Wednesday, 19 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. आज सकाळी ९ वाजता नाशिकच्या पेठ तालुक्यातील गोंदे, करंजाळी भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवित हानी अथवा मनुष्य हानी झालेली नाही, असं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

****

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक आणि सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत, असं त्या म्हणाल्या. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विशेष विनंती मुख्यमंत्र्यांकडं करणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२७ च्या फेब्रुवारी-मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत आवेदनपत्र दाखल करणाऱ्यांना नियमित परीक्षा शुल्क भरावं लागेल. त्यानंतर १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील.

****

पुणे जिल्ह्यातील मोशीमधील १५ हेक्टर शासकीय जमीन चिंचवड च्या क्रांतीवीर चापेकर समिती संचालित क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत काल घेण्यात आला. या याठिकाणी मागास वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचं केंद्र स्थापन करण्यात येणार असून ही जमीन महसूलमुक्त आणि भोगवटामूल्यरहित किंमतीने कब्जेहक्कानं देण्यात येणार आहे.

****

शाळांमधील पोषण आहाराचा दर्जा आणि स्वच्छता याबाबत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत. शाळांमध्ये प्रत्यक्षात दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, याची शिक्षणाधिकाऱ्यांनी काटेकोर तपासणी करावी, असं सांगून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, मोफत गणवेश योजना तसंच शाळांमधील भौतिक सुविधांच्या अंमलबजावणीत तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असं भुसे यांनी म्हटलं आहे. राज्य पातळीवरील शिक्षणाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन आढावा बैठकीत काल ते बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला शालेय शिक्षण विभागाचं प्राधान्य असून पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहं, शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, ई-सुविधा, प्रयोगशाळा, क्रीडांगणं याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

****

मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या अभ्यास दौऱ्यात धाराशिवसह वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांनी काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांच्याशी संवाद साधला. या वेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी आणि माध्यम अधिकारी श्रीयांका चटर्जी यांची उपस्थिती होती. या बैठकीत या चार जिल्ह्यांत धार्मिक आणि वन पर्यटनातून रोजगार निर्मिती, कॅन्सर स्क्रिनिंग सेंटरची मागणी, बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ, हळद प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीति आयोगाने दिले.

****

दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या निविदा प्रक्रियेत कथित अनियमितता, तांत्रिक अटींमध्ये फेरफार आणि लाचखोरीच्या आरोपांप्रकरणी दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी शाखा, एसीबीनं माजी जलमंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या दक्षता संचालनालयानं केलेल्या तक्रारीनंतर २०२४ मध्ये हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासादरम्यान दिल्ली जल बोर्डाच्या आधुनिकीकरण आणि क्षमता वाढवण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट तांत्रिक अटी समाविष्ट करण्यात आल्याचं समोर आलं. या अटींमुळे एका विशिष्ट कंपनीला फायदा झाला आणि निविदेतील स्पर्धा मर्यादित करण्यात आल्या. तसंच वापरायच्या तंत्रज्ञान आणि माध्यमांबाबत प्रतिबंधात्मक अटी घालण्यात आल्या. प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या आवश्यक गुणवत्तेचे निकषही तांत्रिक अटींमध्ये समाविष्ट करण्यात आले नसल्याचा आरोप तपास यंत्रणेनं केला आहे.

****

नवी दिल्लीत सुरु असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वविजेतेपद स्पर्धेत, भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी मिश्र दुहेरी प्रकाराच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्यांनी मकाऊच्या लिओंग आयोक चोंग आणि एनजी वेंग ची यांचा २१-११, २१-११ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. १५वं मानांकन असलेल्या ध्रुव आणि तनिषा यांचा पुढील सामना सहावं मानांकन असलेल्या चीनच्या चेन फँग हुई आणि गुओ झिन वा या जोडीशी होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...