा यात्रेत युवकांचा सहभाग वाढवणं आणि युवकांच्या नेतृत्वातला विकसित भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार जाणून घेणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र-निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. मेरा युवा भारत अर्थात माय भारत द्वारे आयोजित या कार्यक्रमात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन महाविद्यालयातले युवक सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय कला महाविद्यालयात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

सायबर गुन्हेगार पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने धमकावून नागरिकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना बळी न पडता फसवणूक झाल्यास तातडीनं १ ९ ३ ० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं ‘डिजिटल अरेस्ट’ जनजागृती लघुपट आणि ‘१९३० महाराष्ट्र सायबर अँथम’चं आज लोकार्पण करण्यात आलं. फसवणुकीनंतरचा ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असून, तातडीनं तक्रार केल्यास पैसे रोखण्याची किंवा परत मिळवण्याची शक्यता वाढते, असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक आणि बनावट ऑडिओ-व्हिडिओ यांसारख्या नव्या सायबर धोक्यांबाबतही नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगाकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याचा आणि ते सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याचा दावा तक्रारींमध्ये करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आयोगानं संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली असून, औषध निरीक्षक पदासाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. फेरपरीक्षेची तारीख आणि इतर तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.

दरम्यान, या पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

****

राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. भारतात अंदाजे ५२ टक्के गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. तीव्र रक्‍तक्षय हे माता आणि नवजात शिशु मृत्यूचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे तीव्र रक्‍तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोज तसेच एफसीएम, म्हणजे फेरीक कार्बोक्सी माल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी, तपासणीअंती २३ हजार ५२४ गरोदर मातांचं निदान, तीव्र रक्‍तक्षय असलेल्‍या अतिजोखमीच्‍या माता म्हणून झालं आहे. त्‍यापैकी २१ हजार ३३७ मातांना हे उपचार दिले असून, उपचाराचं प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. अहिल्‍यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्‍नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमधे हे प्रमाण १०० टक्के आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्‍हापूर, उल्‍हासनगर, नांदेड-वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी आणि सांगली-मिरज कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचं प्रमाण १०० टक्‍के आहे.

****

देशातल्या असंघटित कामगारांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी देणाऱ्या ई-श्रम पोर्टलनं आज पाच वर्षांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं २०२१ मध्ये सुरू केलेल्या ई-श्रम पोर्टलद्वारे आधारशी संलग्न असंघटित कामगारांचा देशातला पहिला राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात आला. आजवर ३१ कोटी ८९ लाखांहून अधिक कामगारांची नोंदणी झाली असून, विविध योजनांचे लाभ पोहोचवणं, लाभांची पोर्टेबिलिटी आणि पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती यांना यामुळे मोठी मदत झाली आहे.

****

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात ८० टक्क्यांपर्यंत मदत दिली जाणार आहे. १ वर्ष कालावधीचे २ पदविका अभ्यासक्रम आणि ६ महिने कालावधीच्या ४ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

****

देशातल्या सर्जनशील क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी आणि जनसंवाद अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये अधिक बळकट आणि संस्थात्मक सहकार्याची गरज असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी सांगितलं. नवी दिल्लीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती आणि जनसंपर्क विभागांच्या सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते. सार्वजनिक सेवा प्रसारण अधिक सक्षम करण्यासाठी आशयाची सहनिर्मिती, राज्यनिहाय कार्यक्रमांची निर्मिती आणि जनतेपर्यंत अधिक प्रभावी पोहोच निर्माण करण्याबाबत या परिषदेत चर्चा झाली.

****

बीड इथं दशनाम गोसावी समाज परिषद आणि मराठवाडा इनाम जमीन हक्क परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. देवस्थान इनाम जमिनींच्या प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधून ठोस निर्णयासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दशनाम गोसावी, गुरव, ब्राह्मण, बैरागी, नाथपंथी गोसावी तसंच भटक्या-विमुक्त समाजातील नागरीक यात सहभागी झाले.

****

नांदेड जिल्ह्यात एका पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला परभणीतून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणीत पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

****

बीडमधल्या एका बंद हॉटेलमध्ये चाललेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहन असा एकंदर सुमारे साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात १२ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

गेल्यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं ८६ कोटी ६५ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

****

ऑगस्ट महिन्यात मराठवाडा विभागात पाणीपुरवठ्यासाठीची टँकरसंख्या ९६ एवढी आहे. तर, विभागात ४७७ विहीरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तालयाकडून ही माहिती देण्यात आली.

****

ईद-ए-मिलाद-उन-नबी आज राज्यात ठिकठिकाणी साजरी झाली. बीड इथं ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त बार्शी नाका परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीनं जुलूस काढण्यात आला. हजरत सय्यद अब्दुर रौफ कादरी यांनी जुलूसच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला. यावेळी परस्परांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. अनेक ठिकाणी अन्नदान करण्यात आलं.

धुळे, जळगाव, नागपूर जिल्ह्यात मुस्लिम समाजाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगली जिल्ह्यात मिरज इथं आज ईद ए मिलाद निमित्तानं मिरवणूक काढण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर ईद-ए-मिलाद उन नबी निमित्तानं भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. विविध भागांतून काढलेल्या मिरवणुकांचं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं. शहरात विविध ६ ठिकाणी रक्तदान शिबिरं, अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

****

क्रिकेट

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात सहा बाद २२९ धावा झाल्या आहेत. श्रीलंकेकडं १६ धावांची आघाडी आहे. त्याआधी आज सकाळी यजमान संघाचा पहिला डाव २९० धावांवर संपुष्टात आला. त्यांना भारताने फॉलोऑन दिला. उद्या सामन्याचा शेवटचा दिवस आहे.

****

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं जसप्रीत बुमराहला मागं टाकत आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत स्टार्कनं 10 बळी घेतले होते. या कामगिरीच्या जोरावर स्टार्कनं पहिलं स्थान पटकावलं. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत बुमराह दुसऱ्या, तर न्यूझीलंडचा मॅट हेन्री तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

****

हवमान

पुढील तीन दिवस मराठवाड्यासह राज्याच्या उर्वरीत भागत बहुताशं जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपचाा पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...