Saturday, 29 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात भारत-उझबेकिस्तान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासोबतच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल संपर्कयंत्रणा, ऊर्जा, शिक्षण आणि जनतेतील परस्पर संबंध यांसह विविध क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेतला जाणार आहे, तसंच दोन्ही देशांतील सहकार्यासंबंधी आगामी धोरण निश्चित केलं जाणार आहे.

****

नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ भाविकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आज सकाळी साडे सात वाजता हे पर्यटक रेल्वेनं पटणाहून नागपूरकडे रवाना झाले आहेत. नेपाळ ते पटनापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी शासनाने आवश्यक समन्वय आणि मदत केल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

****

'राष्ट्रीय क्रीडा दिना'निमित्त केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली इथं हॉकीचे दिग्गज खेळाडू मेजर ध्यानचंद यांना पुष्पांजली अर्पण केली. मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा केला जातो. 'फिट इंडिया' मोहिमेला चालना देण्यासाठी देशभरात 'मैदानावर एक तास' हा उपक्रम राबविला जात असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं. सर्वांना आठवड्यातून किमान एक तास मैदानावर घालवून निरोगी राहायला हवं तसंच समृद्ध राष्ट्र उभारण्यासाठी निरोगी युवा पिढी आणि निरोगी समाज अत्यंत आवश्यक असल्याचं मांडवीया यांनी म्हटलं आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं आज सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनस्थळी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून, चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

विद्यापीठ अनुदान आयोग ‘युजीसी’च्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा ‘नेट’च्या ८४ विषयांचे निकाल काल जाहीर झाले. दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी-‘एनटीए’ने यंदा जून महिन्यात पार पडलेल्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिकांमध्ये तथ्यात्मक, टायपिंग, भाषांतर आणि भाषिक त्रुटी आढळल्याचं तज्ज्ञ समितीच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. १६ ऑगस्ट रोजी या तीनही विषयांची उत्तरतालिका जारी केल्यानंतर परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. आता या तिन्ही विषयांची पुनर्परीक्षा येत्या ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार असून, यासाठी परीक्षार्थींना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

****

केंद्रीय वखार महामंडळानं नाशिक इथून तामिळनाडूतील चेन्नईसाठी या हंगामातील दुसरी 'कांदा एक्सप्रेस' रवाना केली आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याची वेळेवर उपलब्धता होईल. कांद्याच्या पुरवठ्यामुळे ग्राहकांसाठी कांद्याचे दर स्थिर ठेवण्यात मोठी मदत मिळणार असल्याचं वखार मंहामंडळानं म्हटलं आहे.

****

महाराष्ट्रात लागू झालेल्या धर्मांतरविरोधी कायद्याचा सर्वाधिक फायदा मुस्लिम समाजाला होईल, असं मत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केलं आहे. या कायद्याची अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्यारे खान यांनी अभिनंदन केलं. “धर्मांतरविरोधी कायदा हा कोणत्याही एका समाजाविरोधात नसून, सक्ती, फसवणूक किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय परिवारातर्फे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भागातील चारोसे या गावात काल रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मानवाच्या रक्षणासाठी संस्कारशील आणि स्वयंशासित समाज निर्माण करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी म्हणाल्या.

****

हिंगोली इथं अमोल गंगलवाड या पोलिस उपनिरिक्षकाने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली. खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाजवळ साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्णाकडून अकोल्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेसमोर गंगलवाड यांनी उडी घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हवामान - राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडू शकतो.

****

बेल्जियम आणि नेदरलँड्स इथं झालेल्या महिला हॉकी विश्वचषकात पाचवे स्थान पटकावणाऱ्या भारतीय महिला संघासाठी 'हॉकी इंडिया'नं ५० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं आहे. गुरुवारी ॲमस्टेलवीन इथं झालेल्या सामन्यात भारतानं जर्मनीचा ३-१ असा पराभव केला. १९७४ मधील पहिल्या विश्वचषकात चौथे स्थान मिळवल्यानंतरची भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...