Wednesday, 19 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या–एनटीएच्या संस्थात्मक पुनर्रचनेची गरज सर्वोच्च न्यायालयाकडून व्यक्त; संस्थेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल

·      रेल्वेच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      सर्पदंशाचा अधिसूचित आजारांच्या यादीत समावेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      गॉल कसोटीत भारताचा श्रीलंकेवर १६५ धावांनी दणदणीत विजय

आणि

·      पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत –पाकिस्तान सामना

****

राष्ट्रीय चाचणी संस्था – एनटीएच्या संस्थात्मक पुनर्रचनेची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्रं, मजबूत सायबर सुरक्षा व्यवस्था आणि संस्थात्मक तज्ज्ञांची यंत्रणा एकत्रित करण्याची गरज असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी दाखल झालेल्या सर्व याचिकांवर आज सुनावणी झाली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलेकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाअधिवक्ता तुषार महेता यांनी न्यायालयाला दिली.

****

दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा संस्था – एनटीएनं ६०० तज्ज्ञांना कार्यमुक्त करून, नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने समाजमाध्यमावर ही माहिती दिली. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी चार-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल, तसंच, NTA पुढील दोन ते तीन आठवड्यांत किमान २५ अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार असल्याचं मंत्रालयाने सांगितलं.

****

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज रेल्वेच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगाल, ओदिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातल्या आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे ४१० किलोमीटरच्या अतिरिक्त रेल्वे जाळ्याची निर्मिती होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या चारही रेल्वे प्रकल्पांसाठी एकूण नऊ हजार ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हे प्रकल्प २०३०-३१ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. याशिवाय, बिहारमधल्या दोन महत्त्वाच्या महामार्गांचं अद्ययावतीकरण करण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

****

कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, ‘फार्म टू फॉरेन’ या संकल्पनेतून महाराष्ट्र जागतिक निर्यातीचं केंद्र बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईत असोचॅमच्या वतीने आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये ते आज बोलत होते. महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग आणि निर्यात क्षेत्रातल्या विकासाचा रोडमॅप त्यांनी यावेळी मांडला. समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए बंदरामुळे महाराष्ट्रातली उत्पादनं जागतिक बाजारपेठेत जलद पोहोचू शकतील, असं सांगत शिंदे यांनी उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. राज्यातल्या कापूस, रेशीम, जूट आणि फळांना जागतिक स्तरावर ब्रँडिंग मिळवून देणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यात सर्पदंशाचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत करण्यात आला आहे. आता सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची माहिती देणं रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अनिवार्य असेल. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या मृत्युच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला. यामुळे घटनांवर देखरेख, विषरोधक औषधांचं नियोजन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी होणार असल्याचं, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं.

****

रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहन चालकांना सुरुवातीला एका महिन्याची नोटीस दिली जाईल, त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची शक्यता नाकारता येत नसून, राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. त्या आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी मंजूर केला असून, त्यादृष्टीने सरकार प्रयत्नरत असल्याचं त्या म्हणाल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन नियमबाह्यरीत्या पैसे लाटणाऱ्या पुरुषांविरोधात राज्य सरकार कठोर पावलं उचलणार असल्याचा इशाराही बोर्डीकर यांनी यावेळी दिला.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२७ च्या फेब्रुवारी-मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरुन अर्ज करता येईल. त्यानंतर १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील.

****

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत जे मतदार सापडले नाहीत, त्यांचं नाव सुधारीत यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलं. नाशिक इथं आज नाशिक आणि मराठवाडा विभागातल्या भाजपच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मतदार यादीतलं कोणतंही नाव वगळलं जाणार नाही यादृष्टीने मतदारांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करावी, असं त्यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘शाश्वत नागरी प्रशासनासाठी घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावरील प्रादेशिक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते आज झालं. मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीनं हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्याची सूचना आयुक्त येडगे यांनी यावेळी केली.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या डॉ. सुरेंद्र गट्टानी, स्वप्नील पाटील आणि प्रदीप निरभवणे यांनी, क्षयरोगावरील कमी पाण्यात विरघळणाऱ्या औषधांच्या प्रभावी वितरणासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण नॅनो - स्ट्रक्चर्ड ड्रग डिलिव्हरी तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राप्त झालं आहे. पेटंटचा कालावधी २० वर्षांचा असून, या तंत्रज्ञानामुळे औषधांची प्रभावीपणे शरीरात पोहोच वाढवण्यास तसंच त्यांच्या उपचारात्मक परिणामकारकतेत सुधारणेची शक्यता निर्माण झाली आहे.

****

आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही शेगाव नगरीत दाखल झाली. या पालखीने वारीचा ६० दिवसांचा पायी प्रवास आज पूर्ण केला.

****

मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी परवा २१ तारखेला छत्रपती संभाजीनगर शहरात ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी केलं. माती आणि पाण्याच्या संवर्धनाचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि जलसंवर्धनाला व्यापक लोकसहभाग मिळवून देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

****

लातूर इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या रंगरूट प्रशिक्षण केंद्रात, आज ५०० रोपांची लागवड करण्यात आली. ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन केंद्राच्या अध्यक्षा बसमी शौकत यांनी यावेळी केलं.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार मतदारसंघातली विविध विकासकामं, नागरिकांच्या समस्या तसंच प्रलंबित प्रश्नांबाबत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. या मतदारसंघातल्या विविध विषयांवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.

****

श्रीलंकेतील गॉल इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेवर १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ३७२ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेनं आज दुसऱ्या डावात ४ बाद ८४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, नवोदित मानव सुतारच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव कोसळला. मानव सुतारनं दुसऱ्या डावात सहा गडी बाद करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं या सामन्यात दोन्ही डावांत मिळून १० गडी बाद करण्याची शानदार कामगिरी केली.

****

पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. नेदरलँड्समध्ये एम्सटेलविन इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरु होईल. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून हार पत्करावी लागली होती.

****

नवी दिल्लीत सुरु असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने उप–उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...